निमित्त – ती रात्रवैऱ्याची…

26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला काल 14 वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्याच्या कटू आठवणींनी आजही अस्वस्थ होते. 26 नोव्हेंबर रोजी जी. टी. इस्पितळात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या डॉ. सोनाली खैरमोडे-लोखंडे यांनी केलेली रुग्णसेवा, त्यांचे धारिष्टय़ नक्कीच वाखणण्यासारखे आहे.

ती रात्र आठवली की आजही काळजाचा ठोका चुकतो. कारण ती रात्र वैऱ्याची होती, कधीही विसरता न येणारी. 26 नोव्हेंबर 2008 या दिवशी डॉक्टर या नात्याने गोकुळदास तेजपाल इस्पितळात (जी. टी. हॉस्पिटल) काम करत असताना प्रत्यक्ष पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या आठवणींनी मन अस्वस्थ, तर डोकं सुन्न होतं. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आपल्या मुंबईवर आत्मघातकी हल्ला करून हिंदुस्थानला मोठा धक्का दिला होता. तसा काळाकुट्ट दिवस आयुष्यात पुन्हा कधी बघायची वेळ येऊ नये हीच प्रार्थना करून हल्ल्यातील मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहते.

26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 14 वर्षे पूर्ण झाली. एक तप लोटला असला तरी त्या कटू आठवणींनी मनातल्या एका कप्प्यात कायमचेच घर करून ठेवले आहे. ती भयानक रात्र कधीच विसरता येणार नाही. 26 नोव्हेंबर रोजी जी. टी. इस्पितळात अपघात वैद्यकीय अधिकारी म्हणून माझी रात्रपाळीला नेमणूक होती. रात्री 9 वाजता नेहमीप्रमाणे मी कामावर रुजू झाले. सर्वकाही ठिकठाक सुरू होते. अपघात विभागातील कामकाजसुद्धा नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होते. तेव्हा पुढे काय पाहायला मिळणार आहे याची सुतराम कल्पनादेखील नव्हती. नियतीच्या मनात काही औरच होते. कामाला सुरुवात करून अर्धा तास लोटला नसेल तोच 9.30 वाजण्याच्या सुमारास दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेली पहिली व्यक्ती इस्पितळात दाखल झाली. पण तोपर्यंत मुंबईवर ओढवलेल्या संकटापासून आम्ही अनभिज्ञच होतो. त्या जखमीला तपासले असता त्यांच्या अंगावर खोलवर गेलेल्या बुलेटच्या गंभीर जखमा होत्या. कोणी तरी ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या असाव्यात असाच समज तेव्हा आमचा झाला होता. परंतु या जखमा कशा झाल्या असे विचारल्यावर त्याने जे सांगितले ते ऐकून पायाखालची जमीनच सरकली. दोन अज्ञात व्यक्ती एके- 47 रायफलने अंदाधुंद गोळीबार करत सीएसटीहून पुढे येत असल्याचे त्यांनी सांगितले. काहीतरी विपरीत घडत असल्याचे तेव्हा लक्षात आले. मग क्षणाचाही विलंब न लावता मी मास कॅज्युअल्टी जाहीर केली. कॅज्युअल्टीमधील सायरन वाजवून इस्पितळातील सर्व डॉक्टर्सना अपघात विभागात तत्काळ बोलावून घेतले. लगोलग मुंबई पोलिसांचे नियंत्रण कक्ष तसेच जे. जे. आणि जी. टी. इस्पितळाच्या अधीक्षकांना कॉल करून दहशतवादी हल्ल्याची माहिती दिली. दहशतवादी अंदाधुंद गोळीबार, ग्रेनेड हल्ला करीत असल्याचे समजल्यावर काही क्षणासाठी काय करावे आणि काय नको अशी अवस्था तेव्हा झाली होती. एकामागून एक रक्तबंबाळ झालेले जखमी नागरिक इस्पितळात दाखल होत होते. त्यापाठोपाठ एके-47 रायफलमधून बाहेर पडणाऱ्या गोळ्यांचा आवाज कानावर धडकत होता.

