लेख : बालपणीचा काळ

>>दिलीप जोशी<<

khagoldilip@gmail.com

आमच्या बालपणीच्या काळातली एक कविता. ‘या बालांनो या रे या, लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा.’ बालपणीचा काळ हा मौजमजेचा असायलाच हवा. याच कवितेत पुढे म्हटलंय ‘स्वस्थ बसे तोची फसे.’ पण लहान मुलं ‘स्वस्थ’ क्वचितच बसतात. सततची चुळबुळ, मांजरासारखी प्रत्येक गोष्टीत डोकावण्याची उत्सुकता, डोळय़ात निरागस भाव आणि तितकाच खटय़ाळपणा घेऊन बालपण रंगत असतं. खेळण्यासाठी अमुक गोष्ट हवीच असा हट्ट धरून ती मिळाली की त्याकडे पार दुर्लक्ष करून केवळ मातीत खेळण्यात धन्यता मानतं ते बालपण. पुढच्या आयुष्यात वाटय़ाला येणारे नियम, अर्थकारण वगैरेची कल्पनाही बालमनाला असण्याची शक्यता नसते. काय वाट्टेल तो हट्ट मुलं करू शकतात. प्रभु रामचंद्राने बालपणी आकाशीचा ‘चंद्र’ हवा असा हट्ट धरला आणि अखेरीस चतुर मंत्री असलेल्या सुमंताने आरशातला चंद्र त्याच्या हाती दिला!

बालपण कुणाचंही असो, ते सारख्याच निरागस भावना घेऊन येतं. परदेशात राहणाऱ्या एका नातेवाईकांची छोटी मुलं आमच्या घरी आल्यावर उत्सुकतेने सारं न्याहाळत होती. खिडकीतून दिसणारी रेलगाडी बघून टाळय़ा पिटणं हा कार्यक्रम दिवसभर चालला होता. मग त्यांचा त्यांच्या आईबाबांना प्रश्न होता, आपल्याकडे ‘विंडो’मधून अशी ट्रेन का दिसत नाही?’… आणि अमेरिकेत ऑस्टिनमध्ये राहणाऱ्या त्या पालकांकडे समर्पक उत्तर नव्हतं. दोनच दिवसांत या मुलांनी आमच्या शेजारपाजारच्या समवयस्क मुलांशी मैत्री केली. त्यांच्याबरोबर गल्लीतलं क्रिकेटच नव्हे तर इतरही खेळ खेळताना त्यांना भाषेच्या उच्चारांची अडचण आली नाही की संवाद खुंटला नाही.

मग आमच्या एका तरुण उत्साही मित्राने या मुलांसह सगळय़ानाच कांदाफोडी, आटय़ापाटय़ा असे खेळही शिकवले. असे खेळ आता इथेही शहरी भागात दुर्मिळ झालेत. आमचं बालपण इलेक्ट्रॉनिक वस्तू, हाती सदोदित सेलफोन किंवा कुठल्या तरी ‘ऍम्युझमेन्ट पार्क’च्या काळातलं नव्हतं. एका पैशाचाही खर्च नसणारे सारे खेळ. लपाछपी, लंगडी, डबा ऐसपैस, हुतूतू (कबड्डी), आटय़ापाटय़ा या खेळांना केवळ उत्साह पुरेसा असायचा. खो-खो खेळताना होणारी दमछाक किंवा ‘माझ्या आईचं पत्र हरवलं, ते मला सापडलं’ असं काहीतरी म्हणत गोल करून बसलेल्यांच्या पाठीमागे रुमाल टाकायचा आणि तो ओळखून लगेच आपणही तसंच करायचं. ओळखता नाही आलं तर रुमालाचाच ‘मार’ मिळायचा. गोटय़ा, भोवरा, पतंग यांना थोडा खर्च यायचा खरा, पण चिखलात तार रुतवून मैलभर जायला किंवा जुन्या टायरचा किंवा लोखंडी सळीचा ‘गाडा’ तयार करून दमछाक होईपर्यंत धावायला काहीच हरकत नसायची.

