
>>यादव तरटे पाटील
महाराष्ट्र हे पक्षी निरीक्षणात अग्रेसर असलेले राज्य आहे. चार दशकांपासून महाराष्ट्र हे पक्षीमित्र संमेलन साजरे करणारे एकमेव राज्य आहे. पक्षी सप्ताह साजरा व्हावा अशी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेची गेल्या अनेक वर्षांची मागणी होती. दि. 5 ते 12 नोव्हेंबर या काळात देशात प्रथमच महाराष्ट्राने पक्षी सप्ताह साजरा करून इतिहास रचला आहे.
विकास प्रकल्प, विजेच्या तारांना धडकून होणारे अपघाती मृत्यू, कीटकनाशकांमुळे होणारी विषबाधा, भटक्या कुत्र्यांकडून होणारी पिल्लांची व प्रौढ पक्ष्यांची शिकार, गुरांच्या पायदळी तुडवले जाण्यामुळे होणारा अंडी व पिल्लांचा नाश, अधिवास धोक्यात येणे यामुळे हे पक्षी धोक्यात आलेत. नष्ट होणारा अधिवास ही सर्वात जटील समस्या आहे. शेती आणि उद्योगधंद्यासाठी माळरानांचा मोठ्या प्रमाणात नाश होत आहे. माळरानांच्या अयोग्य आणि अशास्त्रीय नियोजनामुळे ती आता संपुष्टात येत आहे. माळढोक पक्ष्याच्या आधाराने येथील जैवविविधता सुखाने नांदत असतानाच मात्र आता या जंगलाला मानवाची दृष्ट लागली आहे. वन विभागाच्या व स्थानिक वन्यजीवप्रेमीच्या प्रयत्नांना येथे सपशेल अपयश आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. कोटय़ावधी रुपये खर्च करूनही आम्ही माळढोकाला वाचविण्यात अपयशी ठरलो आहोत. ही बाब मनाला चटका देणारी असून आत्मचिंतन करायला भाग पडणारी आहे. राज्य शासनाने नुकतेच माळढोक संवर्धनासाठी निधी दिला ही बाब कौतुकास्पद म्हणता येईल. एकूणच काय तर मनुष्याचा हस्तक्षेप नसलेला अधिवास व शिकाऱ्यांपासून संरक्षण मिळाले तर येथेही नव्याने माळढोकाचा संसार फुलायला लागेल यात शंकाच नाही.
निसर्गातील ऋतुचक्र हे निसर्गात होणाऱ्या बदलाचा एक भाग आहे. हे सगळे बदल प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे निसर्ग आपल्याला सूचित करीत असतो. दरवर्षी नियमितपणे होणारे पक्ष्यांचे स्थलांतर हासुद्धा याच बदलाचा एक भाग आहे. हिवाळ्यातील थंडीच्या दिवसांत अनेक दूरदेशींचे पाहुणे पक्षी आपल्याकडे येतात. महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातील समुद्रकिनारे, नद्या, तलाव व इतर पाणथळीची ठिकाणे हे खास पाहुणे व्यापून टाकतात, तर काही रानपक्षीदेखील स्थलांतर करून येतात. महाराष्ट्र हे पक्षी निरीक्षणात अग्रेसर असलेले राज्य आहे. चार दशकांपासून महाराष्ट्र हे पक्षीमित्र संमेलन साजरे करणारे एकमेव राज्य आहे. पक्षी सप्ताह साजरा व्हावा अशी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेची गेल्या अनेक वर्षांची मागणी होती. पक्षी संवर्धन, संरक्षण व जनजागृती हा उद्देश ठेवून राज्य वन्य जीव मंडळाच्या 15 व्या बैठकीच्या सभापटलावर हा विषय मी ठेवला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दि. 5 ते 12 नोव्हेंबर पक्षी सप्ताह जाहीर करून तमाम पक्षीमित्रांना हा सोहळा साजरा करण्याची संधी दिली.
पक्ष्यांचे अस्तित्व व पक्ष्यांचे स्थलांतर हे अनेक अंगाने फायद्याचे आहे. निसर्ग संतुलनात पक्षी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. विदेशातील हे पाहुणे पक्षी पाण्यातील, हवेतील व वनस्पतीवरील असंख्य कीटकांना खातात. पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. पक्ष्यांचा अभ्यास, निरीक्षणे करण्यासाठी व त्याची छायाचित्रे घेण्यासाठी अनेक पक्षीप्रेमी त्यांच्या येण्याची वाटच पाहत असतात. जागतिक हवामान बदलांची परिस्थिती व वन संवर्धनात पक्ष्यांचे स्थलांतर अनेक अंगाने लाभदायी आहे. मात्र त्यांच्या अधिवासात दिवसेंदिवस वाढत चाललेली मानवी ढवाळाढवळ त्यांना मारक ठरत आहे. बहुसंख्य पक्ष्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या राखीव क्षेत्रातील जलाशयांना मासेमारीकरिता परवाने दिले आहेत. अनेक वेळा शिकाऱ्यांच्या व मासेमारीच्या जाळ्यात अडकलेले पक्षीसुद्धा आम्ही मोकळे केलेले आहेत. अनेक समस्यांना तोंड देत हे पक्षी वर्षानुवर्षे आपल्या भागात येतात व हिवाळा संपला म्हणजे उन्हाळ्याची चाहूल लागताच आपआपल्या भागात परत जातात. पक्षी हे ज्या भागातून स्थलांतर करून येतात त्या भागात ऋतूनुसार निर्माण होणारी अन्नाची कमतरता, थंडीत जलाशय गोठल्यामुळे खाद्यान्नाची अनुपलब्धता, जगण्यासाठी लागणारे संतुलित व सुरक्षित वातावरण, विणीच्या मोसमात घरटी बांधण्यासाठी आवश्यक असणारी सुरक्षित जागा व परिस्थिती अशा अनेक कारणामुळे पक्षी स्थलांतर करतात. हिंदुस्थानात मध्य, पूर्व, उत्तर व दक्षिण युरोप, रशिया, सायबेरिया, मंगोलिया, तिबेट यासह आशिया खंडाच्या अनेक भागांतून आपल्याकडे अनेक पक्षी येतात. काही पक्षी तर 20 हजार ते 54 हजार कि.मी.पर्यंतचा प्रवास करतात. पक्षी हे साधारणतः ताशी 40 ते 60 कि.मी.च्या वेगाने उडतात. स्थलांतरणात पक्षी दिवसा व रात्रीही प्रवास करतात. हिमालयाकडून केरळ भागात म्हणजेच पक्ष्यांचे स्थलांतर हे देशांतर्गतही असते, तर काहींचे आर्टिक्ट ते अंटार्टिक म्हणजे देशाबाहेरूनही आपल्याकडे येतात. महाराष्ट्र ही पक्ष्यांची पंढरी आहे. हिंदुस्थानच्या 43 टक्के पक्षी एकटया महाराष्ट्रात आढळतात.
