लेख : धगधगती ऊर्जा निर्माण करणारा ‘पँथर’

354
रिपब्लिकन नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह राजा ढाले, अर्जुन डांगळे आणि ज. वि. पवार हे तीन पँथर.

>> अर्जुन डांगळे

राजा ढाले हा धगधगती ऊर्जा निर्माण करणारा पँथरहोता. त्याच्या प्रत्येक लेखातून जाणवणारी अभ्यासूवृत्ती, चिंतनशीलता, तार्किकता आणि निर्भीड स्पष्ट भूमिका ही थक्क करणारी होती. याचे प्रत्यंतर म्हणजे चिमणे, चिमणे दार उघड…’ हा राजा ढालेचा एकूण मराठी प्रस्थापित साहित्याचा आणि साहित्यिकांचे पोस्टमार्टेमकरणारा किंवा नामदेवच्या विद्रोहमध्ये जो प्रदीर्घ लेख त्याने लिहिला तो त्याची प्रचीती देणारा आहे. राजा गेला. याअगोदर नामदेव गेला. तसे मरण हे अटळच असले तरी सत्य एवढेच की, आजही तरुण पिढीवर ज्यांचे गारुड आहे असे पँथर पिढीघडविणारे दोन मित्र निघून गेले.  

भल्या सकाळी बातमी कळली, राजा ढाले गेल्याची. आदल्या रात्रीच सुहास सोनावणे या अभ्यासक संशोधक मित्राच्या अभिवादन सभेत श्रद्धांजली वाहिली होती. राजाच्या निधनाच्या बातमीने मन विषण्ण झाले. चाळीस-पंचेचाळीस वर्षांचा भूतकाळ डोळय़ापुढे सरकू लागला.

दलित पँथरच्या स्थापनेच्या अगोदरपासून राजा ढाले आणि माझी मैत्री होती. 1967 साली मुंबईत महाराष्ट्र बौद्ध साहित्य सभेच्या वतीने जे साहित्य संमेलन झाले त्यावेळी तो आणि वामन निंबाळकर माझ्या चेंबूरच्या जुन्या घरी म्हणजे प्रगती सोसायटीत आले होते. राजा ढाले सिद्धार्थ विहार हॉस्टेलमध्ये राहायचा. कस्टममध्ये नोकरीला होता. सिद्धार्थ विहारमध्ये त्या काळात चळवळीचे आणि समाजाचे भान जपणारे अनेक विद्यार्थी होते. त्या काळात म्हणजे सत्तरीच्या आसपास महाराष्ट्रात दलितांवर, स्त्रीयांवर अन्याय-अत्याचाराची मालिकाच सुरू झाली होती. त्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी आम्ही ‘युवक आघाडी’ नावाची संघटना उभारली होती. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानाजवळ धरणेदेखील धरले होते. ‘तरुण मराठी कवी’ या नावानेही आम्ही फतवे काढायचो. अर्थात यात पुढाकार राजा ढालेचा असायचा. दलितांविरुद्ध अन्याय, अत्याचार थांबले नाही तर आम्ही हातात शस्त्र्ाs घेऊ, अशा आशयाचा एक फतवा आम्ही काढला होता. मी, राजा ढाले आणि नामदेव, बाबूराव बागूल यांच्या माटुंगा लेबर कॅम्पातील घरी सहीसाठी गेलो. बाबूरावांनी आम्हाला समजावत नकार दिला. राजाचे एक वैशिष्टय़ होते ते म्हणजे तो अतिशय तर्कशुद्ध मांडणी करायचा. त्याने बाबूरावांना त्यांच्याच एका कवितेतील ओळी सांगितल्या. त्या अशा होत्या,

ज्यांनी चूक केली इथे जन्म घेण्याची

त्यांनीच ती सुधारली पाहिजे

देश सोडून अथवा

भीषण युद्धे करून

नंतर कवितेची भाषा, जगण्यातील भाषा यावर चर्चा झाली. दुसरे उदाहरण नारायण सुर्वे यांच्या कवितेचे. नारायण सुर्वे यांचा ‘माझे विद्यापीठ’ हा कवितासंग्रह खूपच गाजला. नारायण सुर्वे यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर होता. पण ‘चेरू’ या अनियतकालिकात राजा ढालेने या कवितासंग्रहावर परीक्षण लिहिले. त्यात त्याने एका विसंगतीवर बोट ठेवले. एका कवितेत सुर्व्यांच्या ओळी होत्या. ‘ग्रंथ लेनिनचा पठण केला आम्ही’ तर दुसऱ्या एका कवितेत ओळी होत्या ‘अनुभव हाच ग्रंथ, बाकी सारे ग्रंथराज कोलमडून पडतात.’ मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा कट्टा म्हणजे सत्तरीच्या दशकातील विद्रोही, दलित, संतप्त मार्क्सवादी अशा कवी-लेखकांचा अड्डा होता. तिथे आमची आणि सुर्व्यांची भेट झाली. राजाने दाखविलेली विसंगती त्यांनी दिलदारपणे स्वीकारली होती.