आमच्या लहानपणी सायकल दोन आणे तासाने (भाडय़ाने) मिळायची. आता दोन आणि म्हणजे बारा पैसे हे सांगावं लागेल. रुपये आणे-पै, पैकी ‘पै’चा हिशेब आमच्या बालपणीच लुप्त झाला होता. आता आण्यांचाही गेला. पैसे आणि रुपये याचबरोबर ‘कॅशलेस’पर्यंत आपण जाऊन पोहोचलो आहोत. नव्या पिढीच्या हातात ‘गॅझेट’ सहज येतात आणि दोन-चार वर्षांच्या मुलाना ती किती ‘सहज’ वापरता येतात याचं ठायी ठायी कौतुक कानी पडतं. खेळांचे प्रकारही, बॅटरी असलेल्या कारमधली ‘राइड’ किंवा रोलर कोस्टर असे सुखासीन झाले आहेत. सुरपारंब्या, लगोऱ्या दूरच राहिल्या, पण निदान थोडी धावपळ करणारे खेळही दिसत नाहीत. शहरी भागात मैदानांची चणचण ही समस्या आहेच, पण एरवीही आपलं ‘गॅझेट’ बरं आणि त्यावरच्या मालिका किंवा खेळ बरे अशी नवी बालवृत्ती मोठय़ा प्रमाणात वाढताना दिसतेय. मग त्याची भरपाई करण्यासाठी जिम, धावपळीची शिबिरं असे उपाय शोधावे लागतायत.

नव्या पिढीचा यात काहीच दोष नाही. त्यांच्या बालपणीचा ‘काळ’ जसा आहे त्याला काळसुसंगत असंच त्यांचं वर्तन असणार. अर्थात याला अपवादही असतातच. बालवयातच अथक मेहनत करून चमकणारा एखादा क्रिकेटपटू किंवा गायक-गायिका, नर्तक असे चमकते हिरे सर्वत्र दिसतात.

मात्र काही मुलांना त्यांच्या बालपणीच्या हक्काच्या आनंदापासूनच वंचित राहावं लागतं. शहरी सुखवस्तू भागातल्या बालपणापासून खेडय़ातलं ‘बालपण’ काही वेळा अक्षरशः ‘कोसों दूर’ असतं. दुष्काळाचा सामना करावा लागणाऱ्या भागातली छोटी मुलं बालपण हरवून कळशीभर पाण्यासाठी आईबरोबर मैलोगणती पायपीट करतानाची दृश्यं बघितली की काळीज चरकतं. अनेकदा छोटय़ा मुलांना अवघड डोंगरी वाट आणि नद्या, नाले ओलांडून तास-दीड तासाच्या धावपळीनंतर शाळा नजरेस पडते. गरिबीमुळे घरकामात पालकांना मदत करून, बालपणीचा सुखाचा काळ हरवलेली, खेळण्यासाठी वेळ न मिळणारी कितीतरी जिद्दी मुलं-मुली, परिश्रमपूर्वक अभ्यास करतात. घरात विजेचा दिवाही नसलेल्या खेडय़ात कंदिलाच्या उजेडात अभ्यास करावा लागणं ही एकविसाव्या शतकाला भूषणावह गोष्ट नाही, पण घोषणांची रोषणाई अनेकांच्या घरी-दारी पोहोचतेच असं नाही. तरीही या परिस्थितीवर मात करून एका जिद्दीने आपलं जीवन आपणच घडवतात आणि अकाली लादलं गेलेलं ‘प्रौढत्वा’चं ओझं न कुरकुरता सांभाळत आत्मोन्नती करून घेतात, अशा मुलांकडून खूप काही शिकण्यासारखं असतं. नाहीतरी ‘बालादपि सुभाषितम् ग्राहय़म्’ म्हणजे लहानांनीही चांगलं सांगितलं तर स्वीकारावं असं आपली संस्कृती सांगते…मात्र कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी बालपण हरवून बालकांना अकाली कष्ट करायला लागू नयेत अशी व्यवस्था निर्माण व्हायला हवी.