
>> ज्ञानेश्वर गावडे
मुंबई शहरात पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, हार्बर मार्ग, त्याशिवाय या तिन्ही मार्गांचा पसारा ट्रान्सहार्बर मार्गाद्वारे पनवेल म्हणजे नव्या मुंबईत नेला गेला आहे. सुमारे 80 लाख प्रवासी या मार्गावर प्रवास करीत आहेत. मध्यंतरी पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील अतिक्रमणे आणि झोपडपट्ट्या निर्धाराने हटविल्या गेल्या. मात्र रेल्वेच्याच पंगतीला बीपीटी रेल्वेचे जाळे आहे. गोदीतून हिंदुस्थानातून येणारा बहुतांश माल कर्नाक बंदर व वाडीबंदर या रेल्वे यार्डात येतो आणि तेथून मध्य व पश्चिम रेल्वेमार्फत देशाच्या अंतर्भागात जातो. त्यासाठी पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या मार्ग बीपीटीच्या रेल्वेला जोडलेला आहे. वडाळ्यापासून ते इंदिरा डॉकपर्यंत बीपीटी रेल्वेवर दोन्ही बाजूने झोपड्यांचे जाळे पसरले आहे. यावर झोपड्या व अतिक्रमणे पसरली आहेत. यावर आलेल्या झोपड्या व अतिक्रमणे काढून टाकण्यास बीपीटीचे स्वतःचे अतिक्रमण निर्मूलन खाते नसल्यामुळे बीपीटीचे पूर्वीपासून दुर्लक्षच आहे. ते मुंबई महापालिका, प.रे. आणि म.रे.वर सदर जबाबदारी ढकलीत आहेत.
वडाळा रेल्वे स्थानकानंतर रावळी जंक्शनची केबिन आहे. तेथून वांद्रे ते कोळीवाडा (गुरुतेगबहादूरनगर) या दोन दिशांना रेल्वेमार्ग जातात. त्यासाठी या जंक्शन मार्गाचा उपयोग होतो. फार पूर्वी या रेल्वे केबिनजवळ संपूर्ण रेल्वे लोहमार्गाचा परिसर मोकळा होता. नंतर मात्र मध्य व पश्चिम या दोन्ही रेल्वे प्रशासनाचे व त्याचबरोबर बीपीटी प्रशासनाचे लक्ष नसल्यामुळे त्या जंक्शनच्या आसपास एकेक झोपडी येऊन रेल्वेच्या त्या जागेत झोपडपट्ट्या आल्या. ज्यावेळी वडाळा ते किंग्ज सर्कल असा नवा मार्ग टाकण्याची वेळ आली तेव्हा झोपड्या हलविण्यापेक्षा रेल्वेने त्यावर उन्नत मार्ग बांधला. येथेच रेल्वेने झोपडपट्टीपुढे शरणागती स्वीकारली होती. आजही तेथून रेल्वे जशी जंगलातून गाडी जावी तशी लोकल झोपड्यांच्या जंगलातून जाते अशी स्थिती आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे निवासस्थान जवळच शीव परिसरात आहे. त्या ठिकाणी त्यांचे बालपण गेलेले असल्यामुळे सध्याची रावळी जंक्शनला वेढा घातलेली दुर्दशा त्यांच्या दृष्टीला निश्चितच असण्याची शक्यता आहे. त्यांनी यात लक्ष घालावे.






























































