
>> सुजित पाटकर, [email protected]
सध्या विदेशी भाषा शिकण्याचे वेड वाढत असताना बापू पटवर्धन यांच्यासारखा ७५ वर्षांचा ‘उत्साही’ विद्यार्थी सेवानिवृत्तीनंतर उर्दू शिकण्याची जिद्द धरतो, त्याचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करतो. उर्दू भाषेत प्रावीण्य मिळवून इतरांनाही धडे देतो… तेदेखील विनामोबदला. उर्दूप्रेमी बापूंचा हा ध्यास कुणीही आदर्श घ्यावा असाच आहे! बापूंना सलाम!!
बापू पटवर्धन हे मूळचे गिरगावकर. आता पक्के ठाणेकर. ७६ वर्षांचा तजेलदार विद्यार्थी असेच त्यांच्याविषयी म्हणावे लागेल. आज शाळा, कॉलेजांत परकीय भाषा, खासकरून जर्मन, फ्रेंच, अरेबिक शिकण्याकडे कल असतो. बापूंनी ‘उर्दू’ शिकण्याची जिद्द धरली व त्यांनी या वयात उर्दूत पांडित्य कमावले. उर्दू ही मुसलमानांची, खासकरून पाकिस्तानवाल्यांची भाषा हा अपप्रचार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. बापू शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे उदाहरण देतात. व्यंगचित्रकार बाळासाहेबांनी ‘मार्मिक’ साप्ताहिक सुरू केले. त्या ‘मार्मिक’वर बोधवचन म्हणून एक उर्दू शेर होता. तो आजही आहेच –
…खिंचो न कमान को न तलवार निकालो
जब तोप मुकाबिल है तो अखबार निकालो
या उर्दू शेराचा मोह बाळासाहेबांसारख्या हिंदुत्ववादी संपादक, नेत्याला पडलाच ना? हा त्यांचा सवाल बिनतोड आहे. बापूंचे उर्दूप्रेम बालवयातच निर्माण झाले. त्यांच्या लहानपणी वेगवेगळ्या नाटकांमध्ये काम करायचे. त्या काळची अनेक नाटकं ही ऐतिहासिक असल्याने त्यांवर उर्दूचा प्रभाव होता. त्यातील उर्दू शब्दांच्या बापू लहानपणीच प्रेमात पडले. पुढे नोकरीमुळे त्यांची आवड जपता नाही आली, पण सेवानिवृत्ती घेतल्यावर वयाच्या सहासष्टाव्या वर्षी त्यांनी ही आपली अपुरी इच्छा पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. मग मात्र वेळ जराही वाया न घालवता गिरगावातल्या हिंदुस्थानी प्रचार सभेत लगेच त्यांनी उर्दू शिकायला सुरुवात केली. मुळातच लहानपणापासून असलेली उर्दूची आवड, जे करू ते अचूक करण्याची सवय आणि अभ्यासू वृत्ती यामुळे इतरांपेक्षा बापूंनी पहिल्या दोन वर्षांचा अभ्यासक्रम बराच आधी पूर्ण केला. त्यांनी मग दिवसरात्र उर्दूचा अभ्यास केला आणि नंतर त्यांच्या सरांना मदत म्हणून आणि तसंच उर्दूवरची पकड घट्ट करण्यासाठी त्यांनीच प्रचार सभेत उर्दू शिकवायलाही सुरुवात केली. उर्दू शिकता शिकता त्यांना शिकवायलाही आवडू लागले. मराठी भाषेवरसुद्धा पकड असल्याने त्यांचे मराठी विद्यार्थी त्यांच्या शिकवण्याच्याही प्रेमात पडले. नंतर बापूंनी उर्दू भाषेत दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. आजवर त्यांनी १५०हून अधिक विद्यार्थ्यांना उर्दूचे धडे दिले असून आजही ज्यांना उर्दू शिकण्याची आवड आहे त्यांना ‘तुमची आवड हीच माझी फी’ या तत्त्वाने त्यांच्याकडून एकही पैसा न घेता अतिशय तळमळीनं उर्दूचे धडे देत आहेत. त्यांची मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू आणि गुजराती भाषेवर पकड आहेच, परंतु यापुढे त्यांना फ्रेंच आणि पर्शियन या दोन भाषा शिकायची जबरदस्त इच्छा आहे. बापू सध्या उर्दू भाषा शिकविण्याबरोबरच अवयवदानाबद्दल समाजात जनजागृती