मुद्दा – ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराचे अर्धशतक!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> योगेंद्र ठाकूर

2023 सालचा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ हा सुप्रसिद्ध उर्दू कवी-लेखक व गीतकार गुलजार यांना प्राप्त झाला आहे त्यांच्याबरोबरच संस्कृत विद्वान जगद्गुरू रामभद्राचार्य यांनाही प्राप्त झाला आहे. उर्दूला पाचव्यांदा तर संस्कृतला दुसऱयांदा हा मान मिळाला आहे.

मराठी भाषेला सर्वात प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार मिळवण्याचा मान 1974 साली सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर यांना मिळाला. त्यानंतर कविवर्य कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांना 1987 साली, कविश्रेष्ठ विंदा करंदीकर यांना 2003 साली, तर सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना 2014 साली मिळाला आहे. अशा चार प्रतिभावान मराठी साहित्यिकांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1965 पासून सुरू झालेल्या ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराचे आतापर्यंत 63 दिग्गज साहित्यिक मानकरी ठरले आहेत. त्यात जी. शंकर कुरुप, ताराशंकर बंधोपाध्याय, उमाशंकर जोशी, फिराक गोरखपुरी, रामधारीसिंह दिनकर, द. रा. बेंद्रे, शिवराम कारंथ, अमृता प्रीतम, महादेवी वर्मा, वी. के. गोकाक, सीताकांत महापात्र, यू आर. अनंतमूर्ती, महाश्वेतादेवी, अली सरदार जाफरी, गिरीश कर्नाड, अमरकांत, इंदिरा गोस्वामी, सत्यव्रत शास्त्राr, नीलमणी फूकन, ए. ए. नंबद्री, दामोदर मावजो, प्रतिभा राय, गुरुदयाल सिंग आदी प्रथितयश लेखकांच्या साहित्यकृतींचा गौरव करण्यात आला आहे 1980 सालापर्यंत साहित्यिकांच्या एखाद्या साहित्यकृतीला प्रमाण मानून पुरस्कार देत होते; पण 1980 नंतर साहित्यिकांच्या त्यांच्या भाषेतील एकत्रित योगदानाचे महत्त्व लक्षात घेऊन हा पुरस्कार देण्यात येत आहे.

‘ज्ञानपीठ’ पुरस्काराचा इतिहास असा आहे. दिल्लीतील साहित्यप्रेमी व अनेक शैक्षणिक, सामाजिक व औद्योगिक संस्थांचे प्रणेते आश्रयदाते रमा जैन आणि त्यांचे पती शाहू शांतिप्रसाद जैन यांनी भारतीय साहित्यिकांच्या गौरवार्थ हा उपक्रम करण्याचे ठरवले. हा पुरस्कार सुरू करण्यामागे रमा जैन यांची प्रेरणा होती. 22 मे 1961 रोजी शाहू जैन यांच्या 51 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी स्वतःच्या काwटुंबिक ट्रस्टमधून ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ देण्याची घोषणा केली. त्यानुसार भारतीय ज्ञानपीठाच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती रमा जैन यांनी 16 सप्टेंबर, 1961 रोजी संस्थेच्या बैठकीत ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराबाबतचा ठराव मांडला या पुरस्काराचे स्वरूप ठरविण्यासाठी 2 एप्रिल 1962 रोजी दिल्लीत देशभरातून 300 विद्वानांना आमंत्रित करण्यात आले. या संमेलनातून तयार झालेली पुरस्काराची संपूर्ण योजना डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सादर करण्यात आली. त्यांनी ती मान्य केली व निवड समितीचे प्रमुखपदही स्वीकारले. पण 1963 मध्ये त्यांचे निधन झाले, त्यानंतर ही जबाबदारी काकासाहेब कालेलकर व डॉ. संपूर्णानंद यांच्याकडे आली. 29 डिसेंबर 1965 मध्ये पहिला ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार हा मल्याळम कवी श्री. गोविंद शंकर कुरूप यांच्या ओडोक्कुघल (बासरी) या काव्यकृतीला मिळाला, त्यानंतर नऊ वर्षांनी मराठी भाषेतील पहिला ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार वि. स. खांडेकर यांना देण्यात आला.

‘ज्ञानपीठ’ पुरस्कारात ‘पुरस्कार पत्र’, ‘वाग्देवीची प्रतिमा’ आणि ‘अकरा लाख रुपयांचा धनादेश’ यांचा समावेश असतो. ‘ज्ञानपीठ’ पुरस्कारात दिली जाणारी वाग्देवीची प्रतिमा ही माळवा प्रांतातील धार येथील सरस्वती मंदिरातील एका मूर्तीची प्रतिकृती आहे. या सरस्वती मंदिराची निर्मिती राजा भोज याने सन 1305 मध्ये केली होती. वाग्देवीची ही मूर्ती सध्या लंडन येथील ब्रिटिश संग्रहालयात आहे.