मातृभाषासुख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

> सुहास मळेकर

आऊटडोअर फोटोग्राफीसाठी काही दिवस चेन्नईच्या दौऱयावर होतो. सगळं आटपून एअरपोर्टला येताना मोठय़ा रस्त्यावर डोळय़ांसमोर एका हातगाडीवाल्याला ट्रकचा धक्का लागला. अर्थात कुणाचे काहीही फारसे नुकसान झाले नाही, पण त्या हातगाडीवाल्याने साहजिकच स्थानिक भाषेत एक शिवी हासडली. ड्रायव्हरने ट्रक बाजूला लावला आणि लुंगी सावरत खाली उडी मारून त्याच्याशी त्याच भाषेत वाद घालत धक्काबुक्की केली. बघे जमा झाले. कोणीतरी त्यांना त्याच भाषेत काहीबाही समजावू लागला. आणखी चार जण त्याच भाषेत पुढे सरसावले. नंतर ट्रफिक पोलीस आला, तोही त्या दोघांना त्याच भाषेत समजावू लागला. प्रकरण हमरीतुमरीवर आलं. माझ्या ड्रायव्हरने थोडा वेळ कार थांबवून ते पाहिलं, त्याला काळजीयुक्त कुतूहल होतं. कारण तोही तिथला स्थानिक होता. मला यातलं काहीच कळत नव्हतं. हा सगळा राडा त्या एकाच भाषेत चालू होता… तेही एका सुप्रसिद्ध शहराच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हायवेवर. आपण मात्र आपल्या महाराष्ट्रातच अशा सामूहिक मराठी भाषासुखाला पारखे झालो आहोत.

खासकरून मुंबईत प्रवासादरम्यान किंवा आपल्या आजूबाजूला एखाद्या व्यक्तीशी संवाद साधायचा असेल तर ती व्यक्ती अमराठी आहे, असे गृहीत धरूनच आपण त्यांच्याशी मराठीऐवजी हिंदीत गप्पा मारू लागतो. जेव्हा त्या व्यक्तीच्या बोलण्यात एखादा मराठी शब्द येतो तेव्हा आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो आणि त्यानंतर आपण त्याच्याशी मराठीत गप्पा मारू लागतो. खरंतर आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगत आपण सर्वांशी मराठीतच संवाद साधला पाहिजे.