या छोटय़ाशा लेखात राजा ढालेच्या कुठच्या अंगाबद्दल लिहायचे याबद्दल प्रश्नच पडतो. कवी, समीक्षक, अभ्यासक, विचारवंत,  चित्रकार, प्रतिभावंत ही कला साहित्यातील अंगे त्याच्या जवळ होतीच. पण सामाजिक विशेषतः आंबेडकरी चळवळीविषयीचा त्याचा दृष्टिकोन आणि बाबासाहेबांनी स्वीकारलेल्या बौद्ध धम्माचे मूलभूत आकलन आणि त्यावर त्याने केलेले भाष्य हे वेगळेच आहे. राजा ढाले याची सगळीच मते किंवा भूमिका ही योग्यच होती असे मी मुळीच म्हणणार नाही. त्याबद्दल मतभेद असू शकतात. पण राजा ढाले हा धगधगती ऊर्जा निर्माण करणारा ‘पँथर’ होता. त्याच्या प्रत्येक लेखातून जाणवणारी अभ्यासूवृत्ती, चिंतनशीलता, तार्किकता आणि निर्भीड व स्पष्ट भूमिका ही थक्क करणारी होती. याचे प्रत्यंतर म्हणजे ‘चिमणे, चिमणे दार उघड…’ हा राजा ढालेचा एकूण मराठी प्रस्थापित साहित्याचा आणि साहित्यिकांचे ‘पोस्टमार्टेम’ करणारा किंवा नामदेवच्या ‘विद्रोह’मध्ये जो प्रदीर्घ लेख त्याने लिहिला तो त्याची प्रचीती देणारा आहे. ‘वाळवंटाची लेक’ हा ‘अस्मितादर्श’मधील संत जनाबाई यांच्या व्यक्तित्वाचा शोध लेख हा राजा ढालेच्या प्रतिभेचा आणि व्यासंगाची साक्ष देणारा होता. मला तो खूप आवडला. मी राजाला फोन केला. त्यावेळी त्याने माझे एक नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक पाठव असे सांगितले. मी त्याला त्याचे ‘बौद्ध पूजा पाठ’ मागितले. मी पुस्तक पाठवले. दोन चार दिवसांतच त्याचे पोस्टकार्डवर लिहिलेले पत्र आले की, पुस्तक सध्या उपलब्ध नाही. सांगायचा मुद्दा हा की त्याचे अक्षर वळणदार, स्वच्छ, सुंदर काळय़ा शाईत असायचे. लिखाण इतके टापटिपीने करणारा राजा ढालेशिवाय अन्य कुणी लेखक माझ्या पाहण्यात नाही. ‘रिडल्स’चे जे आंदोलन झाले त्यात सगळय़ा आंबेडकरवादी पक्ष, संघटना एकत्र होत्या. त्या समितीचा अध्यक्ष मी होतो. ‘फुले-आंबेडकर विचार संवर्धन समिती’ असे तिचे नाव होते. हे नाव राजा ढाले यानेच सुचविले होते. तर या समितीने ‘रिडल्स’संबंधी जी भूमिका मांडली ती दीर्घ भूमिका सुवाच्च, सुंदर हस्ताक्षरात राजा ढाले, रामदास आठवले आणि शिंदे नावाचे माझ्या कार्यालयातील मित्र या तिघांनी मिळून ती लिहिली आहे. राजा ढाले याच्या चित्रातील कल्पकता आणि आशयगर्भता बघायची असेल तर ज. वि. पवार यांच्या कवितासंग्रहाला जे मुखपृष्ठ त्याने काढले आहे ते पहावे. रेषा आणि रंग याचा अप्रतिम मेळ त्यात आहे.

