माझ्याशी मैत्री कराल…?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आसावरी जोशी, [email protected]

मगर… अत्यंत सभ्य, भिडस्त आणि सुसंस्कृत उभयचर प्राणी..स्वत:तच मग्न असणारा, पण आपण माणसांनी मात्र त्यालाही नरभक्षक ठरवून विनाकारण बदनाम केलंय.

कोणतेही शहर किंवा देश आदर्श, सुंदर आणि परिपूर्ण कधी ठरतो…? क़ायदा आणि सुव्यवस्था…सुजाण नागरिकत्व, सक्षम शासन, सक्षम यंत्रणा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शासनाच्या या सर्व यंत्रणांकडून जपले जाणारे, सांभाळले जाणारे पर्यावरण. पर्यावरण म्हणजे केवळ निसर्ग,पाने, फुले, नव्हेत तर निसर्गावर अवलंबून असणारे प्राणी-पक्षीही या पर्यावरणाच्या व्याख्येतच येतात. अत्यंत सुरक्षित प्राणी-पक्षी, सदा बहरलेली हिरवाई, प्रशस्त सावली देणारी डेरेदार झाडे या साऱयांनी आदर्श पर्यावरण तयार होते व एका सुसंस्कृत देशाच्या, राष्ट्राच्या, शहराच्या लौकिकात हे आदर्श पर्यावरण महत्त्वाचा भाग ठरते.

आपल्या मुंबईत किंवा महाराष्ट्रात असे आदर्श पर्यावरण आहे…? येथे प्राणी-पक्षी खऱया अर्थाने सुरक्षित आहेत…? हिरवाई, निसर्ग यांची जपणूक केली जाते…? या साऱया प्रश्नांचे उत्तर केवळ ‘नाही’ असेच येते. आजची एकंदर परिस्थिती पाहता…

मी काही उदाहरणे दिली आहेत. त्यामध्ये एक अगदी ताजेच आहे, तर बाकीची थोडीफार पुढची मागची पण ताजीच आहेत. सांगलीतील कृष्णाकाठावरील घटना. काठावर रेंगाळणाऱया बारा वर्षांच्या मुलाला मगरीने ओढून नेले. मगरीने सोडून दिले तरी मुलगा अजून सापडलेला नाही. रहिवासी भयभीत. आता वास्तवाच्या थोडे खोलात जाऊया. या नदीत मगरींचे वास्तव्य आहे. जेव्हा मुलगा तेथे रेंगाळत होता तेव्हा मगरींची प्रणयक्रीडा सुरू होते. आजूबाजूची माणसेही तिथून निघून गेली होती. हा मुलगा एकटाच तेथे रेंगाळत होता. प्रजननाच्या कालखंडात नर मगर अत्यंत आक्रमक झालेला असतो. अशावेळी माणसांनी त्यांच्या विनाकारण खोडय़ा का काढाव्यात?

मुंबई ही मुळातच नको इतकी माणसांनी भरलेली आहे… तिच्या क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त. त्याचा भयंकर ताण मुंबई आणि तिच्या पायाभूत गोष्टींवर अर्थातच येतो आहे. हे असे असतानाही छोटेसे प्राणीजीवन खूप घट्टपणे मुंबईला धरून आहे, कवटाळून आहे… अगदी कितीही मानवी अतिक्रमणे झाली तरीही. बिबटे, चिमणी या भयंकर अतिक्रमणांना तोंड देत असतानाच एक खूप शांत प्राणी आपल्या अंगभूत शांत स्वभावानुसारच स्वतःच्या हक्काच्या अधिवासासाठी धडपडतो आहे.

मगर. लहानपणापासून गोष्टींतून…अशा चुकीच्या बातम्यांतून या शांत आणि सभ्य प्राण्याची प्रतिमा नेहमीच क्रूर, भयंकर, दुष्ट अशी केली गेलेली आहे, पण प्रत्यक्षात मात्र मगर हा अत्यंत भिडस्त, माणसांपासून लांब राहणारा…स्वतःच्या विश्वात रमणारा सुसंस्कृत प्राणी आहे. मगरीच्या अनेक जाती आहेत. त्यापैकी तीन जाती हिंदुस्थानात आढळतात.

खाऱया – या मगरी खाऱया पाण्यात राहतात त्यामुळे त्यांना खाऱया म्हणतात. त्या 7 मीटर किंवा त्याहूनही लांब वाढू शकतात. त्यांचे वजन 1000 किलोपर्यंत असू शकते. मांसाहारी असलेल्या या प्राण्याचे खाद्य उंदीर, बेडूक, मासे, साप, खेकडे, कासवं, हरीण हे होय. माणूस कधीही नव्हे. अतिशय कमी प्रमाणात मगर खाते. ती दिवसाला फक्त 500 ते 700 ग्रॅम अन्न खाऊ शकते. माणसाने जर तिच्या अधिवासात हस्तक्षेप केला किंवा काही संशयास्पद वर्तन केले तर मात्र मग आक्रमक होऊन प्रतिहल्ला चढवते, पण पकडून सोडून देते. खात नाही.

गोड्या पाण्यातील मगर किंवा घडीयाल – तिन्ही जाती एकमेकांशी साधर्म्य दाखवणाऱ्या आहेत. फक्त या दोन जाती आपल्या शहरातील तळी, तलाव, नद्यांमध्ये आढळतात.

