मुद्दा – चाईल्ड पोर्नोग्राफीचा भस्मासुर

2349

>> गुरुनाथ भाग्यवंत

चाईल्ड पोर्नोग्राफीसंदर्भात वेगवेगळय़ा वृत्तपत्रांतून येणारे वृत्तांत वाचून मन सून्न होते. हिंदुस्थानतही सध्या चाईल्ड पोर्नोग्राफीचा फैलाव होत आहे. चाईल्ड पोर्नोग्राफी म्हणजे 18 वर्षांखालील मुलांचे कोणत्याही लैंगिक स्वरूपाचे चित्रण. आक्षेपार्ह स्थितीत काढलेले फोटो, व्हिडीओ, कॉम्प्युटर निर्मित चित्रफिती यांचा समावेश चाईल्ड पोर्नोग्राफीत होतो. अशा गलिच्छ,अश्लील कामांसाठी लहान मुलांचा वापर होऊ नये म्हणून हिंदुस्थानी दंड संहितेनुसार 292/293 नुसार सर्व प्रकारची पोर्नोग्राफी तर आयटी ऍक्ट 76 द्वारे चाईल्ड पोर्नोग्राफी करणे हिंदुस्थानात बेकायदेशीर आहे. पळवून नेलेल्या मुलांचा त्यासाठी सर्रास वापर केला जातो असे आढळून येते. सध्या चाईल्ड पोर्नोग्राफी तसेच इतर पोर्नोग्राफी इंटरनेटवर प्रतिदिनी 1 लाखांवर शोधल्या जातात. यात केरळ व हरयाना राज्य आघाडीवर आहेत. जुलैमध्ये पोक्सो (बाल लैंगिक शोषण विशेष कायदा) अमलात आला तसेच चाईल्ड पोर्नोग्राफी बाळगणे आणि त्याचा प्रसार करण्यास असलेल्या दंडाच्या रकमेत वाढ केलेली असूनसुद्धा हे प्रमाण कमी होताना दिसत नाही. केंद्र सरकारच्या अनुषंगाने इंटरपोलची मदत घेऊन चाईल्ड पोर्नोग्राफी बंद करण्यासाठी 350 वेबसाइट बंद करण्यात आलेल्या आहेत. मुलांचे लैंगिक शोषण वाढणे ही धक्कादायक बाब आहे. एकूणच पोर्नोग्राफीचे वाढते आकर्षण आणि त्यातही चाईल्ड पोर्नोग्राफीचे विकृत आकर्षण का वाढत आहे हे समाजानेच तपासून पाहायला हवे व हा भस्मासुर आत्ताच गाडायला हवा. विविध सामाजिक संस्थांच्या सर्वेक्षणाअंती असेही आढळून आले आहे की, पालकांना मुलांसाठी वेळ नसणे, मुलांचे एकटेपण, कुटुंबातील तुटलेला संवाद यामुळे मुले इतरत्र दोस्त शोधतात. याचाही फायदा पॉर्न चित्रीकरण करणारे घेतात. हे पूर्णपणे बंद होण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांसाठी सतत जागृत असायला हवे. यासाठी मैदानी खेळ, एकत्रित कुटुंबासाठी देण्यासाठी आपला वेळ, मुलांचे मन खुलविण्यासाठी मनमोहक छंद हे उपाय योजायला हवेत. आपण नेहमीच म्हणतो ‘मुले ही देवा घरची फुले!’ अशा निरागस व सुकोमल मनाच्या लेकरांच्या सुंदर भविष्यासाठी, आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पालकांनी यापुढे खूपच काळजी घेणे गरजेचे आहे. कारण हिंदुस्थानातील एकही मूल अशा घातक प्रवृत्तींना बळी पडू नये.

आपली प्रतिक्रिया द्या