मल्टिवर्स – सुपर ह्युमनचा भन्नाट प्रयोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ.  स्ट्रेंज

अॅडीला मिळालेली गोळी त्याचे आयुष्य बदलून टाकते. त्या गोळीच्या प्रभावाने अॅडीचा मेंदू एखाद्या सुपर कॉम्प्युटरसारखा वेग पकडतो. तो अत्यंत चपळ, हुशार आणि विविध कल्पनांचे भांडार बनतो. त्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तो प्रचंड पैसा कमावतो. पण काही दिवसांत गोळय़ांचे दुष्परिणाम अॅडीच्या शरीरावर आणि मनावर दिसायला लागतात. आता या चक्रव्यूहातून अॅडी बाहेर पडतो का? त्यासाठी ‘लिमिटलेस’ पाहायला हवा.

2011 साली आलेला नील बर्गर दिग्दर्शित limitless हा चित्रपट म्हणजे सुपर ह्युमन संकल्पनेला एका वेगळय़ा स्वरूपात सादर करणारा भन्नाट प्रयोग आहे. अॅलन ग्लिनच्या ‘द डार्क फिल्ड्स’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट उत्तम कथानकासोबत रॉबर्ट डी नीरो आणि ब्रॅडली कूपर या अभिनेत्यांच्या झकास अभिनयाने सजलेला आहे.

कथेचा नायक आहे अॅडी मोरा. न्यूयॉर्कमध्ये राहणारा अॅडी म्हणजे कुठलीही महत्त्वाकांक्षा नसलेल्या माणसाचे उत्तम उदाहरण. अॅडी आळशी आहे, त्याला मोठे असे काही ध्येय नाही, त्याला कोणतीही गोष्ट प्रेरणा देत नसते. सध्या आपल्या आयुष्यात अॅडी एक पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न करीत असतो, मात्र तेदेखील सलगपणे लिहिणे त्याला जमत नसते. अशा सुस्त आणि ध्येयहीन  अॅडीला खर्चालादेखील त्याची मैत्रीण पैसे पुरवत असते. मात्र अॅडीच्या या नाकर्तेपणाला कंटाळून आता तिनेही अॅडीला सोडून देण्याचा निर्णय घेतलेला असतो.

अशाच निराश अवस्थेत भटकत असताना अॅडीला त्याच्या पहिल्या बायकोचा भाऊ व्हर्न भेटतो. हा व्हर्न असतो ड्रग डीलर. तो या अॅडीला एक गोळी देतो आणि सांगतो की, ही गोळी अॅडीच्या सगळय़ा समस्यांवर रामबाण उपाय आहे. ही गोळी त्याचे आयुष्य बदलून टाकेल. बराच विचार करून शेवटी अॅडी ती गोळी खातो. गोळी घेऊन तो घरी परततो, तर दारात त्याच्या घराची मालकीण स्वागताला हजर असते. थकलेले भाडे जर लवकर मिळाले नाही तर ती अॅडीला हाकलून देण्याची धमकी देते. इकडे इतक्या वेळात गोळीने आपला परिणाम दाखवायला सुरुवात केलेला असतो. त्या गोळीच्या प्रभावाने अॅडीचा मेंदू एखाद्या सुपर कॉम्प्युटरसारखा वेग पकडतो. मालकिणीच्या बॅगेतले पुस्तक कायद्याच्या संदर्भातील आहे हे अॅडीच्या लक्षात येते आणि त्यासंदर्भात विविध चर्चा करून तो मालकिणीला एकदम खूश करून टाकतो.

गोळीच्या प्रभावाने जणू सुपर ह्युमन बनलेला अॅडी आता अत्यंत चपळ, हुशार आणि विविध कल्पनांचे भांडार बनलेला असतो. तो एका रात्रीत आपले अर्धवट राहिलेले पुस्तक पूर्ण करतो आणि प्रकाशकाला नेऊनही देतो. त्या गोळीच्या प्रभावाने अॅडी आता त्याच्या आयुष्यात वाचलेले प्रत्येक पुस्तक, प्रत्येक ओळ न् ओळ सहज आठवू शकत असतो. त्याची बुद्धी इतकी चाणाक्ष बनते की, अॅडीला जणू अनिर्बंध (limitless) असल्यासारखे वाटू लागते. मात्र सकाळी या गोळीचा प्रभाव उतरायला लागतो आणि  अॅडीला पुन्हा आळस जाणवायला लागतो. अॅडी व्हर्नच्या घरी जातो आणि गोळय़ांची मागणी करतो, मात्र या गोळय़ा बेकायदा असून, शरीराला अपायकारक असल्याने पुन्हा मागू नको असे व्हर्न सांगतो. मात्र या गोळीची जादू अनुभवलेला अॅडी गोळीसाठी काहीही करण्यास तयार होतो.

गोळीच्या बदल्यात व्हर्नने सांगितलेले काम पार पाडून अॅडी व्हर्नकडे परत येतो, मात्र मधल्या काळात कोणीतरी व्हर्नचा गोळी झाडून खून करतो. घाबरलेला अॅडी पोलिसांना कळवण्यापूर्वी व्हर्नचे संपूर्ण घर तपासतो. त्यात त्याला हव्या असलेल्या गोळय़ांचा मोठा साठा आणि पैसेदेखील गवसतात. आता या गोळय़ांच्या मदतीने  अॅडीची प्रतिभा विलक्षण खुलते. तो विविध भाषा शिकायला लागतो, वाद्य वाजवायला लागतो. अनेक विषयांत अभ्यासू मते मांडून तो लोकांना आपल्याकडे आकर्षित करायला लागतो. एकलकोंडा, सुस्त अॅडी आता लोकांच्या गळय़ातला ताईत बनायला लागतो. आपल्या वाढत चाललेल्या ज्ञानाचा फायदा उचलण्यासाठी अॅडी शेअर मार्केटमध्ये शिरतो आणि चित्रपट एक वेगळे वळण घेतो.

अॅडीच्या बुद्धिमत्तेने तो प्रचंड पैसा कमावतो. अधिक गुंतवणुकीसाठी तो गुंडाकडून कर्जदेखील घेतो. अॅडीच्या आयुष्यात आता एक प्रसिद्ध उद्योगपती प्रवेश करतो. अॅडीच्या बुद्धिमत्तेने भारावलेला हा उद्योगपती त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक असतो.

अॅडीच्या आयुष्यात आता एका बाजूला गुंड तर दुसऱ्या बाजूला प्रसिद्ध उद्योगपती यांचा प्रवेश होतो, मात्र त्याचवेळी व्हर्नच्या खुनात अॅडीचा हात असल्याचा संशय पोलीस व्यक्त करतात आणि अॅडीविरुद्ध कारवाई सुरू होते. भरीस भर म्हणून आता इतके दिवस घेतलेल्या गोळय़ांचे दुष्परिणाम अॅडीच्या शरीरावर आणि मनावरदेखील व्हायला सुरुवात होते. आता या चक्रव्यूहातून अॅडी बाहेर पडतो का? कसा पडतो? त्याला योग्य तो धडा मिळतो का? हे प्रश्न सोडवायचे तर ‘लिमिटलेस’ पाहण्याशिवाय पर्याय नाही.