मगरीच्या शेपटाचा उपयोग पोहण्यासाठी होतो हल्ला चढवण्यासाठी नाही. ज्याप्रमाणे प्रजनन काळात नर आक्रमक झालेला असतो त्याचप्रमाणे आई आपल्या पिलांच्या आणि अंडय़ांच्या संरक्षणार्थ आक्रमक झालेली असते. एकावेळेस साधारणतः 100 अंडी ती घालते. किनाऱयावर अंडी घातल्यानंतर खूपशा पाल्यापाचोळ्याने ती अंडी ती झाकून टाकते. त्यावर पाण्याचा हबका मारते. पुढे तो पालापाचोळा कुजून अंडय़ांना ऊब मिळते आणि मौजेची गोष्ट म्हणजे या उबेवरून अंडय़ातील जीव नर किंवा मादी हे ठरते. या काळात मगर आपल्या पिल्लांच्या सुरक्षेबाबत अत्यंत दक्ष, आक्रमक झालेली असते. अशावेळी माणसं जर ती अंडी फेकून द्यायला लागली तर त्या आईने काय करावे?

पर्यावरणातील प्रत्येक गोष्ट माणूस स्वतःची वडिलोपार्जितच समजतो. यातूनच मगरींच्या त्वचेच्या तस्करीसाठी तिची सर्रास शिकार केली जाते. कायदा थेट फाटय़ावर बसवून.

आज पर्यावरणात मगरींचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. मगर कुजलेले मांस खाणारा प्राणी असल्यामुळे मेलेले मासे, प्राणी खाऊन तो नद्या, सरोवरे आणि आसपासचा परिसर स्वच्छ ठेवतो. त्यामुळे पाणीही स्वच्छ राहते. उंदरासारख्या उपद्रवी प्राण्याची संख्या नियंत्रणात राहते.

मराठीत म्हण आहे. भक्ष्य खाताना मगर नक्राश्रू ढाळते. यामागचे खरे कारण ती आपल्या शरीरातील अतिरिक्त क्षार काढून टाकत असते. पण आज मात्र तिच्यावर खरोखरच अश्रू ढाळण्याची पाळी आली आहे. एकतर विनाकारण तिच्यावर नरभक्षक हा शिक्का मारला गेला आहे. माणसांच्या न थांबणाऱया अतिक्रमणांमुळे त्यांचे नैसर्गिक अधिवास धोक्यात आले आहेत. दूषित पाण्यामुळे त्यांच्या राहण्यावरच संकट आले आहे. यातून मार्ग काढणे केवळ माणसांच्या पर्यायाने शासनाच्या निर्णयक्षमतेवर अवलंबून आहे.

आज केवळ चेन्नईत मगरींसाठी विशेष अधिवासाची सोय करण्यात आली आहे. तेथे त्यांचे उत्तम संगोपन केले जाते. सुरक्षित आयुष्य दिले जाते. आपल्या महाराष्ट्रातही हे सहज शक्य आहे. महाडची वशिष्ठाr नदी, मुंबईतील पवई तलाव, कोकणात सिंधुदुर्ग येथे मगरींना संरक्षण देणाऱया अनेक योजना केवळ कागदोपत्री बनविण्यात आल्या आहेत. त्यावर जर अंमलबजावणी झाली तर मगर आणि माणूस यांच्यातील संघर्ष संपू शकतो. अर्थात सामान्य माणसांनीही यासाठी सुज्ञपणे वागणे सर्वात आधी गरजेचे आहे.

– सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्राण्यांना खोटं वागता येत नाही. त्यांचे प्रेम आणि क्रोध दोन्ही अत्यंत खरे असते. हे माणसाने नेहमीच लक्षात ठेवावे.

– त्यांच्या अधिवासावर विनाकारण अतिक्रमण, उगीच प्राण्यांच्या खोडय़ा काढणे, त्यांना इजा पोहोचवणे असे प्रकार थांबवले तर बऱयाच गोष्टी सोप्या होतील. सामान्यांनी किमान आखून दिलेल्या कायद्याचे पालन जरी केले तरी पर्यावरणाचे रक्षण होऊन आपण सारेच म्हणजे प्राणी आणि माणूस एकोप्याने नांदू शकेल…नाही का?

– पवई तलावाच्या किनाऱ्यानजीकच्या पाण्यात अनधिकृत मासेमारी केली जाते. यातील एका मच्छिमाराने धक्कादायक खुलासा केला की, आमच्या जाळ्यात अनेकदा मगरींची अंडी येतात. ती आम्ही टाकून देतो.

संबंधित वनाधिकाऱयांचे विधान-आम्ही या तलावात हिंस्त्र्ा मगरी आहेत, असे फलक लावले असून नागरिकांनी तलावात उतरू नये असे सूचित केले आहे.
पवई तलावात असणाऱया मगरी केवळ टेकडय़ांपर्यंतच आढळून येत मात्र त्यांना बसण्याची ठिकाणेच उरली नसल्याने त्या माणसांच्या वस्तीपर्यंत येऊ लागल्या आहेत.

पवई येथील नारळाच्या झाडांखाली मगरी येऊन पहुडतात. पण तलावातील सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी, पर्यटकांकडून होणारा कचरा यामुळे मगरींचे तलावाच्या किनाऱयानजीकचे अधिवास बुजल्याने त्यांना अंडी घालणे अडचणीचे झाले आहे.