लसीकरणाचा वेग वाढवा

>> सुधीर लक्ष्मीकांत दाणी

1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस देण्यास सुरू केलेली आहे. जे नागरिक वृद्धाश्रमात आहेत त्यांना प्रत्यक्ष लसीकरण केंद्रात जाऊन लस घेणे सोयीचे असणार नाही. यासाठी सरकारने वृद्धाश्रमांत जाऊन लस देण्याची व्यवस्था करावी. आदिवासी पाडे, ग्रामीण भाग अशा ठिकाणीदेखील मोबाईल लस व्हॅन निर्माण करून लसीकरण करावे. सध्या कोरोनाची मोठय़ा प्रमाणावर साथ पसरत आहे. त्याचा परिणाम आता ग्रामीण भागातदेखील मोठय़ा प्रमाणावर दिसू लागला आहे. हे ध्यानात घेत सरकारने लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहे. टाळेबंदी हा कोरोनाच्या प्रसारावरील रामबाण उपाय नाही. टाळेबंदीच्या फायद्यापेक्षा टाळेबंदीचा मोठय़ा प्रमाणात देशाला तोटाच झालेला आहे. त्यामुळे टाळेबंदीबाबत समाजमन विरोधी आहे. आता कुठे समाजजीवन रुळावर येऊ लागले आहे. करोडो नागरिकांची टाळेबंदीमुळे  आर्थिक ससेहोलपट झालेली आहे हे विसरून चालणार नाही. शहरी भागात लसीकरणासाठी होणारी मोठय़ा प्रमाणावरील गर्दी हादेखील एक चिंतेचा विषय आहे. यातूनदेखील कोरोनाचा प्रसार होण्याचा अधिक धोका संभवतो हे लक्षात घेत सरकारने आता कोरोना लसीकरण पूर्णतः निर्बंधमुक्त करून ती पूर्णपणे खुली करावी. एकीकडे देशात धान्याची कोठारे भरभरून वाहत असताना त्यातील 10/20 टक्के अन्नधान्य उंदीर-घुशी खात असताना दुसरीकडे नागरिक उपाशी पोटी राहणे जितके सरकारचे अपयश स्पष्ट करते तद्वतच देशात कोटय़वधी कोरोना लसीचे डोस उपलब्ध असताना 130 कोटी लोकसंख्येच्या देशात महिन्यात केवळ  लाखांचे लसीकरण हे प्रमाणदेखील एक प्रकारे सरकारचे अपयशच अधोरेखित करते याविषयी दुमत संभवत नाही. एकीकडे दिवसागणिक वाढणारी रुग्णसंख्या तर दुसरीकडे टाळेबंदीचे सावट. या पार्श्वभूमीवर सरकारने लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठीचे विविध नावीन्यपूर्ण उपाय योजावेत.

आपली प्रतिक्रिया द्या