लेख – चीनचे आता ‘माहिती युद्धा’चे शस्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

कोरोनाच्या निमित्ताने जगामधील सर्वात महाभयंकर जैविक महायुद्ध किंवा जैविक महामारी सुरू झाल्यानंतर सुरुवातीला जगाला चीनविरोधात प्रचंड राग होता, परंतु पुढच्या काही महिन्यांमध्ये चीनने हे ‘माहिती युद्ध’ पूर्णपणे जिंकले आहे. आता अनेक देशांना चीनच्या विरोधात राग नाहीच, उलट त्या देशांमध्ये जैविक महायुद्धामध्ये लस डिप्लोमसी आणि इतर वैद्यकीय मदत केल्यामुळे चीनला धन्यवाद दिले जात आहेत.

युरोपमध्ये अनेक ठिकाणी मोठे डिजिटल फलक लावण्यात आले आहेत, ज्यामध्ये ‘थँक्यू चीन किंवा धन्यवाद झी भाई’ असे लिहिलेले दिसते. चीनच्या या मानसिक महायुद्धाचा किंवा दुष्प्रचार युद्धाचा ‘आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघा’ने अभ्यास केला आहे. त्या अभ्यासाचे महत्त्वाचे निष्कर्ष आहेत की, एवढी मोठी महामारी चीनने सुरू केल्यानंतरसुद्धा जग चीनला दोषी मानत नाही. उलट हा दोष त्या देशांमध्ये असलेल्या केंद्र व राज्य सरकार आणि सरकारी संस्थांवर टाकला जातो. त्यांनी या महामारीचा चांगल्या प्रकारे मुकाबला केला नाही, त्या त्या देशातील सरकारे आपले काम नीट करत नव्हती म्हणून चिनी विषाणूचा प्रसार झाला, वाढला, देशाचे प्रचंड नुकसान झाले.

परदेशातील मीडियाला ‘मॅनेज’ करण्यासाठी चीन अनेक उपाय करतो. अनेक वेळा त्यांना चीनकरिता जरूरी असलेली कामे दिली जातात, त्यांना चीनमध्ये पर्यटक म्हणून नेले जाते, त्यांच्या प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च पूर्णपणे चीन करतो. युरोप आणि अमेरिकेच्या मीडियामधील अनेक वृत्तपत्रांशी करार करून त्यांना चिनी मीडियाने पाठवलेल्या 50 बातम्या व चीनने पाठवलेले लेख प्रकाशित करावे लागतात. चिनी व्हायरसची महामारी सुरू झाल्यानंतर काही महिन्यांमध्येच चीनने आपली प्रचंड मीडिया सैन्य उभे केले. यामध्ये या देशात असलेले चिनी नागरिक, चिनी हस्तक, पैसे देऊन तयार केलेली सोशल मीडियावरची ट्रोल आर्मी सामील होती.

जगाच्या, खासकरून युरोप आणि अमेरिकेमधल्या मीडियावर चीनचे वर्चस्व पूर्णपणे आहे आणि ते चिनीविरोधात किंवा चीनला सोयिस्कर नसलेली कुठलीही बातमी प्रकाशित करत नाही. अमेरिका आणि युरोपमधली मीडिया आता चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र बनलेले आहे. कम्युनिस्ट पार्टीचे चीनमधले मुखपत्र आहे ‘ग्लोबल टाइम्स.’ परंतु अशीच अनेक ‘ग्लोबल टाइम्स’ चीनने युरोप आणि अमेरिकेमध्येसुद्धा तयार केलेले आहेत. इतकेच नव्हे तर चीनने या देशातील अनेक राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना ‘मॅनेज’ करून या देशातील चिनी विरोध कमी केला आहे आणि उलट चीनच्या बाजूने लिहिले जात आहे.

अमेरिकेचे सध्याचे राष्ट्रपती जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन याचा चिनी कम्युनिस्ट पार्टीशी अतिशय गहिरा संबंध आहे, परंतु ही बातमी प्रकाशित होताच लगेच मीडियातून/सोशल मीडियामधून नाहीशी झाली. ‘ट्विटर’, ‘फेसबुक’ किंवा इतर प्रचंड मोठे सोशल मीडिया दिग्गज हिंदुस्थानचे कायदे मानत नाहीत, मात्र ते चीनचे कायदे पूर्णपणे मानतात, चीनचे ऐकतात. चीनच्या बाहेर अमेरिका, युरोप आणि इतर राष्ट्रांतून चीनने तयार केलेली ट्रोल आर्मी या माध्यमांचा वापर करून चीनसाठी सोयिस्कर बातम्या प्रकाशित करतात.

