‘आर्य थिअरी’ला धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. प्रबोध शिरवळकर

उत्तर प्रदेशातील सनोली तसेच हरयाणातील राखीगढी येथील उत्खननात सापडलेले दोन रथ, सहा चाके तसेच मानवी सांगाडय़ांवर आधुनिक पद्धतीने झालेले शास्त्रीय संशोधन आर्य आपल्या देशात बाहेरून आल्याच्या थिअरीला धक्का देणारे आहे. त्यामुळे आर्य बाहेरून आले या आजवर सातत्याने बिंबविलेल्या सिद्धांताचा पुनर्विचार करणे क्रमप्राप्त आहे. आर्य बाहेरून आल्याचा दाव्यासंबंधीचे सर्वच पुरावे नव्याने तपासणे आणि त्याची फेरमांडणी करणे गरजेचे आहे.

अखंड हिंदुस्थानातील पहिले नागरीकरण म्हणून ओळखली जाणारी संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती. या संकृतीचा शोध १९२० साली पहिल्यांदा हडप्पा या ठिकाणी लागला. तेव्हापासून गेली ९८ वर्षे या संस्कृतीवर विविध अंगाने पुरातत्व शास्त्रज्ञ, पुरा पर्यावरणवादी, भूगर्भ शास्त्रज्ञ वगैरे संशोधनाचे काम करत आहेत. अनेक वर्षे काम चालू असूनसुद्धा या संस्कृतीबद्दल असलेले गूढ कमी झालेले नाही. हिंदुस्थान आणि पाकिस्तान येथे मोठय़ा प्रमाणावर या संस्कृतीच्या वसाहतींचे उत्खनन झालेले आहे.

या संस्कृतीची सुरुवात इसवीसन पूर्व सात हजार या काळात झाली. याचे पुरावे मेहेरगढ आणि भिराण्णा या ठिकाणी सापडले आहेत. या काळाला पूर्व सिंधू संस्कृती म्हणून ओळखले जाते. त्यानंतर परिपक्व सिंधू संस्कृतीचा कालखंड येतो तो २६०० ते २००० इसवीसन पूर्व असा आहे. यानंतर आपल्याला सिंधू संस्कृतीचा ऱहास सुरू झालेला दिसतो. या काळाला उत्तर सिंधू संस्कृती म्हणतात आणि साधारणपणे इसवीसन पूर्व १५०० मध्ये सिंधू संस्कृतीचा नाश झालेला दिसतो.

सिंधू संस्कृतीचा आणि आर्य लोकांचा परस्पर काय संबंध होता, यासंदर्भात विविध कामे झालेली दिसून येतात. त्यातील काही सिंधू संस्कृती म्हणजेच आर्य संस्कृती होती हे दाखवतात तर काही या दोघांचा परस्पर संबंध नव्हता हे दाखवतात.

आर्य लोक बाहेरून हिंदुस्थानामध्ये आले, या सिद्धांताची सुरुवात मॅक्समुल्लर यांच्या कामापासून झालेली दिसते. त्यांनी वेदांचा अभ्यास करून त्यांचा कालखंड इसवीसन पूर्व १५०० असावा असा सिद्धांत मांडला. तसेच हे वैदिक आर्य लोक कॉकॅसियस प्रदेशातून आले असावेत असे सांगितले.

मॅक्समुल्लर यांनी मांडलेल्या या निष्कर्षाची सांगड पुरातत्व कार्यात, विशेषतः सिंधू संस्कृतीशी घालण्याचे काम पहिल्यांदा रामप्रसाद चंदा यांनी केले. त्यांच्या म्हणण्यानुसार आर्य लोक हे सिंधू संस्कृतीच्या ऱहासाचे मुख्य कारण होते. या सिद्धांताचा वापर मॉट्रीमर व्हीलर यांनी आपल्या कामात केलेला दिसून येतो. मोहेंजोदारो येथे काही मनुष्यांचे सांगाडे रस्त्यावर पडलेले सापडले. या पुरातत्वीय शोधाचा वापर करून त्यांनी सांगितले की, आर्य लोकांनी सिंधू संस्कृतीच्या वसाहतीवर आक्रमण करून त्यांचा ऱहास केला.

आर्य लोक बाहेरून आले असा दावा करणाऱयांनी दोन गोष्टी दाखवून दिल्या. ज्या आर्य लोकांच्या म्हणून मानल्या जातात. त्या म्हणजे घोडा आणि लोखंड. या दोन्ही गोष्टी आपल्याला सिंधू संस्कृतीमध्ये पाहायला मिळत नाहीत. तसेच सिंधू संस्कृतीमध्ये वेदिक देवी-देवता सापडत नाहीत. यासंदर्भात इसवीसन पूर्व १८०० मधला एक शिलालेख बोगास्कोई, टर्की येथे सापडला आहे. त्यामध्ये आपल्याला वेदिक देवी-देवता यांची नावे सापडतात. या सर्व बाबींच्या जोरावर आर्य लोक हे सिंधू संस्कृतीपेक्षा वेगळे होते आणि बाहेरून आले होते असे म्हटले जाते.

