
>> आशुतोष बापट
वीणा गवाणकर हे नाव घेतलं की, चटकन डोळ्यांसमोर येणारं दुसरं नाव म्हणजे ‘एक होता कार्व्हर’! एखाद्या चरित्राशी त्याच्या लेखकाचं नाव कायमचं जोडलं गेलेलं असणं म्हणजे काय हे यावरून दिसून येतं. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हा अमेरिकेत जन्मलेला एक अनाथ गुलाम, परंतु त्याने जागतिक कृषी क्षेत्रात जी क्रांती घडवून आणली त्याची यच्चयावत कथा वीणाताईंनी इतक्या सुंदर रीतीने मराठी लोकांसमोर मांडली की, मराठी लोकांनी पण त्यांचे हे प्रयत्न डोक्यावर घेतले. ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकाच्या तब्बल 42 आवृत्ती प्रकाशित झाल्या. कार्व्हरसोबत वीणाताईसुद्धा मराठी वाचकांच्या परिचित झाल्या. मराठी सारस्वतात अनेक विषयांवर अनेक लोक लिखाण करीत असताना वीणाताईंनी अगदी वेगळा मार्ग चोखाळला. जागतिक स्तरावर ज्या व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवला आहे, त्यांच्या संशोधनामुळे संपूर्ण जगाला जो फायदा झालेला आहे, अशा व्यक्तींचा परिचय वीणा गवाणकर या लेखिकेने आपल्यासमोर पुस्तक स्वरूपात मांडला आहे.
वीणाताई चार वर्षे संभाजीनगर इथल्या मिलिंद कला महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून नोकरीला होत्या. त्या चार वर्षांत त्यांनी जे मिळेल ते वाचून काढले आणि त्यांना वाचनाचे व्यसनच लागले, पण त्यांचा ओढा मात्र आत्मचरित्र वाचण्याकडे होता आणि त्यातून जन्माला आली एकापेक्षा एक सरस अशी जागतिक व्यक्तिचित्रे. ‘कार्व्हर’च्या यशानंतर त्यांनी डॉ. आयडा स्कडर यांचे चरित्र लिहिले. ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न जगात प्रथम केला तो डॉ. आयडा स्कडर यांनी. आपले ज्ञान मानवी जीवनाची सेवा करण्यासाठी तसेच हिंदुस्थानातील ग्रामीण आरोग्याचा स्तर उंचावण्यासाठी वापरणार्या या अमेरिकन महिला डॉक्टरची ही जीवनगाथा. त्यानंतर वीणाताईंनी सर्प पाळण्याच्या छंदातून जागतिक कीर्तीच्या सर्पतज्ञ झालेल्या डॉ. रेमंड डिरमार्स यांचे चरित्र लिहिले.
त्या फक्त परदेशी संशोधकांची चरित्रे लिहून थांबल्या नाहीत तर त्यांनी जागतिक पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली आणि ज्येष्ठ कृषितज्ञ डॉ. खानखोजे यांच्यावर लिहिलेली चरित्रेसुद्धा अफाट आहेत. स्वातंत्र्य संग्रामात परागंदा व्हावे लागलेल्या या हिंदुस्थानी सुपुत्राचा अस्सल पुराव्यांच्या आधारे घेतलेला शोध त्यांच्या ‘नाही चिरा नाही पणती’ या पुस्तकातून वीणाताईंनी आपल्यासमोर मांडलेला आहे. वीणाताईंनी लिहिलेली चरित्रे वाचून कुठल्याही क्षेत्रात मूलभूत काम करणार्या व्यक्तीला किती संघर्षाला सामोरे जावे लागते आणि त्या सर्वांवर या व्यक्ती हसतमुखाने कशी मात करतात आणि जगाच्या समोर एक मोठा आदर्श घालून देतात याची कहाणी असते. लीझ माईटनर या ऑस्ट्रियन स्त्रीची कहाणीसुद्धा अशीच रोमहर्षक आहे. नोबेल पुरस्कारसाठी हिचं नाव पंधरा वेळा सुचवलं गेलं. हिटलरच्या जर्मनीला अनेक प्रयत्न करूनही जिचं पायाभूत संशोधन जप्त करता आलं नाही अशा अफाट बाईची ही कथा.
ज्यांची नावंसुद्धा आपण ऐकलेली नसतात अशा व्यक्तींवर सखोल अभ्यास करून त्यांची चरित्रे आपल्यासमोर आणण्याचे काम वीणा गवाणकर अव्याहत करत आहेत. महाराष्ट्र शासनाने तसेच विविध संस्थांनी त्यांचे हे कार्य पुरस्कार देऊन गौरविले आहे. 4 ऑक्टोबरला पुण्यात स्नेहल प्रकाशन या संस्थेतर्फे वीणाताईंना ‘स्नेहांजली पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे. साहित्य क्षेत्रातील एका तपस्विनीचा हा उचित सन्मानच म्हणावा लागेल.
































































