
>> जयेश राणे
राज्यात उष्णतेचे चटके बसत आहेत. ‘ते काय थोडे दिवस बसतील, ते सहन करायचे’ हे वाक्य आहे बुद्धी असूनही निर्बुद्ध असल्याप्रमाणे वागणाऱ्या माणसाचे. म्हणजे तुमचे आमचे. याचा क्षीण घालवण्यासाठी सरबत, विशेषतः फ्रीजचे थंड पाणी, बर्फ आहेच. व्यावसायिक संकुलांत (बिझनेस पार्क) वातानुकूलित यंत्राचा उपयोग बारमाही चालू असतो. त्यात भर म्हणून ‘आगीत तेल टाकावे’ तसे घरगुती वातानुकूलित यंत्रांचाही उपयोग आताच्या गरमीत वाढल्याचे दिसत आहे. या यंत्राद्वारे बाहेर फेकल्या जाणाऱ्या उष्णतेमुळेही वातावरणातील असहाय्य गरमी वाढण्यास, ती टिकून राहण्यासाठी सहाय्यच होते, याकडेही लक्ष असावे. असे होत असले तरी त्या यंत्राचा उपयोग करणारे त्याचा उपयोग थांबवणार आहेत असेही नाही. स्वतः थंड राहायचे आणि बाहेरचे वातावरण उष्ण करण्यासाठी हातभार लावायचा.
या खुळचटपणामुळेही वाढणारी उष्णता उन्हाच्या चटक्यांची तीव्रता वाढवते. साधारण जून महिन्याच्या पहिल्या सप्ताहापर्यंत ती सहन करावी लागते. संगणकाचे युग आहे, त्याचा उपयोग कार्यालयीन वेळेत 8 ते 12 तास अथवा अधिक होतो. त्यामुळे संगणकाला हानी पोहोचू नये यासाठी असलेले वातानुकूलित यंत्रांचे प्रयोजन म्हणजे शारीरिक हानीच आहे. कार्यालयात थंडाव्याची सवय झाल्याने घरी त्याच्याविना चैन पडत नाही. काहिली झाली की त्यापासून दिलासा मिळण्यासाठी वातानुकूलित यंत्राचा उपयोग करताना निसर्गाचा विचार होत नाही. वीज आहे म्हणून त्या यंत्राचा उपयोग होत आहे, अन्यथा त्याचा उपयोग शून्यच. अचानक वीज गेल्यावर यंत्र थांबले की याची जाणीव प्रकर्षाने होते आणि पुन्हा वीज येण्याची आतुरतेने वाट पाहिली जाते.
प्रतिवर्षीचा उन्हाळा आधीच्या वर्षांच्या तुलनेत अधिकच असतो. असेच गेली काही वर्षे चालू आहे. उष्णतेचे चटके बसू लागले की, ‘यंदा काही खरे नाही’ असे म्हणत मार्चपासून जूनमध्ये पाऊस पडेपर्यंत दिवस ढकलायचे अशीच मानसिकता झाली आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हे पचनी पडत नाही आणि पडेल अशी सुतराम शक्यताही नाही. याऐवजी ‘वातानुकूलित यंत्र लावा, थंड व्हा’ असा पळपुटा पर्याय स्वीकारून उष्णतेच्या झळांपासून स्वतःचा बचाव चालू आहे. एका यंत्रावर भार येतो म्हणून दोन यंत्रे लावतील, पण चुकूनही एक रोप लावणार नाहीत. या यंत्राचा उपभोग न घेता उष्णतेला तोंड देणारेही असंख्य जीव आहेत. इमारतींकडे पाहिल्यावर या ठिकाणी किती अशी यंत्र आहेत, हे लक्षात येते. तोच भाग बंगल्यांच्या संदर्भातही आहे, पण परिसरात झाडे मात्र औषधालाही दिसत नाहीत. एका यंत्राशी जितकी जवळीक आहे, त्याच्या तुलनेत झाडांशी जवळीक सोडाच, असलेल्या झाडांवर कुऱ्हाडी चालवून, कटरने कापून तो परिसर मोकळा करूनच सुटकेचा निःश्वास सोडण्यात धन्यता मानून आमच्या पुढे झाडे काय चीज, असा प्रकार सूरू आहे.
‘गरमीपासून बचाव होण्यासाठी वातानुकूलित यंत्र आहे. अशात कुठे झाडे लावण्याचा खटाटोप करणार? कोण त्यांची देखभाल करणार? आमच्याकडे जागा नाही’ असे रडगाणे गाणारेच अनेक आहेत. ‘सुक्याबरोबर ओलंही जळतं’ त्याप्रमाणे उन्हाच्या झळांनी सर्वच भाजून निघतात. एप्रिलमध्येच उन्हाने विक्रम केला आहे. तेव्हा पुढील काळात गरमी किती पटीने असेल, याचा अंदाज प्रत्येकाला वर्तमान स्थितीवरून असेलच. ‘सूर्य आग ओकतोय’ असे म्हणून मोकळे होणारे एवढंच बोलून गप्प बसतील. बाकी त्यांच्याकडून निसर्गाच्या वाढीसाठी, त्याचे जतन करण्यासाठी प्रयत्न होणे दूरच.





























































