स्वच्छंद : पक्षी रत्न गोमेद

>> विद्या कुलकर्णी

या देखण्या पक्ष्याचे नाव आहे गोमेट. पण तेजस्वी गोमेट रत्नासम भासतो.

मुंबईमध्ये गर्द झाडीच्या भागात मी राहत असल्यामुळे, माझी सकाळ नेहमीच पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे प्रसन्न होते. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातसुद्धा हे स्वच्छंद विहार करणारे सोबती माझ्या मनाला नकळत सुखावून जातात. फोटोग्राफीच्या छंदामुळे पक्ष्यांचे सौंदर्य टिपण्याची सवय लागली. पक्षी जगतातले इतर अनेक कलाकार व त्यांची अदाकारी मला खुणावू लागली व मी हिंदुस्थानभर माझा कॅमेरा घेऊन जाऊ लागले. उत्तराखंड व गणेशगुडी येथे फिरत असताना अतिशय आकर्षक नारिंगी, लाल रंगांच्या पक्ष्यांनी माझे लक्ष वेधून घेतले.

गोमेट या पक्ष्यांच्या 15 प्रजाती असून हे पक्षी दक्षिण आणि पूर्वेकडील आशिया येथे आढळतात. या लेखात गोमेट प्रजातींमधील ‘लांब शेपटीचा गोमेट (Long Tailed Minivet), निखार (Small Minivet ), लाल निखार (Scarlet Minivet) व नारिंगी गोमेट (Orange Minivet)’ यांच्याविषयी जाणून घेऊया.

हे पक्षी सडपातळ, नाजूक व लांब शेपटीचे आहेत. झाडाच्या फांदीवर अतिशय दिमाखात व ताठ बसतात. ते जंगलात, विशेषतः डोंगराळ प्रदेशात तसेच बागांमधून आढळतात. बहुतेक उपप्रजातीमध्ये नराचा वरचा भाग लाल ते नारंगी रंगाचा असतो. मादी सामान्यतः पिवळय़ा रंगाची असून वरचा भाग राखाडी ते शेवाळी असतो. कीटक हे या पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे.

लांब शेपटीचा गोमेट (Long tailed Minivet)
चकचकीत निळसर काळा व लालसर नारिंगी रंगाचा हा पक्षी लोभस दिसतो . या पक्ष्याच्या पंखांमध्ये काळा व नारिंगी रंगाचे मिश्रण असते व उडताना त्याचे पंख फारच आकर्षक दिसतात. मादी मात्र पिवळय़ा रंगाची असते. तिचे गाल राखाडी रंगाचे असतात. पाठीवर हिरवा पिवळा व राखाडी रंगांचे मिश्रण असते. या पक्ष्यांचा प्रजननाचा काळ एप्रिल ते जून असून तेव्हा हे पक्षी विशाल व शंकूच्या आकाराच्या झाडांच्या वनामध्ये वास्तव्य करतात. इतर वेळी मात्र खुल्या मैदानात आढळतात. नर व मादी दोघे मिळून झाडावर पाला-पाचोळा, शेवाळे वापरून कपाच्या आकाराचे घरटे बांधतात.

निखार (Small Minivet)
डोके व पाठीचा भाग राखाडी रंगाचा असून छाती नारिंगी रंगाची असते. पोटाचा भाग फिकट पिवळय़ा रंगाचा असतो. शेपटीचा काठ नारिंगी रंगाचा व पंखांमध्ये नारिंगी रंगाचे पट्टे असतात. मादीचा रंग वरती राखाडी असून तोंड व खालील भाग पिवळा असतो. शेपटीचा काठ पिवळा असतो. पंखांवर पण पिवळय़ा रंगाचे पट्टे असतात. वेगवेगळय़ा प्रदेशांत या पक्ष्याच्या रंगात थोडय़ा फार प्रमाणात बदल दिसतो. हे पक्षी झाडाझुडपात, विरळ जंगलात राहणे पसंत करतात. यांचे घरटे कपाच्या आकाराचे असून मादी एकावेळी ठिपके असलेली 2-4 अंडी घालते. अंडी उबवण्याचे काम फक्त मादीच करते. हे पक्षी उडत असताना कीटक पकडून खातात.

लाल निखार (Scarlet Minivet)
गडद चोच आणि लांब पंख असा ‘लालनिखार’ पक्षी. नराचे डोके व वरचा भाग काळय़ा रंगाचा असून खालचा भाग, शेपटीची टोके, पार्श्वभाग लाल रंगाचा असतो. पंखांमध्ये लाल रंगाचे पट्टे असतात. या पट्टय़ांचा आकार व रंग उपप्रजातीनुसार थोडा वेगवेगळा असतो. मादीचा वरचा भाग राखाडी असून खालचा भाग, चेहरा, शेपटीची टोके, पार्श्वभाग पिवळय़ा रंगाचा असतो. पंखांवर पिवळय़ा रंगाचे पट्टे असतात.

हे पक्षी उडत असतानाच झाडांमधील कीटक पकडतात. झाडांच्या उंच फांद्यांवर हे पक्षी घरटे बांधतात. यांचे घरटे कपाच्या आकाराचे असून ते छोटय़ा डहाळय़ा व कोळय़ांची जाळी वापरून बनवलेले असते. मादी एकावेळी 2-3 अंडी घालते. अंडय़ांचा रंग फिक्कट हिरवा असून त्यावर ठिपके असतात. ती उबवण्याचे काम मादी करते, पिल्लांचे संगोपन दोघेही एकत्र करतात.

नारिंगी गोमेट (Orange Minivet)
हे पक्षी दक्षिणपूर्व हिंदुस्थान आणि श्रीलंका येथे आढळतात. त्यांचे नैसर्गिक वास्तव्य समशीतोष्ण वन, उष्णकटिबंधीय वन व ओलसर जंगलात असते. नराचे अंग काळय़ा व नारिंगी रंगांचे मिश्रण असते तर मादीचे अंग राखाडी व पिवळय़ा रंगांचे मिश्रण असते.
या पक्ष्यांचे फोटो काढताना मला गुंजेची आठवण आली. गुंजेप्रमाणेच चमकदार रंग असलेले हे पक्षी लांब अंतरावरूनही ओळखता येतात. या चारही पक्ष्यांच्या रंगात, पंखांच्या रचनेत जो थोडा थोडा फरक आहे त्यावरून विधात्याच्या कल्पकतेचे कसे व किती वर्णन करावे, शब्द अपुरेच पडतात, आपण निशब्द होऊन जातो!!!

– vidyakulkarni251@yahoo.in