लेख – हिंदुस्थानविरुद्ध जलयुद्धाची व्यूहरचना?

>> प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल

पूर्व लडाखमध्ये आगळीक करून हिंदुस्थानला डिवचणाऱया चीनने आता हिंदुस्थानविरुद्ध जलयुद्धाची व्यूहरचना आखली आहे. जमिनीनंतर चीनचा आता हिंदुस्थानच्या पाण्यावर डोळा आहे. पवित्र ब्रह्मपुत्र नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधण्यास चीन लवकर सुरू करणार आहे. त्यामुळे हिंदुस्थानसोबत नव्याने वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. या धरणामुळे ईशान्य हिंदुस्थानला दुष्काळ व महापुराचा सामना करावा लागू शकतो.

साम्राज्यवादी चीनने हिंदुस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण केल्यानंतर आता पाण्यावरही अतिक्रमण करण्यास सुरुवात केलीय. चीन सध्या ब्रह्मपुत्र नदीवर जगातील सर्वात मोठं धरण बांधण्याची तयारी करत आहे. या धरणावर अंदाजे 60 गिगावॅट वीज निर्मितीचाही उद्देश असल्याचं कळतंय. हे धरण तिबेट या स्वतंत्र प्रदेशात बनवलं जाणार आहे. त्यामुळे तिबेटमधील नागरिक आणि पर्यावरणवाद्यांकडून या महाकाय धरणाला विरोध होतोय, मात्र 2060 पर्यंत कार्बन उत्सर्जनमुक्त होण्याचं लक्ष्य गाठण्यासाठी चीन हा प्रकल्प मोठय़ा ताकदीने रेटत आहे.

विशेष म्हणजे चीन ज्या तिबेटमध्ये हे धरण बनवण्याचा घाट करत आहे त्या तिबेटमध्ये नद्यांची देवीप्रमाणे पूजा केली जाते. नद्यांना जपणं आणि त्यात कोणताही मानवी हस्तक्षेप न करणं हे त्यांचं वैशिष्टय़ आहे. त्यामुळेच चीनने तिबेटवर नियंत्रण प्रस्थापित करण्याआधी तिबेटमधील नद्यांवर एकही धरण बांधलेलं नव्हतं, मात्र चीनच्या साम्राज्यवादाने तिबेटच्या परंपरा मोडीत काढत धरण बांधण्यास सुरुवात केलीय. त्यामुळे स्थानिकांमध्ये या विरोधात मोठा असंतोष आहे.

हिंदुस्थान, बांगलादेशची चिंता वाढणार

ब्रह्मपुत्रा नदी चीनमधून वाहत येऊन हिंदुस्थान आणि बांगलादेशातून वाहते. त्यामुळे दोन्ही देशांच्या चिंतेत वाढ झाली आहे, मात्र चीननं हिंदुस्थान आणि बांगलादेशावर याचा काही परिणाम होणार नाही, दोन्ही देशांच्या हिताचा विचार केला जाणार असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, हिंदुस्थान आणि चीनच्या सैन्यामध्ये जून महिन्यात लडाखजवळील गलवान खोऱयात तणाव झटापट झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. गेल्या सहा महिन्यांपासून पँगाँग सरोवरच्या पश्चिम भागात घुसखोरी करून ठिय्या मांडून बसलेल्या चीनने अखेर या परिसरातून आपले सैन्य माघारी घेण्याची तयारी दर्शविली होती. पँगाँग सरोवराच्या फिंगर 8 पर्यंत सैन्य मागे घेऊन जाण्यास चीनने तयार असल्याचे स्पष्ट केले होते. चीनमधील ग्लोबल टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना 2921 ते 2025 या 14 व्या पंचवार्षिक योजनेत यारलुंग जंगबो नदीवर धरण बांधण्याचा विचार करत आहे. तिबेटमध्ये या धरणाची निर्मिती करण्याचा चीनचा मानस आहे. ग्लोबल टाईम्सनं पॉवर कन्स्ट्रक्शन ऑफ चायनाच्या सूत्रांच्या माहितीनुसार चीन ब्रह्मपुत्रा नदीवर मोठा जलविद्युत प्रकल्प उभारणार असल्याची माहिती दिली आहे.

ब्रह्मपुत्रा नदी आशियातील सर्वात मोठी नदी

ब्रह्मपुत्रा नदी आशियातील सर्वात महत्त्वाची नदी आहे. ही नदी चीन, हिंदुस्थान आणि बांगलादेशमधून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. पॉवर कन्स्ट्रक्शन ऑफ चायनाच्या चेअरमनने मागील आठवडय़ात एका परिषदेत चीनच्या इतिहासातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प उभारणार असल्याचे स्पष्ट केले.

चीननं तिबेटवर स्वामित्व दावा केला आहे. या भागात दक्षिण आशियातील प्रमुख सात नद्यांची उगमस्थान आहेत. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा, इरावदी, सल्वेन यांग्त्जी आणि मँकाँग या नद्यांच्या उगमस्थानवर चीनचं नियंत्रण प्रस्थापित होणार आहे. ब्रह्मपुत्रा नदी तिबेटमध्ये उगम पावते. त्यानंतर हिंदुस्थान व बांगलादेशातून बंगालच्या उपसागरात जाते. सुमारे 2,900 किमी एवढा या नदीचा प्रवाह आहे. तिबेटमध्ये यारलुंग तसंगबो या नावाने ही नदी लोकप्रिय आहे. नदीच्या खालच्या पात्रात नव्या पंचवार्षिक योजनेनुसार 2025 पर्यंत जलविद्युत प्रकल्प बांधण्यात चीनचा मनोदय आहे. हिंदुस्थान आणि चीनदरम्यान पाण्याची आकडेवारी एकमेकांना सांगण्याबाबत करार आहे, मात्र 2017 मध्ये चीनने डोकलाम तणावाच्या वेळी ही आकडेवारी देण्यास नकार दिला होता. आता लडाखमध्ये दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती असताना चीनने महाकाय धरण उभारण्याची घोषणा केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या