
>> ललित चव्हाण
धुळे शहरात आर्थिक संपन्नता असलेल्या कुटुंबात माजी आमदार धरमचंद चोरडिया यांचा जन्म झाला होता. पारंपरिक व्यापार सांभाळून धरमचंद चैनीचे जीवन जगू शकले असते. पण विचार कसे अंगीकारावेत आणि विचारांशी कसे प्रामाणिक राहायचे, हे सांगण्यासाठी धरमचंद चोरडिया यांच्यासारख्या माणसांचेच दाखले द्यावे लागणार आहेत.
1980 च्या दशकात महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे नेते वसंतराव भागवत यांचे काम पुढे नेणारी दहा मुले होती. त्यातील एक धरमचंद चोरडिया होते. वसंतराव भागवतांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष-संघटनेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱयांमध्ये धरमचंद चोरडिया यांच्यासोबत प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विश्वास गांगुर्डे, प्रकाश जावडेकर, भाऊसाहेब फुंडकर, चिंतामण वनगा, अरुण अडसड, मधु पवार, माधव भंडारी, रमेश मेढेकर यांचा समावेश होता.
ज्या काळात धरमचंद चोरडिया यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन काम करण्यास सुरुवात केली, त्या काळात ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत सर्वत्र काँग्रेसची सत्ता होती. सत्ताधाऱयांच्या विरोधात त्याकाळी जी काही जनआंदोलने व्हायची, ती प्रामुख्याने कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, जनसंघ हे पक्ष करायचे. या प्रत्येक पक्षाकडे त्या वेळी सत्ताधाऱयांवर टीकेचा भडीमार करण्यासाठी काही मुलुखमैदानी तोफा होत्या. त्यातील धरमचंद चोरडिया ही जनसंघाची तोफ होती, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
अत्यंत कठोर शब्दात विषयाची मांडणी करण्याची अफलातून हातोटी चोरडियांकडे होती. वंचितांचे प्रश्न सोडविण्यासाठी वाट्टेल ते कष्ट घेण्यास धरमचंद चोरडिया कधीच मागे हटले नाहीत. महाराष्ट्रात 1972 मध्ये दुष्काळ पडला होता. त्या वेळी सातपुडय़ातील आदिवासींचे होणारे हाल पाहून धुळ्यातील दोन तरुणांनी सर्वस्व पणाला लावून आदिवासींच्या मदतीला जाण्याचा निर्णय घेतला. त्यातील एक धरमचंद आणि दुसरे लखन भतवाल. आणीबाणीच्या काळात धरमचंद चोरडिया यांनी महाराष्ट्रभर फिरून कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याचे काम केले.
‘साप्ताहिक सुदर्शन’मधून त्यांनी जनजागरणाचे कामही केले. साहजिकच तत्कालीन सरकारने त्यांना तुरुंगात डांबले. आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर आणि दिल्लीत जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर धरमचंद चोरडिया महाराष्ट्राच्या पातळीवर काम करू लागले. ओजस्वी वत्तृत्व आणि प्रेमळ स्वभावामुळे पुढे भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यानंतर धरमचंद चोरडियांकडे प्रदेश संघटन सचिव पद आले. त्यानंतर धुळ्यातील हा नेता महाराष्ट्राच्या नेते मंडळींच्या रांगेत जाऊन बसला. सर्वप्रथम 1995 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपची सत्ता आली, तेव्हा मंत्र्यांच्या यादीत धरमचंद चोरडिया यांचे नाव अग्रक्रमाने घेण्यात आले होते. परंतु दुर्दैवाने त्यावेळी राजस्थानातील एका भयंकर अपघाताने त्यांची संपूर्ण राजकीय कारकीर्दच ठप्प केली.
त्या अपघातात ते एवढे गंभीर जख्मी झाले की, नंतर बरीच वर्षे त्यांना सक्रिय राजकारणातून जवळजवळ निवृत्तच व्हावे लागले. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. अशा राजकीय नेत्याच्या वाटय़ाला जे दुःख, वनवास, एकाकीपण येते तेच धरमचंद चोरडिया यांच्याही नशिबी आले. त्यांच्या राजकारणाला उतरती कळा लागली. पक्षीय संघटनेतील त्यांची ‘स्पेस’ भरून काढायला इतर नेते होतेच. पुढील पिढीसाठी तर धरमचंद चोरडिया आणि त्यांचे पक्षासाठीचे कार्य हा ‘इतिहास’ झाला. आता तर तेच काळाच्या पडद्याआड गेले. स्वपक्षाच्या ते विस्मरणात गेले तरी त्यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर राजकीय आणि बिगरराजकीय क्षेत्रांतील अनेक जण हळहळले. धरमचंद यांचे हे संचितच नाही काय?




























