यासंदर्भात आणखी काही पुरावे सिंधू संस्कृतीच्या वसाहतींमधून सापडलेले आहेत. गुजरातमधील सुरकोतडा आणि शिकारपूर या ठिकाणी घोडय़ाची हाडे सापडलेली आहेत. परंतु त्यावर शास्त्रज्ञांचे एकमत नाही. काही लोकांच्या म्हणण्यानुसार ही हाडे रानटी गाढवांची आहेत. त्याचबरोबर लोथल येथून घोडय़ांची मातीची प्रतिमा सापडलेली आहे. तेव्हा यासंदर्भात परस्पर विरोधी मते जरी असली तरी तो घोडा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात नव्यानेच झालेले उत्तर प्रदेशातील सनोली येथील उत्खनन महत्त्वाचे आहे. या उत्खननात दोन रथ आणि सहा चाके दफन भूमीत सापडलेली आहेत. या वसाहतीचा कालखंड इसवीसन पूर्व २००० ते १८०० असा आहे. हा कालखंड उत्तर सिंधू संस्कृतीशी सांगड घालणारा आहे. त्यामुळे प्रत्यक्षात तरी तेथे घोडय़ाचे अवशेष किंवा सांगाडा सापडला नसेल तरी त्यावेळी घोडे असण्याची शक्यता मोठी आहे. तसेच ज्या सरस्वती नदीचा उल्लेख वारंवार वेदांमध्ये येतो आणि नगरे व शहरे यांचा उल्लेख दिसतो त्याचा जर विचार केला तर या नदीच्या काठी आपल्याला फक्त सिंधू संस्कृतीच्या वसाहती पाहायला मिळतात. तसेच सरस्वती नदीच्या काठावर असणाऱया वसाहतींमध्ये अग्नी कुंड, चिता या गोष्टी सापडतात. जसे की कालिबंगा, राखीगढी आणि बिनजोर. हे अवशेष सरस्वती नदीच्या बाहेरील सिंधू वसाहतीमध्ये सापडत नाहीत. त्याचबरोबर पशुपती, मातृदेवता इत्यादी आपल्याला सिंधू संस्कृतीच्या वसाहतीत पाहायला मिळतात.

नव्यानेच झालेले माणसांच्या हाडावरचे शास्त्राrय संशोधन तसेच मिळालेले रथ, हे सर्व आपल्याला नक्कीच पुनर्विचार करायला भाग पाडते की खरंच आर्य बाहेरून आले की ते येथीलच होते. हे नवे संशोधन आणि निष्कर्ष म्हणूनच ऐतिहासिक तसेच आजवरच्या दाव्यांना धक्का देणारे आहेत. म्हणूनच आर्य बाहेरून आल्याचा दाव्यासंबंधीचे सर्वच पुरावे पुन्हा नव्याने तपासणे आणि त्याची फेरमांडणी करणे गरजेचे आहे. ही नव्या वळणाची सुरुवात आहे. अर्थात यावर आणखी शोध आणि अभ्यास चालू आहे. लवकरच अजून प्रकाश पाडणारी माहिती उजेडात यईल आणि इतिहासाला नवीन वळण मिळेल यात शंका नाही.

जुळणारा डीएनए
राखीगढी, हरियाणा येथे नुकतेच मोठे उत्खनन कार्य पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयाच्या पुरातत्त्व विभागाचे प्रमुख आणि या संशोधनाचे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. वसंत शिंदे यांनी केले. या कामात त्यांना ४० मनुष्यांचे सांगाडे सापडले आहेत. हे सर्व सांगाडे सिंधू संस्कृतीचे आहेत. अत्यंत शास्त्राrय पद्धतीने या सांगाडय़ांवर काम करण्यात आलेले आहे. पुरातत्व शास्त्राच्या इतिहासात प्रथमच तीन सांगाडय़ांमधून पूर्वीचा DNA मिळाला आहे. हे काम संयुक्त पद्धतींनी CCMB, हैदराबाद या संस्थेबरोबर करण्यात आले. यामधील नवीन पुरावे असे दाखवतात की, सिंधू संस्कृतीचे लोक ही इथलीच होती. आज राखीगढी येथे राहणाऱया लोकांचा DNA या सिंधू संकृतीच्या लोकांशी जुळतो. म्हणजेच सिंधू संस्कृतीचे लोक हे इथलेच होते. या लोकांमध्ये इराणी लोकांचा DNA थोडय़ा प्रमाणात मिळतो. परंतु हा पुरावा इराणी लोकांशी असलेले संबंध दाखवतात.

(लेखक पुरातत्त्वतज्ञ आणि पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत.)