ठसा – चंद्रकांत वडनेरे

>> अनिल कुचे

अमरावती जिह्याला शिवसेनेची खऱया अर्थाने ओळख निर्माण करून देणारे तत्कालीन माजी जिल्हाप्रमुख चंद्रकांत वडनेरे यांचे नुकतेच निधन झाले. अमरावती शहर हे पूर्वी परकोटाच्या आतच वसलेले होते. दगडाच्या भिंती जुन्या अमरावती शहराला होत्या. परकोटाच्या आतच सर्व लहान-मोठे व्यवसाय चालत होते. परंतु परकोटाच्या बाहेरच्या बाजूस म्हणजेच नागपुरी गेट, खोलापूर गेट या भागात मुस्लिमांची वस्ती जास्त होती व त्या काळात हिंदू-मुस्लिम तणाव जास्त असायचा. त्यामुळे परकोटाच्या आतील जनतेला खऱया हिंदुवादी संघटनेची आवश्यकता होती. अमरावती शहर त्यानंतर परकोटाच्या बाहेरही खूप वाढले आहे. चंद्रकांत वडनेरे यांचे सराफाचे दुकान होते. त्यामुळे त्यांचा संबंध मुंबईशी आला. त्यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. त्या वेळी बाळासाहेबांनी चंद्रकांत वडनेरे यांची जिल्हाप्रमुख म्हणून नेमणूक केली. त्यांच्या सहीचे पत्र वडनेरे यांना दिले. त्यानंतर वडनेरे यांनी सराफा बाजारातच राहणारे अरुण गोगटे यांची शहरप्रमुख म्हणून नियुक्ती केली. बोटांवर मोजण्याएवढय़ा कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन त्यांनी शिवसेनेचे कार्य अमरावती जिह्यात सुरू केले. परकोटाच्या आत लहान-मोठय़ा शिवसेनेच्या शाखा स्थापन केल्या. त्यानंतर परकोटाव्यतिरिक्त शहरातील पहिली शाखा म्हणून वडनेरे यांनी राठीनगर येथे स्थापन केली. यावेळी राठीनगर गाडगेनगर परिसरात प्रदीप बाजड नावाचा सामाजिक कार्यकर्ता राहात होता. प्रदीप वडनेरे यांनी प्रदीप बाजड यांची शाखाप्रमुख म्हणून 2 ऑक्टोबर 1986 ला नियुक्ती केली व त्यानंतरच वडनेरे यांनी गावागावात शिवसेनेच्या शाखा सुरू करण्याचा सपाटा चालविला. त्या काळात अमरावती जिह्यात हिंदू विरुध्द मुस्लिम असा वाद सुरू होता. त्याच वेळी शिवसेना अमरावती जिह्यात उदयास आली होती. त्यामुळे अनेक तरुण कार्यकर्ते शिवसेनेशी जुळले व खेडय़ापाडय़ात शिवसेनेच्या शाखा निर्माण झाल्या. दरम्यान 1987 मध्ये दुर्गादेवीच्या उत्सवात जिह्यातील वरुड येथील हिंदू-मुस्लिम दंगल उसळली. या वेळी पोलिसांनी गोळीबारसुध्दा केला होता. तसेच काहीजण जखमी झाले होते. या दंगलीचे लोण त्याच वर्षी अमरावतीत पसरले. दिवाळीच्या दुसऱयाच दिवशी नागपुरी गेट भागात दंगल उसळली. शहरात संचारबंदी लागली. अशा स्थितीत चंद्रकांत वडनेरे यांच्या नेतृत्वातील शिवसैनिक टप्प्याटप्प्यावर उभा राहिला. पुढे 1990 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. यात चंद्रकांत वडनेरे यांच्या प्रयत्नांनी दर्यापूर मतदारसंघात प्रकाश भारसाखळे तर बडनेरा मतदारसंघात त्यांचेच बंधू प्रदीप वडनेरे विजयी झाले. प्रत्यक्ष चंद्रकांत वडनेरे यांनीच निवडणूक लढवावी असा आग्रह शिवसेनाप्रमुखांचा होता. परंतु आपण सराफा बाजारातील व्यापारी असल्यामुळे शिवसेनेचे कार्य करण्यासाठी मोकळीक मिळणार नाही, म्हणून त्यांनी प्रदीप वडनेरे यांना निवडणुकीत उभे केले. प्रदीप वडनेरे विजयीसुध्दा झाले. चंद्रकांत वडनेरे यांची शिवसेनाप्रमुखांवर अपार श्रध्दा होती. असे असतानाच त्यांचे बंधू प्रदीप वडनेरे यांनी बंडखोरी केली व ते 1992 मध्ये फुटले. त्या वेळी सर्वाधिक दुःख चंद्रकांत वडनेरे यांना झाले होते. आपल्या भावानेच बंडखोरी केल्यामुळे शिवसेनाप्रमुखांना कसे तोंड दाखविणार या विचाराने अखेर त्यांनी नाइलाजास्तव शिवसेनेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. परंतु त्या वेळपर्यंत त्यांनी जिह्यातील गावागावात शिवसेना पोहोचवली होती, ही वस्तुस्थिती आजही जुने शिवसैनिक विसरायला तयार नाहीत. आजच्या तरुण शिवसैनिकांना चंद्रकांत वडनेरे कोण याची पूर्ण माहिती नाही. परंतु जुन्याजाणत्या शिवसैनिकांना चंद्रकांत वडनेरे यांच्याबद्दल आदर होता. आता ते हयात नसले तरी तो कमी होणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या