दलित पँथरचा नेता म्हणून राजा ढाले याला अमाप आणि अद्वितीय प्रसिद्धी मिळाली. ‘काळा स्वातंत्र्य दिन’ हा साधनेच्या रौप्य महोत्सवी अंकात लिहिलेल्या राजा ढाले याच्या लेखाने खळबळ माजविली. विदुषी दुर्गा भागवत आणि राष्ट्रध्वजावर केलेल्या विधानाने राजा ढाले प्रकाशझोतात आला. या अगोदर लघु अनियतकालिकांच्या चळवळीमुळे वाङ्मयीन क्षेत्रात त्याचा दबदबा होताच. पण सामाजिक क्षेत्रात ही त्याची पहिली खळबळजनक कृती होय. ‘साधना’वर टीकेचा वर्षाव सुरू झाला. ‘साधना’ला पाठिंबा देण्यासाठी ‘दलित पँथर’ उतरली. पुढे ‘वरळीची दंगल’ झाली. राजा ढाले याच्यावर खटले भरले गेले. पोलिसांनी त्याला प्रचंड मारहाण केली. त्याचे डोके फुटले, अटक केली गेली. जामिनावर सुटल्यावर राजा काही दिवस माटुंगा लेबर कॅम्पमध्ये राहिला. माझ्या घरी दोन दिवस होता. अशोक जैन यांनी माझ्याच घरी ‘मनोहर’साठी त्याची मुलाखत घेतली. नामदेव आणि राजा हे दोघेही माझे मित्र. आंबेडकरी चळवळीतल्या सर्व स्तरावर फाटाफूट घडवून आणणारा ‘मार्क्सवाद – आंबेडकरवाद’ हा मुद्दा नंतर पुढे आला. पँथरमध्ये फूट पडली. अर्थातच मी वैचारिकदृष्टय़ा नामदेव ढसाळच्या पाठीशी उभा राहिलो. हा सगळा इतिहास क्लेशदायक आहे. पुढे राजा ढालेने ‘दलित पँथर’ बरखास्तीची घोषणा केली आणि ‘मास मूव्हमेंट’ नावाची संघटना उभी केली, पण राजा ढालेची एकूणच प्रवृत्ती आणि प्रकृती ही ‘मास लिडर’ या  कल्पनेशी मिळतीजुळती नव्हती. नंतरच्या काळात मी बाळासाहेब आंबेडकरांसोबत भारतीय रिपब्लिकन पक्ष, भारिप बहुजन महासंघ स्थापन केला. आज जसा वंचित बहुजन आघाडीला जनाधार आहे तसाच जनाधार ‘भारिप-बहुजन महासंघा’ला होता. राजा ढाले व त्याचे सहकारी ज. वि. पवार हे भारिप – बहुजन महासंघात सामील झाले. पुन्हा आम्ही बरोबर काम केले. राजा ढालेला लोकसभेचे उमेदवार केले गेले. मध्य मुंबईत त्याला लाखाच्या वर मते मिळाली, पण राजा ढाले याचे व्यक्तिमत्त्व चौकटीत आणि ‘आदेशा’त बसणारे नव्हते. आमच्यासारखे अनेकजण तिथून बाहेर पडले तसे राजा ढालेही तिथून बाहेर पडला. ज. वि. पवार अजून तिथेच आहेत.

मला बऱ्याचवेळा एका राजा ढालेमध्ये दोन राजा ढाले दिसायचे. ते म्हणजे वैचारिकता आणि भूमिकेच्या बाबतीत ठाम असलेला शिष्ट वाटणारा, आपले मत स्पष्टपणे हट्टाने मांडणारा, तार्किकता आणि संदर्भ देऊन आपली भूमिका भक्कम करणारा राजा ढाले. राजाने बोटचेपेपणाची भूमिका कधी घेतली नाही. बौद्ध संस्कार आणि विपश्यना या संदर्भात तो सडेतोड बोलायचा. अनेकजण अस्वस्थ व्हायचे. दुसरा राजा ढाले म्हणजे पानाशिवाय कसलेही व्यसन नसणारा, साधेपणाने राहणारा, बस, ट्रेन, पायी प्रवास करणारा, बडेजाव न मिरविणारा, मित्रांसोबत हास्यविनोद करणारा.

दीक्षा वहिनींच्या योगदानाचा उल्लेख केल्याशिवाय राजा ढाले नावाचे व्यक्तिमत्त्व परिपूर्ण होऊच शकणार नाही. त्यादेखील कस्टममध्ये नोकरीला होत्या. राजा सार्वजनिक जीवनात सक्रिय झाल्यावर दीक्षा वहिनी त्याच्या पाठीशी निष्ठsने, कणखरपणे आणि ध्येयाने उभ्या राहिल्या. आयुष्यातील चढउतार सोसले. वर्ष-दीड वर्षापूर्वी राजाची कन्या गाथा आणि मित्रमंडळींनी दीक्षा वहिनींच्या पंच्याहत्तरीनिमित्त सत्कार घडवून आणला आणि गाथाच्या आग्रहामुळे माझ्या हस्ते सत्कार करण्यात आला. राजादेखील त्यावेळी उपस्थित होता. राजा गेला. याअगोदर नामदेव गेला. तसे मरण हे अटळच असले तरी सत्य एवढेच की, आजही तरुण पिढीवर ज्यांचे गारुड आहे असे ‘पँथर पिढी’ घडविणारे दोन मित्र दुरावा ठेवून एकमेकांशी संवाद न करता निघून गेले. राजा ढाले याच्या स्मृतीला विनम्र अभिवादन…!

(लेखक हे प्रसिद्ध दलित साहित्यिक आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या