सेलेब्रिटी चॉईस – अनुभवांचे संचित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गिरीश ओक

शाळेत असल्यापासून जडलेली वाचनाची सवय तशी अजून तरी सुटलेली नाही. कामाचं स्वरूप, त्याच्या वेळा यात अडकल्यानंतर लक्षात आलं की, आपलं वाचन कमी होतंय आणि पुन्हा एकदा सुरुवात करताना प्रकाश आमटे यांच्या ‘प्रकाशाच्या वाटा’ हे पुस्तक हाती आलं. ध्येयाने पछाडलेली माणसं वेगळी असतात. ती तशी का असतात हेच या पुस्तकातून अनुभवतोय. लहानपणी कॉमिक्स आणि ‘चांदोबा’चे फार वेड होते. ‘चांदोबा’चे कितीतरी अंक मी जपून ठेवले होते. त्यातली ‘विक्रम वेताळ’ सीरिज आवडती. ती आत्ता वाचतानाही मला नॉस्टेल्जिक व्हायला होते. असा अनुभव देणारी अनेक पुस्तकं आहेत. जी. ए. कुलकर्णी, पु.ल.देशपांडे, रणजित देसाई, नारायण धारप, गुरुनाथ नाईक, बाबुराव अर्नाळकर, दि. बा. मोकाशी यांची पुस्तकं पुनपुन्हा वाचावी अशीच आहेत.

काही वेगळ्या विषयांवरची पुस्तकंही वाचली. त्यापैकी वाचलेलं ‘ऐल्लमा पैल्लमा’ हे आजच्या शिक्षण पद्धतीवर भाष्य करणारं पुस्तक, रवी बापट यांचं ‘वॉर्ड नंबर पाच’, अभिराम भडकमकरचे ‘इन्शाल्लाह’ ही कायम आवडणारी पुस्तकं आहेत. श्रीमान योगी, स्वामी, पिंगळावेळ, काजळमाया, निळासावळा ही पुस्तकं अजूनही वाचायला आवडतात. यात जीएंचं लक्षात राहिलेलं पुस्तक म्हणजे ‘पैलपाखरे’. फार सुंदर अनुवादित कथा यात आहेत.

शांता शेळके, कुसुमाग्रज यांच्या कविता वाचणं म्हणजे केवळ वाचणं नसतं, तर तो अनुभव असतो. गंगाराम गवाणकरांचे ‘व्हाया वस्त्रहरण’ हे आत्मचरित्र वाचून मी फार प्रभावित झालो होतो. तसंच आणखी एक पुस्तक म्हणजे बाबुराव गोखले यांचं ‘करायला गेलो एक’. छोटय़ा छोटय़ा कथांमधून, घटनांमधून त्यांनी तत्त्वज्ञान आपल्यासमोर मांडले आहे. दि. बा. मोकाशींचे ‘देव चालले’ हे माझे अत्यंत आवडते पुस्तक. या पुस्तकाची गंमत अशी की, प्रत्येक वेळी हे पुस्तक वेगळा दृष्टिकोन घेऊन आपल्या समोर येते. सुनीताबाई देशपांडे आणि जी.ए. कुलकर्णी यांच्यातील पत्रव्यवहार असणारं पुस्तक ‘प्रिय जीए’ हेही असंच. ही पत्रं म्हणजे त्यांचं अफाट वाचन मांडणारं पुस्तक आहे. तसंच आणखी एक पुस्तक म्हणजे पु.शि. रेगे यांचं ‘मातृका’.

पुलंची पुस्तकं हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. पुलंचं साहित्य हे जगातील सर्वात उत्तम स्ट्रेसबस्टर आहे असं मला वाटतं. म्हणूनच बाकी काही वाचलं नाही तरी पुलंची पुस्तकं मात्र आवर्जून वाचा, असं मी सांगेन. पु.ल. आपल्याला सतत मोटिव्हेट करत राहतात. असंच जगण्याचं मर्म मांडणाऱया ओशोंच्या कथा कुणालाही आवडतील. त्यांच्या ‘दो पत्ते’, ‘ओशो की कहानीयां’ या हिंदी अनुवादित कथा वाचण्यासारख्या आहेत. पुस्तक वाचताना आपण दृश्यात्मक अनुभव घेतो. एक कलाकार म्हणून हा अनुभव माझ्यासाठी फार महत्त्वाचा ठरतो. कधी पाहिल्याही नसलेल्या गोष्टींना आपण अलवार स्पर्श करून येतो. गुंततो, भावनाविवश होतो तर कधी एखादं वाक्य वाचूनही मन पिसासारखं हलकं होतं. हे सगळं घडतं ते पुस्तकांमुळे. पुस्तकांचं जग एकाच वेळी अनेक अनुभव आपल्याला देतं. हे अनुभवांचं संचित पुढे प्रत्येक पायरीवर आपली सोबत करत राहतं.

शब्दांकन – शुभांगी बागडे