करणं आणि मान्यवर मंडळींची पोर्ट्रेट्स काढणं या गोष्टीदेखील आवडीने करत आहेत. हिंदू-मुस्लिमांमध्ये समाजात एवढी तेढ असताना तुम्हाला उर्दू भाषेवरच एवढं प्रेम का करावंसं वाटलं? असा प्रश्न जेव्हा त्यांना विचारला जातो तेव्हा त्यांच्याकडे एक वेगळं आणि विचार करण्यासारखं उत्तर असतं. मुळात कुठल्याच भाषेला जात किंवा धर्म नसतो. उर्दू ही फक्त मुसलमानांचीच भाषा आहे हा काही विघ्नसंतोषी लोकांनी आपल्या फायद्यासाठी जाणूनबुजून पसरविलेला गैरसमज आहे. हिंदुस्थानवर जी आक्रमणे झाली ते आक्रमक आणि येथे जे व्यापारासाठी आले ते व्यापारी जी भाषा बोलत त्यांच्या मिश्रणातून तयार झालेली उर्दू ही शंभर टक्के हिंदुस्थानी भाषा आहे. त्यात फारसी, अरबी, संस्कृत आणि इंग्रजी असे सर्व भाषांमधील शब्द आहेत. ‘उर्दू’ या शब्दाची फोड आमच्या परकार सरांनी फार चपखलपणे सांगितली आहे. ‘उर्दू’ हा शब्द ‘उर्’ आणि ‘ दू’ या दोन शब्दांनी बनला आहे. हे दोन्ही शब्द संस्कृत आहेत आणि त्यांचा अर्थ उर म्हणजे ‘दिल’ आणि ‘दू’ म्हणजे दोन. तेव्हा उर्दू म्हणजे ‘दों दिलों को मिलानेवाली भाषा’. ‘नमाज’ हा शब्द ‘नवस’ या मूळ संस्कृत धातूपासून आलेला आहे. अंजुमन इस्लाम या स्कूलच्या करिमी लायब्ररीमध्ये २००-३०० वर्षांपूर्वीची वर्तमानपत्रं, मासिकं- अंक वाचायला मिळाले. त्यात फारसी महाभारत, रामायण; उर्दूमध्ये शिवपुराण, गणेशपुराण, हनुमान चालिसा, तुलसी रामायण, कुराण मज्जिद मिळालं. गीतेचे ८२ अनुवाद उर्दूत वाचायला मिळाले. ‘महाभारता’चा फारसी अनुवाद असा बघितला ज्याची प्रस्तावना अबुल फजलने लिहिली आहे.
याबाबतीत बापूंनी किस्सा सांगितला. अशीच एकदा या वादाबद्दल चर्चा रंगली होती. दोन्ही पक्षांतले लोक आपापली बाजू मांडत होते. समोरच्याचे मुद्दे खोडून काढत होते. एकदा त्याने एक शेर सुनावला, ‘‘ दुश्मन बनकर आए थे वो हमें जितने के लिए, अगर दोस्ती करते, तो हम ख़ुद हार जाते’’. भले भले तासन्तास बोलूनदेखील जे साध्य करू शकत नाहीत तेच उर्दू भाषेतील एखादा शेर एखाद्या मिनिटात साध्य करून जातो ही उर्दू भाषेची गोडी आहे. प्रत्येक भाषेचं एक वैशिष्टय़ असतं आणि धर्म, जातीच्या लेबलच्या पलीकडे जाऊन एक रसिक म्हणून, एक विद्यार्थी म्हणून ते वैशिष्टय़ आपल्याला जाणून घेता आलं पाहिजे. उर्दू भाषेतील अदब, अदाकारी, मधुरता खरोखरच वाखाणण्याजोगी आहे.
उर्दूसंबंधी बापू त्यांचे एक शायर मित्र जनाब अहमद वसी साहेब यांचा एक शेर आवडीनं सांगतात-
वो करें बात, तो हर लफ्जसे खुशबू आए,
ऐसी बोली वही बोले जिसे उर्दू आए.
आपण मराठी भाषेतसुद्धा उर्दू भाषेतील अनेक शब्द आपल्याही नकळत वापरत असतो. जाहीरनामा, तहहयात, गैरहजर, बेकायदा असे अनेक शब्द उर्दूतून आलेले आहेत. आपल्याला जर आपली मातृभाषा टिकवायची असेल, समृद्ध करायची असेल तर आपल्या मातृभाषेबरोबर इतरही भाषा जोपासणं, त्यातून चांगल्या गोष्टी आपल्या भाषेत सामावून घेणं गरजेचं आहे. आज इंग्रजी भाषेने जगभरातील अनेक भाषांतील शब्द जसेच्या तसे आपल्या डिक्शनरीमध्ये सामावून घेतले आहेत. म्हणून ती वाढते आहे. बापूंना सलाम!
(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रातील तज्ञ आहेत.)




























