सहजीवन हा जैवविविधतेमधला अविभाज्य अंग आहे. याच अर्थाने निसर्गातील प्रत्येक वनस्पती, प्राणी व पक्षी महत्त्वाचे आहेत. वन, वन्यप्राणी, पक्षी, फुलपाखरे, जलसंपदा व शेती एकमेकांच्या आधारावर आहे, मात्र या अन्नसाखळीतील वन्यप्राणी, पक्षी, कीटक हा घटक मानवाला नकोसा वाटायला लागणे ही दुर्दैवी बाब आहे. गवताळ प्रदेश म्हणजे एक स्वतंत्र अधिवास जेथील मृदेवर गवतांच्या असंख्य प्रजातींचे राज्य असते. गवताळ प्रदेश पृथ्वीवरील मुख्य अधिवासापैकी एक आहे. पृथ्वीचा एकूण भूभागाच्या 40 टक्के भाग हा गवताळ प्रदेशाने व्यापलेला आहे, पण वाढणारे शेती व शहर क्षेत्र यातून गवताळ प्रदेश नष्ट होत आहेत. तणमोर, टिटवी, भटतितर, भोवत्या, चंडोल, पाषाण गोजा, वटवटय़ा, खाटीक, गोमेट, तीरचिमणी, हुदहुद आदी पक्षी या साखळीत महत्त्वाची भूमिका बजावतात. माळढोक पक्षी तर गवताळ प्रदेशाचा उत्तम निर्देशकच आहे. एकेकाळी हा पक्षी भारतीय राष्ट्रीय पक्षी होण्याच्या स्पर्धेत होता. आय.यू.सी.एन.च्या तांबडय़ा यादीत अत्यंत दुर्मिळ प्रजाती असलेला माळढोक आता शेवटच्या घटका मोजत आहे.
वन्य प्राण्यांच्या प्रेमाच्या बाबतीत आपल्याकडील दुटप्पीपणा घातक ठरतोय. फक्त आशियायी देशात आढळणाऱ्या वाघाबद्दल संपूर्ण जगाला कुतूहल आहे. त्याला टिकवण्यासाठी हिंदुस्थानात आजवर 50 व्याघ्र प्रकल्प उभारण्यात आले. सन 2016 मध्ये त्यांच्या संवर्धनासाठी 15000 कोटी रुपयांची तरतूद केली गेली. अनेक जागतिक संस्थाही याला पाठिंबा देत आहेत. अर्थात यात वाईट काहीच नाही, पण वाघाबरोबर इतरही प्राणी व पक्षी आहेत, त्यांच्याविषयी व त्यांच्या संवर्धनाविषयी फारसे गांभीर्याने आजवर आपण बघितले नाही. गिधाड, माळढोक यांसारखे पक्षी तर आता पूर्णपणे नामशेष होत असतानाच त्यांच्याविषयी प्रेम किंवा ओढ लोकांना का वाटत नसावी? एखाद्या प्राण्याविषयी प्रेम असणं, त्यांच्यासाठी काही करणं यात वाईट असं काहीच नाही. आपण जंगलं तोडली, त्यांचा अधिवास धोक्यात टाकला. हे पक्षी आज बेघर झालेत. पुढच्या काळात तर ते पृथ्वीवरून नष्टदेखील होतील, मग त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी ही आपली आहे, पण ही जबाबदारी निभावताना हे प्राणीप्रेम फक्त काही प्राण्यांपुरता मर्यादित न ठेवता इतरही जिवांचा त्यात विचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी कडक कायदे व प्रस्थापित कायद्यात दुरुस्ती आणि अस्तित्वात असलेल्या कायद्यांची कडक अंमलबजावणी करणे क्रमःप्राप्त असणार आहे. वन विभाग व पक्षीमित्रांच्या पुढाकाराने दरवर्षी पक्षी सप्ताह साजरा होणार आहे, पण पक्षी सप्ताहाच्या पुढे काय? पक्ष्यांची शिकार रोखणे, पक्ष्यांचे अधिवास संवर्धन आणि शेतकरी व जनसामान्याच्या मनात पक्ष्यांचे महत्त्व गळी उतरविणे हे आता पक्षीमित्र तसेच वन विभागापुढील आवाहन असणार आहे. मानव आणि पक्षी अशा या नात्याचे वस्त्र्ा आता सहजीवनाच्या धाग्याने नव्याने विणायची गरज आहे.






























































