देवाचा व्यायाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • वरद चव्हाण 

देवदत्त नागे. संपूर्ण महाराष्ट्राचे खंडेराय. आपल्या व्यायामाविषयी अत्यंत सतर्क आणि जागरुक असतात.

नमस्कार वाचकहो, टांग टिंग टिंगा म्हटलं की रंगमंचावर धुमाकूळ घालणारे विजय चव्हाण आपल्या डोळ्यासमोर येतात. याच महाराष्ट्राच्या लाडक्या कलावंताचा मी मुलगा वरद विजय चव्हाण. बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून मीसुद्धा अभिनय क्षेत्रात पदार्पण केलंय. अभिनयाबरोबर मला व्यायामाची खूप आवड आहे. खरंतर आजचं धावपळीचं आयुष्य, ताणतणाव, प्रदूषण यात. आपल्याला निरोगी व सुदृढ आयुष्य जगायचं असेल तर व्यायाम, योगासनं या गोष्टी करायलाच हव्यात. पण आपल्यातले बरेच आळसामुळे किंवा इतर कारणांमुळे व्यायाम करायचा टाळतात. म्हणूनच मी येत आहे. ‘फुलोरा’मधून तुमच्या लाडक्या कलाकाराच्या फिटनेसचं रहस्य जे तुम्हाला व्यायाम करायला नक्कीच प्रेरणा देईल. लिखाण ही गोष्ट माझ्यासाठी नवीनच आहे. काय लिहू? किती लिहू? तुमच्यापर्यंत मला काय म्हणायचे आहे ते पोहोचेल का? तुम्हाला आवडेल का? असे बरेच प्रश्न माझ्या डोक्यात होते. कारण आम्हा कलाकारांचे माध्यम टीव्ही, रंगमंच, रुपेरी पडदा. पण पेन आणि पेपर हा माझ्यासाठी एक प्रयोगच आहे. असो. आईबाबांचा आशीर्वाद घेतो आणि देवाचं नाव घेऊन सुरुवात करतो.

देवा… देवा… करेक्ट देवानेच मार्ग दाखवला आणि मला माझा पहिला सेलिब्रेटी मिळाला. देवा म्हणजेच देवदत्त नागे म्हणजेच आपला लाडका खंडेराया. आज देवा महाराष्ट्रासाठी काय आहे हे मी सांगायची गरज नाही. त्याचं व्यायामाचं प्रेम तर प्रसिद्ध आहेच. देवाला मी नऊदहा वर्षांपूर्वीपासून ओळखतो. तेव्हा आमच्या दोघांचाही स्ट्रगल चालू होता. मी माझ्या एका मित्राबरोबर नेमके उन्हाळ्याच्या सुट्टीत अलिबागला गेलो होतो. पण सगळी हॉटेल्स फुल होती. आता काय करायचे, हा प्रश्न आमच्या समोर होता. आम्ही बोटीने मुंबईला परत येण्याचीसुद्धा तयारी केली होती. तेव्हाच माझ्या मित्राने देवाला फोन लावला. देवा अलिबागचाच असल्यामुळे त्याच्या खूप ओळखी होत्या. त्याने त्याच्या ओळखीतून आम्हाला एक हॉटेल मिळवून दिलं. तेव्हा देवा स्टार नसूनसुद्धा तो अलिबागमध्ये खूप प्रसिद्ध होता. तेव्हापासून मी त्याला, अरे तू देवासारखा धावून आलास असं म्हणालो आणि माझ्यासाठी देवदत्त हा देवा झाला आणि लेखनात माझं पदार्पण होतानाही हाच देवा माझ्यासमोर देवासारखा उभा राहिला.

खरं तर माझी आणि देवदत्तची भेट ‘देवयानी’ या मालिकेत झाली. त्याच्याबरोबर कुस्तीचा सामना करण्यासाठी एक नट शोधत होते. देवानेच माझे नाव सुचवलं आणि माझं कास्टिंग झालं. मला अजूनही आठवतंय, मढला सलग दोन रात्र आम्ही कुस्तीचे चित्रीकरण करत होतो. देवा तेव्हापासून पिळदार होता. मलाही व्यायामाची आवड होतीच. देवाने कधीच स्वतःसाठी प्रशिक्षक किंवा आहारतज्ज्ञ ठेवला नाही. त्याचं वाचन खूप आहे. विविध पुस्तक वाचून आणि जिममध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे निरीक्षण करूनच त्याने स्वतःचा आहार आणि व्यायाम ठरवला. त्याने सुरुवात जोरबैठकांपासून केली. मग मित्राच्या सल्ल्याने व्यायामशाळेत जाण्याचा निर्णय घेतला. आमच्या पिढीसाठी अरनॉल्ड आमचा देव असायचा. त्याचे फोटो जवळजवळ प्रत्येकाच्या घरात असायचे. देवाही अरनॉल्डचा फार चाहता आहे. मि. ऑलिम्पियस युनिव्हर्स आपणच होणार असंही त्याला वाटू लागले आणि त्यावर त्याने मेहनतसुद्धा केली.

पण नशीब माणसाच्या आयुष्याला कसं वळण देईल सांगता येत नाही. असेच एकदा देवाच्या आयुष्यात प्रसाद पंडित (अभिनेता) आले आणि त्यांनी देवाला अभिनय करण्याचा सल्ला दिला. देवा त्यांनाच आपला गुरू मानतो. देवाला चांगलंच माहीत होतं की त्याची शरीरयष्टी हा त्याचा यूएसपी आहे. आज वेळ बदललीय आणि देवाचा स्टारडमसुद्धा. जय मल्हारमुळे देवा महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोहोचला.

