
>>वैद्य सत्यव्रत नानल
‘ख’ म्हणजे अवकाश अथवा आकाश, ‘ग’ म्हणजे गमन करणारा, गतिमान असणारा. जो अवकाशामध्ये गतिमान आहे त्याला ‘खग’ म्हटले जाते. आपल्या प्राचीन मराठी, संस्कृत आणि अन्य भाषीय वाङ्मयामध्ये ‘खग’ हा शब्द पक्ष्यांना उद्देशून वापरलेला आहे. कारण ते आकाशात उडू शकतात, गगनात विचरण करतात. खगेंद्र म्हणजे गरुड. ज्याप्रमाणे पक्षी आकाशात विचरण करतात, त्याचप्रमाणे सूर्यही स्वतःच्या सौरमालेसह अवकाशात भ्रमण करत असतो. म्हणून त्याला ‘खग’ म्हटले आहे.
सूर्याचे सहावे नाव आहे पूष्णी
ॐ पूष्णे नमः। पूष्णी म्हणजे पोषणकर्ता. आपल्याला जीवनासाठी आवश्यक असणारे पोषण ज्या गोष्टींद्वारे मिळते अर्थात अन्न, जल, प्रकाश इत्यादी यामध्ये जी मूलभूत ऊर्जा आहे, ती सूर्यापासूनच प्राप्त झालेली आहे आणि म्हणूनच सूर्य हा आपला अंतिम आणि प्रथम पोषणकर्ता आहे. सूर्याच्या ऊर्जेने आपण पुष्ट होतो. ही ऊर्जा विभिन्न स्वरूपामध्ये वनस्पतींमध्ये, प्राण्यांमध्ये, पाण्यामध्ये उपलब्ध होते आणि तिथून ती आपणास प्राप्त होते. याशिवाय सूर्याची ऊर्जा थेट सूर्यप्रकाशातूनही आपल्याला मिळू शकते.
ॐ ऱहां हिरण्यगर्भाय नमः । –
‘हिरण्यगर्भ’ या नावाला योगाभ्यासामध्ये विशेष महत्त्व आहे. हिरण्यगर्भः योगस्य प्रोक्ता। हिरण्यगर्भ म्हणजे परमात्मा ईश्वर हा योगाचा प्रवर्तक किंवा योगाचा उद्गाता आहे असे आपल्या शास्त्रामध्ये म्हटले आहे आणि म्हणून हे नाव प्रत्येक योगसाधकाने ध्यानात ठेवले पाहिजे.
‘हिरण्य’ या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. ‘हिरण्य’ या शब्दाचा एक अर्थ आहे सोने, स्वर्ण. गर्भ म्हणजे गोळा. सूर्य सोन्याच्या गोळय़ासारखा दिसतो म्हणून त्याला हिरण्यगर्भ असे म्हटले आहे. ‘हिरण्य’ या शब्दाचा दुसरा अर्थ आहे ग्रह. पृथ्वीपासून सौरमालेतील सर्व ग्रह सूर्यामधूनच जन्माला आले. त्यांचा जन्म सूर्याच्या गर्भातून झाला. सूर्य या सर्व ग्रहांचा जन्मदाता आहे म्हणून सूर्याला हिरण्यगर्भ म्हटले आहे. किती शास्त्रशुद्ध नाव आहे पहा.
ॐ मरिचये नमः।
मरिची सप्तर्षींमधले एक प्रमुख ऋषी. ब्रह्मदेवांचे मानसपुत्र मरिची. त्यांचे मानसपुत्र म्हणजे कश्यप ऋषी. कश्यप ऋषींचा विवाह दक्ष प्रजापतीच्या कन्याबरोबर झाला. त्यातील अदितीपासून देवता आणि सूर्य यांचा जन्म झाला. मरिचींच्या वंशात जन्म झाला म्हणून सूर्याचे नाव आहे मरिची. ‘मरिची’ या नावाचा दुसरा अर्थ आहे तप्त वायूंचा गोळा. सूर्य हा हायड्रोजन आणि हेलियम गॅसपासून बनलेला आहे आणि त्याचे तापमान लाखो अंश इतके आहे. म्हणूनही त्याला मरिची म्हटले आहे.


























