हे असे का होत आहे? सध्या जगातील प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाची आर्थिक घडी चिनी विषाणूमुळे पूर्णपणे बिघडलेली आहे. बहुतेकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे, त्यांचा खप आणि टीआरपी हा 50 ते 60 टक्क्यांनी कमी झालेला आहे, त्यांना पुरेशा जाहिराती मिळत नाही. त्यांच्या या खराब आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन चीनने त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने ‘मॅनेज’ केले आहे.

चीनने अमेरिका, युरोपमधील मीडिया हाऊसेसमध्ये आर्थिक घुसखोरी केली आहे. काही ठिकाणी इतर देशातल्या कंपन्यांमधून या मीडिया हाऊसेसमध्ये शेअर्स विकत घेण्यात आले आहेत. अमेरिकेतल्या इतर कंपन्या/संस्थांचा वापर करून मीडिया हाऊसेसचे शेअर विकत घेण्यात आले आहेत. मीडियाची मते आपल्या बाजूला लगेच वळविण्याकरिता दरवर्षी हजारो कोटी रुपयांच्या जाहिराती दिल्या जातात. ‘वॉशिंग्टन पोस्ट’, ‘ऍमेझॉन’, ‘सीएनएन’, ‘वॉर्नर मीडिया’, ‘द अमेरिकन ब्रॉडकास्ट कंपनी’, ‘ईएसपीएन’, ‘वॉल्ट डिस्ने’, ‘द न्यूयॉर्क टाइम्स’, ‘द वॉशिंग्टन पोस्ट’, ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’, ‘द लॉस एंजेलिस टाइम्स’, ‘सिएटल टाइम्स’, ‘फायनान्शियल टाइम्स’ या अमेरिकन मीडिया हाऊसेसमध्ये चिनी शेअर होल्डिंग लक्षणीय आहे. नेमके हेच युरोपमधील मीडियात होत आहे. जागेअभावी सगळ्यांची नावे देणे शक्य नाही.

अमेरिकेमध्ये कायदा आहे की, मीडिया हाऊसेसमध्ये ज्यावेळेस परदेशी शेअर खरेदी होते ती जाहीर करणे आवश्यक असते. यामुळेच ही माहिती बाहेर आलेली आहे. उदाहरणार्थ ‘ऍमेझॉन’मध्ये, ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये 250 दशलक्ष मिलियन डॉलरची चिनी गुंतवणूक आहे. ‘वार्नर मीडिया ग्रुप’, ‘सीएनएन’मध्ये 50 दशलक्ष मिलियन डॉलरची गुंतवणूक आहे. ‘अमेरिकन ब्रॉडकास्टिंग’ कंपनीमध्येसुद्धा चिनी गुंतवणूक 20 टक्के आहे. डिस्ने वर्ल्डला शांघायमध्ये थीम पार्क निर्माण करायला परवानगी देऊन त्यांना अमेरिकेमध्ये पूर्णपणे विकत घेण्यात आलेले आहे. अशा पद्धतीने अमेरिका आणि युरोपमधल्या आम जनतेवर चीन आता त्यांची मने जिंकण्याचे युद्ध/ कथा युद्ध (नॅरेटिव्ह वॉरफेअर) लढत आहे.

आपल्या प्रचंड आर्थिक ताकदीचा वापर करून चीनने अमेरिका, युरोप खंडातल्या मीडियाला मोठय़ा प्रमाणात ‘मॅनेज’ केले आहे. तसे हिंदुस्थानमध्ये घडू नये म्हणून अनेक उपाययोजना करणे गरजेचे आहे. सर्वात प्रथम प्रत्येक हिंदुस्थानी मीडिया हाऊसला त्यांच्यामध्ये असलेले परदेशी शेअर होल्डिंग प्रत्येक वर्षी आपल्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये जाहीर करणे जरुरी केले पाहिजे. चीन किंवा परदेशांमधून मिळणाऱया जाहिरातीचे उत्पन्नसुद्धा जाहीर केले जावे. सोशल मीडियावर चीनच्या बाजूने होणारा प्रपोगंडा किंवा प्रचार थांबवणे गरजेचे आहे. सर्वात हे जास्त महत्त्वाचे आहे की, प्रत्येक हिंदुस्थानीच्या मनात देशप्रेमाची भावना निर्माण केली जावी. ज्यामुळे चीन किंवा हिंदुस्थानच्या इतर शत्रुराष्ट्रांसाठी दुप्र्रचार युद्ध करायलाच ते तयार होणार नाहीत.