देवाला विचारल्यावर त्याने सांगितले की त्याची पहिली मैत्रीण म्हणजेच त्याची सायकल. अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर तो सायकल चालवतो. वाळूत सायकल चालवताना खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे अतिरिक्त उष्मांक जळतात. तसंच तो घोडेस्वारीचा खूप चाहता आहे. यामुळे मांड्या मजबूत होतात. एकंदरीत देवाचे व्यायामाचे ज्ञान अफाट आहे. आता त्याचं शूटिंग शेड्युलसुद्धा खूप व्यस्त झाले आहे. पण तरीही तो रात्री 11-12 वाजता पॅकअप झाल्यानंतर स्वतःची झोप विसरून गोरेगावात 24 तास ओपन व्यायामशाळेत जातो. दिवसभर शूट आणि रात्री व्यायाम यामुळे आपल्या स्नायूंवर खूप ताण येतो आणि दुखापत होण्याची शक्यता असते. देवाने या सगळ्याचा विचार करूनच आपण कमी वजन उचलून जास्त Repeation हे मारायचे ठरवले. शूट आणि व्यायाम या अतिव्यस्त दिनचर्येत संग्राम चौगुले यांनी देवाची खूप मदत केली. देवाचा कुठलाही स्नायू दुखावला गेला की तो संग्रामला फोन करायचा आणि दोघं तासन्तास दुखापत सिरियस होऊ नये यासाठी फोनवरूनच मार्ग शोधायचे. या दोघांना व्यायामाचं इतकं वेड की त्यांनी पुण्यात रात्री तीन वाजता व्यायाम केला आहे.

नुसता व्यायाम करून चालत नाही. डाएटसुद्धा अत्यंत गरजेचे आहे. असं म्हणतात की, बॉडीबिल्डिंगमध्ये 30 टक्के व्यायाम आणि 70 टक्के आहार. पण आपल्या देवाचा आहार जरा वेगळाच आहे. उकडलेली अंडी किंवा उकडलेला चिकन खाण्यापेक्षा देवा चक्क चिकन करी राइस स्वतः बनवून खातो आणि व्हेज खायचे असेल तर वरणभात. विश्वास बसत नाही. भातामुळे पोट वाढते असा अनेकांचा समज आहे पण देवाने या समजुतीला पुसून टाकले आहे. भाताबरोबरच तो पराठेसुद्धा बनवतो. चिकन मात्र त्याला फ्रेश पाहिजे असते. अलिबागच्या ओळखीच्या चिकनवाल्याकडून तो फ्रेश चिकन आणतो. त्याचबरोबर त्याला उकडलेले हरभरे खायला आवडतात. पोळी खाणं टाळतो. देवाला व्यायाम चीट करायला पण खूप आवडतो. मूड आला की मुंबई येथील बडेमियाँमध्ये जाऊन बिर्याणी किंवा कबाब खायला त्याला खूप आवडते. प्रोटिनशेक तो पाण्यानेच घेतो. दुधातून नाही कारण एक विशिष्ट वयानंतर दुधामुळे लॅक्टो इनटोलेरेन्स वाढू शकतं. शूटला शक्यतो तो त्याचा डबा बरोबर ठेवतो. दर दोन तासांनी खातोच असा नाही पण दिवसाला तीन-चार मिल्स नक्कीच होतात.

शूटला वेळ मिळाला की तो झोप काढून घेतो. कारण व्यायामासाठी झोप अत्यंत आवश्यक आहे. दर वर्कआऊटनंतर मसल्स रिलॅक्स होणे गरजेचे आहे. देवाला व्यायामाची इतकी क्रेझ आहे की त्याने स्वतःला सर्व व्यसनांपासून लांब ठेवलंय. असं असलं तरी त्याला चहा खूपच प्यायला आवडतो. त्यामागचे कारण विचारल्यावर तो म्हणतो की मला ऊर्जा आणण्यासाठी चहा उपयोगी पडतो. आताच्या व्यायाम करणाऱ्या पिढीला देवाला आवर्जून सांगावंसं वाटतं की खूप व्यायाम करा. पण स्टेरॉईडपासून लांब राहा. स्टेरॉईडचे रिझल्ट नक्कीच लवकर दिसतात. पण ते स्लो पॉयझिंगसारखा आहे. कधी तुम्हाला मरणाच्या दारात ठेवेल. तुम्हालासुद्धा कळणार नाही. देवाचे फॅन्स आज महाराष्ट्रात नाहीत तर जगभरात आहेत. अनेक लोकांनी देवाच्या खंडेराया म्हणून पाया पडताना मी पाहिलंय.

हा लेख वाचून नक्कीच तुम्हाला व्यायाम करायला प्रेरणा मिळेल याची मला खात्री आहे. मी दर आठवड्यात नवीन कलाकारांचा फिटनेस फंडा तुमच्यापर्यंत पोचवायला उत्सुक आहे आणि तुम्हालासुद्धा तुमच्या आवडत्या कलाकारांचे फिट राहण्याचे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर दर शनिवारी हा फुलोरा वाचायला विसरू नका. भेटूया पुढच्या शनिवारी.

[email protected]