मुद्दा – करदर्शन

>> बी. के. नीताबेन

कराग्रे वसते लक्ष्मी करमूले सरस्वती
करमध्ये तु गोविदः प्रभाते करदर्शनम

हाताच्या अग्रभागी लक्ष्मी आणि मूळस्थानी सरस्वतीचा वास आहे. मध्यभागी ईश्वर आहे म्हणून सकाळी डोळे उघडताच स्वतःच्या हाताचे दर्शन करावे. असे आपली हिंदुस्थानी संस्कृती शिकवते. लक्ष्मी आणि सरस्वती अर्थात वित्त आणि विद्या यांना प्राप्त करण्याचे बळ आपल्या हातात आहे. तसेच ईशकृपा, ईशप्राप्तीचे सामर्थ्यही आपल्याकडे आहे.

व्यावहारिक जीवनात जर आपण बघितले तर कोणतीही प्राप्ती कष्टाशिवाय होत नाही. एक मराठी गाणे तुम्ही ऐकले असेल… ‘अरे संसार संसार, जसा तवा चुह्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर’. हाताला चटके मिळाल्याशिवय भाकरी मिळत नाही, म्हणजेच पुरुषार्थाविना काहीही साध्य होऊ शकत नाही. म्हणूनच सकाळी डोळे उघडताच स्वतःला एक शक्तिशाली विचार देण्याची प्रेरणा या करदर्शनामध्ये आहे. आपल्या हातांना बघून हा विचार करावा की, ‘माझ्याकडे सर्व असंभव कार्य संभव करण्याची शक्ती आहे, कोणतातेही कार्य करण्याचे सामर्थ्य माझ्यामध्ये आहे’. हा विचार रोज करावा. या विचाराने आपले बळ वाढेल व आपण क्रियाशील होऊ. प्रयत्नांती परमेश्वर अर्थात प्रयत्न केला तर ईश्वरसुद्धा मिळू शकतो. ठरवले तर काहीही साध्य करू शकतो, अशी शक्ती आपल्या हातामध्ये आहे.

वित्त आणि विद्या या दोन्ही गोष्टी प्राप्त केल्यावर मनुष्याला अहंकार येऊ शकतो. पण या दोन्हीना ईश्वरासोबत जोडले तर मनुष्यामध्ये नम्रता आणि समर्पण भाव हे गुण येऊ शकतात. सकाळपासून सत्कर्म करण्याची प्रेरणा घेऊन दिवसभर कार्य करावे व रात्री त्या कार्याचे श्रेय ईश्वरचरणी अर्पण करून निश्चिंत व्हावे. या हातांद्वारे दान, पूजा अर्चना असे अनेक सत्कर्म केले जातात पण याच हातांनी पापकर्मही होतात. म्हणून केलेल्या कर्मांचे फळ हस्तरेखेद्वारे बघितले जाते. ज्या हस्तरेखेमध्ये आयुष्य, सुख, विद्या, धन, आरोग्य सर्वच बघितले जाते. या सर्वांना प्राप्त करण्याचा आधार आपले कर्मच आहेत.

दुसऱया दृष्टिकोनाने या हातांना बघितले तर शरीराच्या प्रत्येक अवयवाला हातांची साथ हवी. कोणताही अवयव दुखत असेल तर त्याला हाताचेच सहकार्य लाभते. डोळे, नाक, कान, पाय, डोके…कोणताही अंग असो त्याला मालिश करून बरे करतो. या हातांमध्ये सर्व काही करण्याचे सामर्थ्य आहे. जीवनाचे ध्येय साकार करणारे, मनुष्याला पुरुषार्थाचे प्रोत्साहन देणारे, जीवनाला कार्यशील ठेवणारे, वित्त आणि विद्या यांच्या प्राप्तीसाठी सक्षम बनावणारे तसेच ईश्वराप्रती समर्पण भाव ठेवण्याची श्रेष्ठ स्मृती देणारे हे करदर्शन आहे.

आपली प्रतिक्रिया द्या