अपघात विभागात तेव्हा सर्वांचीच अक्षरशः भंबेरी उडाली होती. काही वेळानंतर जखमींपाठोपाठ हल्ल्यात निष्पाप बळी पडलेल्या नागरिकांचे मृतदेह येऊ लागले होते. इस्पितळात एव्हाना भयंकर वातावरण निर्माण झालेले असताना वैद्यकीय अधीक्षकांचा फोन आला आणि त्यांचे बोलणे ऐकूण हातपायच गळाल्यासारखे झाले. दोन दहशतवादी गोळीबार करीत जी. टी. इस्पितळाच्या गेटमधून आत शिरले असल्याचे अधीक्षकांनी सांगितले होते. ती वेळ खूप महत्त्वाची आणि परिस्थितीला न डगमगता सामोरे जाण्याची होती. हिंमत हरून चालणारे नव्हते. इतका वेळ केवळ जखमींवर उपचार करणे सुरू होते. परंतु आता मात्र माझ्या स्वतःच्या, वैद्यकीय पथक, नर्सेस, वॉर्ड बॉय, शिकाऊ डॉक्टर तसेच दाखल रुग्णांच्या जीविताचा प्रश्न उभा राहिला होता. दहशतवादी एके-47 मधून झाडत असलेल्या गोळ्या आणि फेकत असलेले ग्रेनेड कधी कुठून येतील याची काही शाश्वती नव्हती. त्या वेळेस दहशतवाद्यांना चकवा देणे हाच एकमेव मार्ग होता. तेवढय़ा गडबडीत एक शक्कल लढवली आणि प्रसंगावधान राखत अपघात विभागातील सर्व लाईट्स बंद करून काळोख केला आणि सर्वांना टेबलाखाली शांतपणे पडून राहण्याच्या सूचना केल्या. 15 ते 20 मिनिटानंतर दोघे दहशतवादी गेटच्या बाहेर पडून मेट्रोच्या दिशेने गाडीतून पळून गेल्याची माहिती धडकली. ते निघून गेल्याचे ऐकून थोडे हायसे वाटले, पण त्या कुरकर्म्यांनी जाता जाता आमच्या दोन वॉर्ड बॉयच्या शरीराची चाळण करून त्यांचा जीव मात्र घेतला होता.

अपघात विभागात बघावे तिथे रक्ताचे सडे सांडलेले होते. एकीकडे जखमी तर दुसऱ्या बाजूला मृतदेह असे भयंकर चित्र तेव्हा होते. पण हळहळ करत बसण्याची ती वेळ नव्हती. जखमींवर झटपट उपचार करणे हेच तेव्हाचे शिवधनुष्य आमच्या समोर होते. तितक्यात एक मृतदेह आला आणि धक्काच बसला. कारण मुंबईतली गुन्हेगारी मोडीत काढण्यात भरीव कामगिरी करणारे पोलीस निरीक्षक विजय साळसकर यांचा तो मृतदेह होता. त्यांचे पार्थिव पाहून डोळे पाणावले. पण तेव्हा खचून न जाता देशावासियांसाठी मी आणि माझे सहकारी रुग्णसेवा करत राहिलो. रात्रभर मृत्यूचे तांडव सुरूच होते. रात्र वैऱ्याची काय असते हे त्या दिवशी मी अनुभवले. तशी काळरात्र पुन्हा माझ्या देशावर, माझ्या मुंबईच्या वाटेला येऊ नये अशीच प्रार्थना करते.

पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हल्ला अनुभवल्यानंतर त्यावेळी माझ्या हातून झालेली रुग्णसेवा आणि त्यावेळी प्रसंगावधान राखत केलेल्या उपाययोजना, घेतलेले निर्णय आणि सहकाऱ्यांना केलेल्या सूचना यातून जगण्याची प्रेरणा मिळाली हे नक्की. त्यामुळे शेवटी एवढेच सांगेन-

जिंदगी की असली उडान अभी बाकी है
आपके इरादों का इम्तिहान अभी बाकी है!
अभी तो नापी है, मुठ्ठीभर जमीन
अभी तो सारा आसमान बाकी है!

(लेखिका सध्या कस्तुरबा इस्पितळात वैद्यकीय अधिकारी आहेत)