काळोखे दिवस आणि पंख तुटलेली फुलपाखरं…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलांबरी जोशी, [email protected]

गेल्या काही दिवसांत नैराश्य आणि तणावामुळे काही सेलिब्रिटी व्यक्तींनी मृत्यूला आपलंसं केलं आणि सारं जग हळहळलं. आयडॉल असं मानल्या गेलेल्या या व्यक्तींनी स्वतŠला असं संपवणं निश्चितच त्यांच्या चाहत्यांना मान्य होण्याजोगं नाही. मात्र जगासमोर असणारी त्यांची प्रतिमा त्यांच्या प्रत्यक्षातल्या आयुष्यापेक्षा वेगळी असते. प्रत्यक्ष आणि प्रतिमेच्या द्वंद्वात अडकलेल्या या व्यक्ती स्वत:चा तोल सावरू शकल्या नाहीत. अशी इतरही कारणं असू शकतात. या मानसिक द्वंद्वाचा वेध घेणारा हा लेख.

‘शा काहारी लोकांची मी कायम थट्टा करायचो आणि जवळपास त्यांना तुच्छच मानत होतो. पण हिंदुस्थानात, विशेषतः पंजाबमध्ये शाकाहारी खाणं हे मला ओझं वाटलं नाही. तिथल्या शाकाहारी खाद्यपदार्थांची चव तर अप्रतिम आहेच पण ते रंगीबेरंगी पदार्थ पाहूनच पोट भरतं..!’ जगभर फिरून आपली सीएनएनवरची ‘पार्टस् अननोन’ ही खाद्यपदार्थांवरची मालिका सादर करणाऱया सेलिब्रिटी शेफ अँथनी बोर्डेनचे हे उद्गार आहेत. बोर्डेननं आपली कारकीर्द वयाच्या १८व्या वर्षी न्यूयॉर्कच्या एका हॉटेलमध्ये बशा विसळून सुरू केली होती. प्रचंड कष्ट करून तो प्रमुख शेफ बनला. २८ वर्षांनंतर तो खाद्यपदार्थांवर टीव्ही मालिका सादर करून जगभर पोचला. बराक ओबामा या अमेरिकेच्या भूतपूर्व राष्ट्राध्यक्षांबरोबर व्हिएतनामच्या टपरीवजा हॉटेलमध्ये नूडल्स आणि स्वस्तातली बिअर घेतानाचा त्याचा फोटो २०१७ साली व्हायरल झाला होता, पण ८ जून २०१८ रोजी फ्रान्समधल्या एका हॉटेलमध्ये बोर्डेननं स्वतःला गळफास लावून घेतला आणि सारं जग सुन्न झालं…!

खरं तर टीव्ही आणि चित्रपटांमध्ये झळकणारे अनेक चेहरे आपल्याला आपले नातेवाईक किंवा शेजारी यांच्यापेक्षा प्रिय असतात. अशा लोकांपैकी कोणी आत्महत्या केली तर जवळचं माणूस गेल्यासारखंच दुःख होतं. त्याचबरोबर ‘इतकं ऐश्वर्य आणि सुखोपभोग यांची रेलचेल असताना त्यांनी आत्मघातकी निर्णय का घेतला असेल…’ असा प्रश्न मन पोखरतो. पण आपण अशा सेलिब्रिटीजना जेवढं जाणतो ते हिमनगाच्या पाण्यावर डोकावणाऱया टोकाइतकंच असतं. त्यांच्यातला जेवढा भाग आपल्यासमोर येतो त्यावरून आपण एक प्रतिमा मनात उभी करतो. ती प्रतिमा त्यांच्या प्रत्यक्षातल्या आयुष्यापेक्षा खूप वेगळी असते.

बोर्डेननं आत्महत्या का केली याचं तात्कालिक कारण समजू शकलेलं नाही, पण त्याच्या पूर्वायुष्यात त्याची कारणं दडलेली दिसतात. एक म्हणजे त्याला कॉलेजपासून अमली पदार्थांचं व्यसन होतं. दुसरं म्हणजे ‘आपल्या आजूबाजूला वेळोवेळी मृत्यू पावणारी माणसं पाहून बोर्डेनला खूप भीती वाटायची’ असं त्याच्या एका सहाय्यकाचं म्हणणं आहे. ‘ही भीती विसरण्यासाठी मी सतत खूप काम करत राहातो’ असं बोर्डेन म्हणायचा. आत्महत्येच्या आधी एकदा तो उपाशीपोटी वेदनाशामक औषधं घेतल्यानं फ्रान्सच्या एका रस्त्यावर चक्कर येऊन कोसळला होता. तेव्हा ‘आपण आता मरणार अशी भीती वाटल्याचं’’ त्यानं आपल्या बायकोला ईमेलही लिहिलं होतं. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘किचन कॉन्फिडेंशिअल’ या त्याच्या पहिल्या पुस्तकातच बोर्डेननं खूप प्रसिद्धी नैराश्याला कशी आमंत्रण देऊ शकते हे लिहिलं होतं.

