
>> संजय मिस्त्री
आबिद सुरती हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. ते पेंटर आहेत, पटकथा लेखक, नाटककार, लेखक, व्यंगचित्रकार आहेत. त्यांच्या अनेक कथा-कादंबऱया गाजल्या आहेत. त्यांची ‘कार्टून कोना ढब्बूजी’ ही व्यंगचित्रे, ‘बहादूर’, ‘इन्स्पेक्टर आजाद’ आदी धाडसी पात्रेही एकेकाळी गाजली. अर्थात यापेक्षाही त्यांचे एक आगळेवेगळे काम सध्या लक्षवेधी ठरले आहे. सध्या त्यांनी पाणीप्रश्नी जनजागृती चालवली आहे. ‘ड्रॉप डेड’ ही पाणी वाचविणारी संकल्पना त्यांनी अमलात आणली आहे. ते आणि त्यांचा प्लंबर सहकारी पाण्याचा थेंब वाया जातो तेथे प्रत्यक्ष जाऊन वाया जाणारे पाणी वाचवतात. अशा या ‘पाणी’दार व्यंगचित्रकाराला सलाम!
व्यंगचित्रकार समाजातील समस्या आपल्या कुंचल्यातून, रेषेतून मांडतो. पण आपल्या देशात असा एक व्यंगचित्रकार आहे ज्याने पाणी समस्या फक्त आपल्या व्यंगचित्रातूनच मांडली नाही, तर घरोघरी जाऊन पाण्याचा एकेक थेंब वाचविण्यासाठी दिवस-रात्र एक केला. आबिद सुरती हे त्या व्यंगचित्रकाराचे नाव.
साधारण पन्नास वर्षांपूर्वी, अगदी वीस-पंचवीस वर्षांपूर्वीही पुस्तेक, मासिके, दैनिके, साप्ताहिके यांना अनन्यसाधारण महत्त्व होते. जगातील अनेक भाषांतून नियतकालिके प्रसिद्ध होत आणि त्यांचे खप लाखो प्रती असत. हिंदीमधील ‘टाइम्स ऑफ इंडिया’ची अनेक प्रकाशने त्यावेळी लोकप्रिय होती. त्यामध्ये ‘फिल्म फेअर’, ‘माधुरी’, ‘धर्मयुग’, ‘पराग’ ही काही प्रकाशने. ‘धर्मयुग’ हे लाखो प्रतींचा खप असलेले साप्ताहिक.
महाराष्ट्रापासून खाली दक्षिण हिंदुस्थानात अनेक व्यंगचित्रकार तयार झाले, पण उत्तर हिंदुस्थानात हास्य-व्यंग कवी आणि त्यांच्या कविताच जास्त लोकप्रिय. व्यंगचित्र फारशी उत्तर हिंदुस्थानात दिसत नसत. अशा साहित्यिक वातावरणात ‘धर्मयुग’चे संपादक धर्मवीर भारती यांनी एका व्यंगचित्रकाराला संधी दिली. आबिद सुरती हे ते व्यंगचित्रकार. त्यांची ‘धर्मयुग’ साप्ताहिकात ‘कार्टून कोना ढब्बूजी’ नावाची व्यंगचित्र मालिका, कार्टून स्ट्रीप चालू झाली आणि वाचकांनी ती अक्षरशः डोक्यावर घेतली. इतकी की ती कार्टून स्ट्रीप तब्बल तीस वर्षे सातत्याने ‘धर्मयुग’मध्ये प्रसिद्ध होत होती. लाखो वाचक त्या ‘कार्टून कोना ढब्बूजी’ची दर आठवडय़ाला वाट पाहत असत.
हिंदुस्थानात परदेशी चित्रकथा कॉमिक्स लोकप्रिय होत होती. त्याचवेळी काही संपादकांना वाटू लागले की परदेशी हीरोंच्या चित्रकथा छापण्यापेक्षा संपूर्ण हिंदुस्थानी असलेल्या काही चित्रकथा प्रसिद्ध करू. म्हणून संपादकांनी त्या चित्रकथांसाठी कथा लिहिण्याचे काम आबिद सुरतींवर सोपविले. त्यांनी त्या संधीचे सोने केले आणि त्यांनी ‘बहादूर’, ‘इन्स्पेक्टर आजाद’, ‘इन्स्पेक्टर विक्रम’, ‘शुजा’ अशी अनेक धाडसी पात्रे निर्माण केली, जी प्रचंड लोकप्रिय झाली.
गोविंद ब्रह्मगिया यांच्या अफलातून चित्र रेखाटनाने तर ती आणखीनच लोकप्रिय झाली. आबिद सुरती यांचा जन्म 5 मे 1935 चा. त्यांचे बालपण डोंगरी येथे गेले. त्यानंतर त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्मध्ये प्रवेश घेतला, पण चित्रकलेतून फारसे पैसे मिळणार नाहीत म्हणून त्यांनी काही काळ चित्रपट व्यवसायात काढला. धर्मेंद्रच्या चित्रपटांसाठी त्यांनी काम केले, गुजराती नाटके लिहिली. त्यांचे बालपण पाणी टंचाईग्रस्त भागात गेले. पाणी न मिळाल्यामुळे होणारे वाद, भांडणे त्यांनी पाहिली. त्यांच्या आत समस्यांविरुद्ध लढणारा व्यंगचित्रकार जागा झाला, पण यावेळी त्यांनी हातात कुंचला घेण्याऐवजी प्लंबरचे साहित्य घेतले आणि वाया जाणारा एकेक पाण्याचा थेंब वाचविण्यासाठी कष्ट करू लागले. आबिद सुरती यांनी अस्वस्थ होऊन ‘ड्रॉप डेड’ ही पाणी वाचवणारी संकल्पना अमलात आणली. आपले प्लंबर सहकारी यांच्या मदतीने जिथे जिथे पाण्याचा थेंब वाया जातो तिथे प्रत्यक्ष जाऊन ते गळणारे थेंब थांबवितात. पोस्टर्स आणि माहितीपत्रकांतूनही त्यांनी हा प्रसार मोठय़ा प्रमाणात चालविला आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 1993 साली राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. आज वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षीही त्यांचा उत्साह तरुणाला लाजविणारा आहे.
गुजराती, हिंदी भाषेत नाटके लिहून, दिग्दर्शित करूनही हा माणूस अजिबात नाटकी नाही. आतापर्यंत त्यांच्या ‘ड्रॉप डेड’ उपक्रमातून त्यांनी दहा दशलक्ष लिटर्सचे पाणी मुंबईतील वाचविले आहे. एकेका क्षणाचे जसे मोल आहे तसे एकेका थेंबाचे मोल आहे. थेंबे थेंबे तळे साचे, तसे थेंबे थेंबे पाणी वायाही जाते.
एकदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे गप्पा मारत बसले होते. गप्पा चालू असतानाच बाळासाहेब ठाकरे अचानक उठले आणि बाजूच्या रूममध्ये गेले. काही मिनिटांत परत आले. बाबासाहेब पुरंदरे यांनी बाळासाहेबांना मध्येच उठून का व कुठे गेला होता असे विचारले. त्यावर बाळासाहेब म्हणाले, ‘बाजूच्या खोलीत टप टप असे नळाचे पाण्याचे थेंब पडत होते. त्या आवाजाने, पाणी वाया जाण्याने मी अस्वस्थ झालो. म्हणून जाऊन आधी नळ बंद केला.’ सागरासारखं ज्यांचं जीवन होतं अशांनाच या पाण्याचं जीवनाचं महत्त्व कळतं.


























































