दिवाळीच्या किल्ल्यामागचे रहस्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> योगेश गोखले

आमच्या लहानपणी दसऱयानंतरच्या 15 दिवसांत अभ्यासाबरोबर लढाई चालू असताना मनात मात्र किल्ल्याची तयारी चालू असायची. दिवाळीला किल्ला का करायचा हे मला ‘शास्त्रीय’ दृष्टीने कधीच कळले नाही. बहुधा मुलांनी फराळ बनवताना लुडबूड करू नये म्हणून कोणीतरी शोधून काढलेली ही नामी युक्ती असावी असे वाटायचे. आज कळतंय की दिवाळीतला किल्ला म्हणजे नुसता मातीचा डोंगर नव्हता. तर सगळ्या कुटुंबाला, संस्कारांना, संस्कृतीला अभेद्य ठेवणारा असा चिरेबंदी आणि चिरंजीवी तट होता तो!

दसरा संपून 2-4 दिवस होतात न होतात तोच दोन गोष्टींची तयारी सुरू व्हायची. सहामाही परीक्षा आणि दिवाळी किल्ला. दिवाळीला किल्ला का करायचा हे मला ‘शास्त्रीय’ दृष्टीने कधीच कळले नाही. बहुधा मुलांनी फराळ बनवताना लुडबूड करू नये म्हणून कोणीतरी शोधून काढलेली ही नामी युक्ती असावी असे वाटायचे. पण त्या दसऱयानंतरच्या 15 दिवसांत अभ्यासाबरोबर लढाई चालू असताना मनात मात्र किल्ल्याची तयारी चालू असायची. त्या 2 आठवडय़ांत शाळेतून घरी येताना बरोबर रस्त्यात वेगवेगळे दगड दृष्टीस पडायचे आणि मग गोलाकार दिसला की तो बुरुजासाठी, सपाट दिसला की राजांचं सिंहासन…!

कुठे वाटेत बांधकाम चालू असेल तर लॉटरीच लागायची. फरशांचे तुकडे पायऱया म्हणून दप्तरात, डब्याच्या पिशवीत रोज घालून आणायचे. घरी आई-आजीचा रोज लाडिक ओरडा खायचा. या 15 दिवसांत आम्ही एकमेकांशी भांडणारी भावंडे अगदी एकीमध्ये असायचो.

आपले दगड कोणी चोरू नये म्हणून मग ते घमेल्यात घालून कॉटखाली ठेवायचे (आता ते दगड कोण चोरणार?… पण त्या वयात ते सगळं फार सिव्रेट असायचं.) मेन विषयाचे पेपर संपायचे आणि कार्यानुभव /चित्रकला असे 2-4 पेपर राहिले असतानाच त्या किल्ल्याची पायाभरणी व्हायची. किल्ले बनवणं साधारण पहिलीपासून सुरू होतं; पण चौथीमध्ये इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा येतो आणि मग पुढची 4-5 वर्षे किल्ले बनवायला एक जोश चढतो. त्या 4-5 वर्षांत तोरणा, प्रतापगड, रायगड, जंजिरा हे बांधून झालेच पाहिजेत असा जणू पणच करायचो. (नाहीतर बहुदा 10 वीला बसू देत नसावेत.)

