सी. आर. राव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

> विलास पंढरी

गणित आणि संख्याशास्त्रामध्ये मूलभूत योगदान देणारे मूळचे हिंदुस्थानी असलेले प्रसिद्ध गणितज्ञ सी. आर. राव यांना ‘इंटरनॅशनल प्राइज इन स्टॅटिस्टिक्स’ हा गणितातील नोबेल अशी ओळख असलेला पुरस्कार जाहीर झाला आहे. 1885 मध्ये स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय सांख्यिकी संस्था ही 150हून अधिक देशांमध्ये वैयक्तिक आणि संस्थात्मक सदस्यांसह काम करणारी ‘ना-नफा’ तत्त्वावर काम करणारी एक गैरसरकारी संस्था आहे. सांख्यिकीय ज्ञानाचे आदान-प्रदान करणे, त्याच्या सर्वोत्तम नीतिमूल्यांसह पद्धती शिकणे, अत्याधुनिक घडामोडी सामाईक करणे आणि नेटवर्कच्या संधी निर्माण करून जगभरातील सांख्यिकी समजून घेणे, विकास करणे आणि चांगली नैतिक मूल्ये असलेल्या पद्धतींना प्रोत्साहन देणे ही या संस्थेची मुख्य उद्दिष्टे आहेत.

या संस्थेला 1949 पासून युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अॅण्ड सोशल कौन्सिल आणि युनायटेड नेशन्स स्टॅटिस्टिकल डिव्हिजन सहसल्लागार असा दर्जा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय सांख्यिकी संस्थेची दर दोन वर्षांनी कॉन्फरन्स होते. ज्यात पुरस्कार वितरित केले जातात. येत्या जुलैमध्ये पॅनडातील ओटावा येथे भरणाऱया सांख्यिकी काँग्रेसमध्ये सी. आर. राव यांना 80 हजार अमेरिकन डॉलर्स रकमेसह विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाईल. सी. आर. राव यांना ‘इंटरनॅशनल प्राइज इन स्टॅटिस्टिक्स’ या पुरस्काराने त्यांनी 1945 मध्ये मांडलेल्या शोधनिबंधासाठी 75 वर्षांनंतर गौरविण्यात येत आहे. गणित आणि संख्याशास्त्रामध्ये मूलगामी ठरणारा राव यांचा हा शोधनिबंध 1945 मध्ये कोलकाता मॅथेमॅटिकल सोसायटीच्या बुलेटिनमध्ये प्रकाशित झाला होता. त्यात त्यांनी मांडलेल्या माहितीमधून ‘व्रेमर-राव लोअर बाऊंड’, ‘राव-ब्लॅकवेल थेरम’ आणि ‘इन्फर्मेशन जिओमेट्री’ असे संख्याशास्त्राची दिशा बदलणारे तीन निष्कर्ष समोर आले होते. माहितीच्या प्रचंड मोठय़ा जंजाळातून हवी ती माहिती कशी मिळवायची यासाठी हे संशोधन उपयोगी ठरत असल्याने पुरस्कार देण्याइतपत महत्त्व असल्याचे उशिरा का होईना लक्षात आल्याने वयाचे शतक ओलांडल्यावर राव यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

लार्ज हायड्रॉन कोलायडरपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रडार यंत्रणा यांसारख्या अनेक आधुनिक प्रणालींमध्ये राव यांच्या संशोधनाचा फायदा आजही होत आहे. सी. आर. उपाख्य कल्यमपुडी राधाकृष्ण राव यांचा जन्म कर्नाटकच्या विजयनगर जिल्ह्यातील हदगली गावात एका तेलुगू कुटुंबात 10 सप्टेंबर 1920 रोजी झाला. आंध्र विद्यापीठातून ते एमएससी झाले आणि त्यांनी 1941 मध्ये इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूटमधून काम सुरू केले. ते इन्स्टिटय़ूटचे संचालक आणि अन्य महत्त्वाच्या संस्थांमध्ये प्राध्यापक होते. पुढे त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून 1945 मध्ये पीएचडी मिळवली, तर 1965 मध्ये डीएससी ही पदवी प्राप्त केली. सध्या म्हणजे वयाच्या शंभरीनंतर ते पेन सिल्व्हानिया विद्यापीठात मानद प्राध्यापक आणि बफेलो विद्यापीठात संशोधक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. राव हिंदुस्थानातील नोकरीच्या नियमानुसार वयाच्या साठाव्या वर्षी निवृत्त होऊन अमेरिकेत नातवंडांना सोबत म्हणून मुलीकडे राहायला गेले. तिथे वयाच्या 62 व्या वर्षी पिटसबर्ग विद्यापीठात संख्याशास्त्र विषयाचे प्राध्यापक, तर वयाच्या 70व्या वर्षी पेन सिल्व्हानिया विद्यापीठात विभागप्रमुख झाले. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले. त्यांना वयाच्या 82 व्या वर्षी ‘नॅशनल मेडल फॉर सायन्स’ हा ‘व्हाइट हाऊस’चा सन्मान प्राप्त झाला आणि आता वयाच्या 102 व्या वर्षी संख्याशास्त्र्ाातील नोबेल पारितोषिक म्हटले जाते असा जगातील पाच महत्त्वाच्या संस्थांनी एकत्र येऊन सुरू केलेला ‘इंटरनॅशनल प्राइज इन स्टॅटिस्टिक्स’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या संशोधनातील मूलभूत योगदानासाठी भारत सरकारने त्यांना पद्मभूषण (1968) आणि पद्मविभूषण (2001) देऊन अगोदरच गौरविले आहे.