
>>राहुल गोखले
मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियापासून अवघ्या आठ मैलांवर असणाऱया घारापुरी बेटाला प्राचीन इतिहास लाभला आहे. अभ्यासक आणि संशोधक रवींद्र लाड यांनी नाण्यांच्या आणि खापराच्या आधारे हा दोनेक हजार वर्षांचा शोध घेण्याचा प्रयत्न दीर्घकाळ केला. त्यावर आधारित ‘बखर घारापुरीची’ हे पुस्तक घारापुरीच्या इतिहासाचा पटच उभा करते.
पुस्तकाच्या सुरुवातीला लेखकाने मुंबईचा धावता आढावा घेतला आहे. घारापुरीला एलिफन्टा हे नाव पोर्तुगीजांनी का दिले याचीही कहाणी सुरुवातीस लेखकाने दिली आहे. 1534 साली पोर्तुगीजांनी हे बेट ताब्यात घेतले आणि तिथे खोदकाम सुरू केले. तेव्हा उत्तम कोरीव काम केलेला सात फूट उंचीचा हत्ती तेथे गवसला. हॅमिल्टनसारख्या प्रवाशाचा दाखला देऊन लेखकाने त्यावरून पोर्तुगीजांनी या बेटाला एलिफंटा हे नाव कसे दिले आणि पुढे इंग्रजांनी ते कायम कसे ठेवले हे वर्णन केले आहे. अर्थात अशा रंजक वर्णनानंतर लेखक पुस्तकाच्या मूळ गंभीर विषयाकडे वळतो.
पुढील सर्व प्रकरणे ही घारापुरीत सापडलेली नाणी, खापरे, आणि त्यांची इतिहासाची सांगड यांना वाहिलेली आहेत. मुख्य म्हणजे या नाण्यांवरून घारापुरीवर राजवट कोणाची होती, घारापुरीचे जागतिक व्यापारात स्थान काय होते याचा शोध लेखकाने घेतला आहे. ही नाणी घारापुरी बेटाच्या पूर्वेला असणाऱया मोराबंदर गावातील मासेमारी करणाऱया शिंदे दांपत्याला खापरांची उलथापालथ करताना कशी मिळाली आणि या दांपत्याने हे किचकट काम केल्याने सातवाहनकालीन खापरांच्या तुकडय़ांत नाणी कशी मिळाली हे कृतज्ञतेने नमूद केले आहे. सातवाहनकालीन नाण्यांवर असणाऱया चिन्हांत स्वस्तिक, कमळ, अश्व आदी आढळली आणि अशीच नाणी नेवासे, पैठण आदी ठिकाणी पूर्वी सापडली होती हेही लेखक नोंदवितो. सम्राट चंद्रगुप्त (द्वितीय), यांच्यासह अन्य राजांच्या काळातील नाणी घारापुरीवर मिळाल्याने कोकणात तिसऱया-चौथ्या शतकात असणाऱया गुप्त कालखंडावर प्रकाश पडतो. तोही भाग लेखकाने विस्ताराने विशद केला आहे. सम्राट पुरुषगुप्त, सिंह विक्रमांकराज, त्रैकूटकी राजांची नाणी, सहाव्या-सातव्या शतकातील चालुक्यवंशीय राजांची नाणी, कलचुरी राजांची नाणी अशी विविध कालखंडांतील नाणी घारापुरी बेटांवर सापडली आहेत आणि त्यामुळे घारापुरीच्या इतिहासावर प्रकाश पडला आहे. सोन्यापासून तांब्यापर्यंत सर्व धातूंची ही नाणी आहेत असेही लेखक नमूद करतो. यातील सर्वाधिक लक्षवेधी भाग म्हणजे रोमन-बायझेंटाईन सम्राटाची सापडलेली नाणी. त्यातून रोम आणि हिंदुस्थान यांच्यात प्राचीन काळी व्यापारी संबंध होते हे सिद्ध होते असे लेखक सांगतो. रोमन स्त्र्ायांना हिंदुस्थानी मोती फार आवडत आणि त्यांची निर्यात होत असे हे लेखक नमूद करतो. या नाण्यांच्या आधारे या आयात-निर्यातीचा आणि तो कालखंड हा साधारण दुसरे ते सातवे शतक असण्याचा उल्लेख लेखकाने केला आहे. व्यापाराचा आणि तेथील गुंफांचा संबंध यांवरही लेखकाने विस्ताराने लिहिले आहे आणि ते मुळातूनच वाचले पाहिजे.
पुस्तकात नाणी, अन्य सापडलेल्या प्राचीन वस्तू यांच्या छायाचित्रांची रेलचेल असल्याने पुस्तकाची खुमारी वाढली आहे. लेखकाच्या सखोल संशोधक वृत्तीचा प्रत्यय वाचकाला पानोपानी आल्याखेरीज राहणार नाही. पुस्तकाची पूर्ण तयारी लाड यांनी केली; मात्र ते प्रकाशित होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यामुळे पुस्तकावर संपादकीय संस्करण करणे गरजेचे झाले. ज्येष्ठ पत्रकार नीला वसंत उपाध्ये यांनी ते निगुतीने केले आहे.
बखर घारापुरीची
लेखक: रवींद्र दत्तात्रय लाड
संपादकीय संस्करण: नीला वसंत उपाध्ये
प्रकाशक: ग्रंथाली,
पृष्ठ: 112, मूल्य: रुपये 300/-




























































