
>>शिरीष कणेकर
परवा एका चाहत्यानं मला ‘मेसेज’ केला तो असा होता-
‘आपण लहानपणी वडिलांच्या खांद्यावर बसून देवदर्शन घ्यायचो, पण देवाचं दर्शन घेताना आपल्याला समजत नव्हतं की, आपण देवाच्याच खांद्यावर बसलोय.’
माझे डोळे डबडबून आले. हे असं का व्हायला लागलंय अलीकडे? पूर्वी असं कधीच होत नव्हतं. रडू यायला हवं तिथंही यायचं नाही अन् आता लहानसं निमित्तही पुरतं. चित्रगुप्ताचे पहारेकरी दिसायला लागल्यावर हे असं होत असावं. इहलोकीची भाडेपट्टी संपत आल्याच्या जाणीवेतून मन हळवं होत असलं पाहिजे, पण ते तरी का व्हावं? या जगाशी माझं पटत नाही, या जगाशी माझं कधी जमलं नाही. मग ‘स्वगृही’ जाताना किंवा जायच्या कल्पनेनं मला संतोष व्हायला हवा. तिथं म्हणजे आई-अण्णा, आजी-आजोबा, मावश्या सगळे असणार. ते माझ्या वाटेकडे डोळे लावून बसले असतील की पृथ्वीवरील माझं वास्तव्य वाढावं यासाठी देवाकडे शब्द टाकत असतील?
माना न माना, पण आईच्या तुलनेत बाप हा नेहमीच उपेक्षित राहत आलाय. आई, तिचं प्रेम, तिचा त्याग सगळं डोंगराएवढं असतं. बाप हा लहानसा उंचवटा असतो. डोंगरापुढे उंचवटय़ाचा काय पाड? तो आईपेक्षा उंच, आईपेक्षा मोठा होण्याचा कधीही प्रयत्न करीत नाही. त्याची आईशी स्पर्धा नसतेच मुळी. तो आपला घरात असतो एखाद्या पेपरवेटसारखा, फुलदाणीसारखा. तो आईचं कुंकू असतो, मुलांचा आधार असतो, पण त्याच्या वागण्याबोलण्यातून तसं कधीही तो दाखवत नसतो. मुलांना त्यांच्या जीवनातील बापाचं स्थान खूप उशिरा कळतं. कधी कधी कळतच नाही. काही घरांत तो बिनपगारी गडी असतो, काही घरांत तो सर्व समस्यांचं मूळ समजला जातो. त्याला कधीच आईचं वलय नसतं. दुःख आईचं, शोक आईचा, यातना आईच्या, पुत्रवियोग आईला, याला कुठं काय पडलंय? त्यानं थोडंच मुलाला जन्म दिलेला असतो? त्यानं थोडाच नऊ महिने भार सोसलेला असतो? त्यानं थोडय़ाच प्रसूतिवेदना सोसलेल्या असतात? पितृत्व असंच अलगद त्याच्या मांडीवर येऊन पडतं. आईचा नवरा म्हणून तो बाबा होतो म्हणून काय मुलं त्याला आईच्या बरोबरीनं स्थान देतील की काय? आई ‘मेन’ असते, बाप फार तर ‘सपोर्ट स्टाफ’ असतो. या लादलेल्या दुय्यम भूमिकेबद्दलही त्याची काही तक्रार नसते. पुत्रप्रेमाच्या रेसमध्ये तो नसतो म्हणून मागे पडल्याची खंतही त्याला नसते. त्यानं राबराब राबायचं, पै पैसा जोडायचा, मुलांची तरतूद करून ठेवायची (व एके दिवशी आवाज न करता मरून जायचं). त्याचं कामच आहे ते. त्यासाठीच तो जगात आलाय. करतो तर काय उपकार करतो का? ‘ब्लडी क्लेरिकल मेंटॅलिटी!’ आमच्याकडून मात्र त्यांनी कसलीही अपेक्षा बाळगायची नाही. आम्ही काय धंद्यातली गुंतवणूक होतो?
कधी कधी मात्र या बापाचं भाग्य फळफळतं. बहुधा तो गेल्यावर. पोटची पोरं त्याच्या आठवणीनं व्याकूळ होतात. ‘अब पछताये क्या होत जब चिडिया चुभ गयी खेत’. माझा एक जवळचा मित्र एकदा असाच बापाच्या आठवणीनं कसनुसा झाला होता. ‘ते कापडाच्या दुकानात विक्रेते होते’ हातातील रिकाम्या ग्लासाकडे बघत तो म्हणाला, ‘मी जाहिरात क्षेत्रातला माणूस. पाटर्य़ा नेहमीच्याच. मी अनेकदा पिऊन घरी यायचो. त्यांना ते मुळीच रुचायचं नाही, पण ते कधीही एक शब्द बोलले नाहीत. ते घाबरायचे रे मला, घाबरायचे…’
तो घळघळा रडायला लागला. काही न बोलता मी त्याचा ग्लास भरला. चिता काय जाळेल असा पश्चात्ताप जाळतो.
एकदा मी रस्ता क्रॉस करीत असताना मोबाईल वाजला. अनोळखी नंबर होता. नाशिकहून एक निवृत्त वृद्ध म्युनिसिपल कमिशनर फोनवर होता. ‘‘तुम्हाला सांगावंसं वाटलं म्हणून फोन केला’’ असं म्हणून तो त्याच्या वडिलांविषयी सांगू लागला. मध्येच उन्मळून म्हणाला, ‘‘पन्नास वर्षे झाली त्यांना जाऊन, पण हरामखोर अद्याप डोक्यातून जात नाही हो…’’
माझ्या अंगावर सरसरून काटा आला. ‘हरामखोर’ या शिवीतून इतकं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा ओथंबून येऊ शकतो हे एरवी मला खरंच वाटलं नसतं. माझ्या आसपास गाडय़ांचे हॉर्न वाजत होते. मी रस्त्याच्या मध्ये उभा होतो याचं मला भान नव्हतं. हरामखोर…
साटम नावाचे माझे पोलीस खात्यातले करारी आणि कणखर मित्र. शिवाजी पार्क जिमखान्याच्या हिरवळीवर ते मला त्यांच्या वडिलांच्या कडक शिस्तीच्या गोष्टी सांगत होते. ‘‘अहो, शिस्त म्हणजे काय? ते हातानं नाहीत तर काठीनंच मारायचे. चोरांनादेखील आम्ही कधी असं मारलं नाही…’’
एकाएकी काठीनं झोडणाऱया वडिलांच्या आठवणीनं साटमना रडू कोसळलं. तो पहाडासारखा पुरुष लहान मुलासारखा रडत होता. आता ती काठी कोमल फुलांची झाली होती.
तरुण डॉक्टर मुलगी अकाली गमावलेल्या श्रीमती नंदिनी मथुरे यांनी पेपरात दिलेल्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीत म्हटलं होतं- ‘‘स्वर्गात व्हिजिटिंग अवर्स असायला हवे होते.’’
बाप गमावलेल्या सगळय़ांची अगदी हीच भावना असणार!





























