सेलिब्रिटी असणं, नैराश्य आणि आत्महत्या यांचा खूप जवळचा संबंध आहे. उदाहरणार्थ, रॉबिन विल्यम्स या “मिसेस डाऊटफायर’’सारख्या भूमिकांमुळे गाजलेल्या अभिनेत्यानं कॅलिफोर्नियामध्ये गळफास लावून घेऊन आत्महत्या केली होती. त्याला पार्किनसन आणि स्मृतिभ्रंश हे मनोविकार असले तरी त्याच्या मित्रांनी त्याला नैराश्यही असल्याचं मान्य केलं होतं. मर्लिन मन्रोनं तर वयाच्या३६व्या वर्षी यशाच्या शिखरावर असताना स्वतःचं आयुष्य झोपेच्या गोळ्या घेऊन संपवलं. जे. एफ. केनेडींबरोबरचं प्रेम प्रकरण, स्वतःच्या आईचं मनोरुग्ण असणं, लहानपण अनाथालयांमध्ये काढणं..! अशा गोष्टींमधून आलेलं एकाकीपण आणि नैराश्य तिला आयुष्यभर पुरलं. इंप्रेशनिस्ट चित्रशैलीचा जनक व्हिन्सेंट व्हॅन गॉग याच्या काही चित्रांमधून आणि पोर्ट्रेटस्मधून त्याची नैराश्याकडे झुकलेली मनोवृत्ती स्पष्ट दिसते. त्यानंही १८९० साली स्वतःवर गोळी झाडून घेतली होती.

खरं तर नैराश्य हे सर्व स्तरांतल्या आणि कोणत्याही देशामधल्या लोकांना येऊ शकतं. पण सत्ता, संपत्ती, प्रसिद्धी याबरोबर नैराश्याचं प्रमाण वाढत जातं असा धक्कादायक निष्कर्ष अनेक मानसशास्त्रज्ञांच्या संशोधनांमधून निघालेला आहे. उदाहरणार्थ, श्रीमंत मुलांना मध्यमवर्गातल्या मुलांपेक्षा जास्त नैराश्य असतं. जास्त संपत्ती असलेल्या देशांमध्ये गरीब देशांपेक्षा नैराश्याचं प्रमाण जास्त आढळतं. कंपनीच्या सीईओजना इतर कर्मचाऱयांपेक्षा जास्त नैराश्य येतं.

याची काही प्रमुख कारणं आहेत. त्यापैकी पहिलं कारण म्हणजे जीवघेणी स्पर्धा..! ही माणसं सतत कोणाशी तरी स्वतःची तुलना करत राहतात. “माझं स्थान अबाधित राहील का’’ याची त्यांना क्षणोक्षणी भेडसवणारी भीती नैराश्याकडे नेते. असं “लिव्हिंग वुईथ डिप्रेशन’’ या पुस्तकाची मानसशास्त्रज्ञ असलेली लेखिका डेबोरा सेरानी हिचं म्हणणं आहे.

दुसरं म्हणजे यशाच्या पायऱया चढताना एकाच प्रकारचं साचेबद्ध काम अनेक दिवस, महिने, वर्षं न कंटाळता करावं लागतं. या प्रक्रियेत कुटुंबीयांबरोबर जेवणं, मुलांना घेऊन फिरायला जाणं, त्यांच्या बालिश तक्रारी ऐकणं अशा अनेक छोटय़ामोठय़ा आनंदांना अनेकदा मुकावं लागतं.

तिसरं म्हणजे “आपण असतो कसे यापेक्षा आपण दिसतो कसे’’ याला सेलिब्रिटीजना महत्त्व द्यावं लागतं. आपल्याच पूर्वायुष्यात आपण किती वेगळे, आनंदी किंवा स्वतःशी जास्त प्रामाणिक होतो हे यशाचे टप्पे गाठत असताना त्यांना जाणवत असतं. यातून येणारं वैफल्य हे निराशेकडे खेचत असतं. उदाहरणार्थ, “मला जितका जास्त बोनस मिळतो तितका मी माझा आहे असं वाटणं कमी होत जातं’’ असं एका धनाढय़ सीईओचं मत आहे.

चौथं म्हणजे, अनेकदा सेलिब्रिटीज चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येतात. त्यांना आयुष्यात संकट आलं तर कसं वागायचं याची जाणीवच नसते. मग त्यांच्या कारकीर्दीत एखादं अपघाती वळण आलं तर काय करावं ते कळत नाही. याउलट, जे स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे येतात त्या लोकांना यश पचवणं तुलनेनं सोपं जातं. यशोशिखरावरही ते आपला मानसिक तोल उत्तम सांभाळतात. अर्थात यालाही अपवाद आहेत.

पाचवं म्हणजे ज्या क्षेत्रात सेलिब्रिटी काम करतात तिथे शांतता लाभणं कठीण असतं. चाहत्यांची गर्दी, संपलेलं खासगी आयुष्य, निवांत क्षण मिळणं दुरापास्त होत जाणं यातून स्वतःसाठी वेळच उरत नाही.
थोडक्यात, “तुम्ही आनंदी “दिसता’’, पण तुम्ही आनंदी “असत’’ नाहीत अशा आयुष्याकडे आपण वाटचाल करत आहोत का?’’ हे आपण सगळ्यांनीच तपासत राहायला हवं.