प्रतापगड म्हणजे मुख्य दगडाच्या साच्यातून बाजूला निघालेली एक निमुळती माची पाहिजे. रायगडावर बाकी काही नसले तरी एक टकमक टोक आणि एक हिरकणी बुरुज पाहिजेच. यात सगळ्यात ‘चॅलेंजिंग’ म्हणजे जंजिरा. कारण तो पाण्यात असणारा, त्यामुळे भोवतीचा खंदक इतका नीट पाहिजे की टाकलेलं पाणी 2-3 तास तरी टिकून राहिलं पाहिजे. म्हणजे मग वाढवून आमचं पाणी 8-9 तास टिकतं असं सांगता येतं. जंजिरा बांधताना सगळं झालं की मग बाजूच्या बंगल्यातला एक अनुभवी दादा सांगणार की, अरे, खाली प्लास्टिक घाला, मग त्यावर फरश्या टाका म्हणजे पाणी जास्त टिकतं …मग परत सगळं उकरा आणि बांधा (पण हे परत करायचा पंटाळा कधीच आला नाही.) जंजिरा असेल त्या वर्षी हळूच आजीला लग्गा लावायचा की दर 2 तासांनी थोडं-थोडं पाणी टाक. म्हणजे मग आपण खेळायला मोकळे आणि कोणीही मित्र आपल्या अपरोक्ष आपल्या किल्ल्यात खरंच 7-8 तास पाणी कसं टिकतं ते पाहायला आला तर त्याला पाणी दिसलं पाहिजे…म्हणजे आपली कॉलर ताठ.

प्रत्येक किल्ल्याला एक चोरवाट असायचीच. ती खरं तर आम्ही मनात योजलेली; पण चिखलाने गायब झालेली. पण तरीही ती आम्हा भावंडाना बरोबर दिसायची. बाकी घरातल्यांना ती शोधायला लावणे आणि आपण त्यांची परीक्षा बघणे हा एक आवडता खेळ. त्यांना सापडली नाही की आपण दाखवावी आणि घरातल्या मोठय़ांनी, अरे खरंच की म्हणावं.

परीक्षा संपायच्या आणि दिवाळीला 2-4 दिवस असायचे. ते 4 दिवस किल्ल्याला फिनिशिंग टच देण्यासाठी मग हात-घाईची लढाई व्हायची.. आता त्यात हळूहळू घरची सारी फौज सामील व्हायची. इतर वेळी काडेपेटीशी अजिबात खेळू न देणारी आजी, एक आख्खी भरलेली काडेपेटी आणून द्यायची. किल्ल्याच्या वाटेवर दोन्ही बाजूंनी लाव. मग आवडता उद्योग…2-4 काडय़ा पेटवायच्या आणि हौस भागली की बाकीच्यांनी गडाची वाट अधोरेखित करायची. शेजारच्या काकू किल्ल्यावर पेरायला मोहोरी किंवा हाळीव आणून द्यायच्या. कामाच्या गडबडीतून वेळ काढून आई डोकावून जायची. आईच ती… तिचं ते सहावं इंद्रिय, मुलांचं काय चाललंय हे तिला बरोबर सांगून असायचं. ती येऊन डायरेक्ट विचारायची… रायगड केलाय का… ते टोक अगदी टकमक कडय़ासारखं वाटतंय… खरं तर तो किल्ला रायगड, प्रतापगड, सिंहगड, पुरंदर काहीही होऊ शकला असता, पण त्या वयात आईने ओळखला म्हणजे आपला डिट्टो झालाय असं वाटून आमची छाती अभिमानाने भरून यायची. हेच ते प्रोत्साहन हे फार उशिरा कळलं!!

या गडबडीत वसुबारस उजाडायची. दिवाळीचा पहिला दिवस. आज किल्ल्याचं ओपनिंग. संध्याकाळी 5 वाजता आजी हाक मारून सांगायची की तुमच्या किल्ल्यासाठी ही खास मोठी वात करून ठेवली आहे, रात्रभर पणती उजळवेल. हीच ती माया.

मग आई किल्ल्यापाशी एक छोटीशी रांगोळी काढायची… आणि त्याच वेळी हे सगळं इतक्या वेळ त्रयस्थपणे पाहात आहेत असं वाटणारे आमचे आजोबा खराटय़ाच्या जाड किंवा पुंच्याच्या काडीला दोन भगवे कागदाचे त्रिकोण लावून किल्ल्यावर रोवायला भगवा ध्वज घेऊन यायचे. अरे, हे आपण कसे विसरलो…यालाच अनुभव म्हणतात हे तेव्हा माहीत नव्हतं. मग घरादारात आणि किल्ल्यात पणती लागायची आणि किल्ला, घर आणि आमची मनेही उजळून निघायची!!