
>> मेधा पालकर
स्त्री-मुक्तीवादी विचारांची, संत साहित्याची आणि वारकरी तत्त्वज्ञानाची अभ्यासपूर्ण अशी नव्या पद्धतीची मांडणी करून समाजापुढे आणणाऱया ज्येष्ठ संशोधक-लेखिका अशी डॉ. गेल ऑम्व्हेट यांची ओळख होती. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या व धोरण समितीच्या सदस्या अशी अनेक पदे त्यांनी भूषविली. डॉ. गेल या मूळच्या जन्माने अमेरिकेच्या असल्या तरी त्या तेथे विध्यार्थीदशेपासूनच वेगवेगळ्या चळवळीमध्ये सक्रिय होत्या. अमेरिकेच्या साम्राज्यवादी युद्धखोर प्रवृत्तीविरोधी उभ्या राहिलेल्या तरुणाईच्या चळवळीत त्या अग्रस्थानी होत्या. अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर त्या हिंदुस्थानात आल्या. वेगवेगळ्या चळवळींचा अभ्यास करत असताना त्या महाराष्ट्रात आल्या आणि महात्मा फुले यांनी केलेल्या संघर्षाला आपलेसे केले. पुढे महात्मा फुले यांच्या चळवळीवरच त्यांनी ‘वसाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड’ हा आपला पीएच.डी. प्रबंध अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कली विद्यापीठात सादर करून त्यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केली. त्यांचा हा प्रबंध हिंदुस्थानातच नव्हे तर जगभरात अभ्यासकांना मैलाचा दगड ठरला आहे. त्यांच्या या पुस्तकामुळे फुलेंची चळवळ पुन्हा नव्याने अधोरेखित झाली. इतकेच नव्हे या पुस्तकामुळेच प्रभावित होऊन बहुजन समाज पार्टीचे संस्थापक दिवंगत कांशीराम कासेगाव येथे येऊन त्यांचे मार्गदर्शन व सल्ला घेत असत. स्त्र्ााr-मुक्ती चळवळींचा अभ्यास करत असतानाच डॉ. गेल यांची क्रांतिवीरांगना इंदूताई पाटणकर यांच्याशी भेट झाली. आणि एमडी.चे शिक्षण अर्धवट सोडून पूर्णवेळ चळवळीत काम करण्याचा निर्णय घेतलेल्या डॉ. भारत पाटणकर यांना आपला जीवनसाथी म्हणून निवडले आणि त्यांचा वादळी प्रवास सुरू झाला. प्रगत राष्ट्राचे नागरिकत्व सोडून हिंदुस्थानी नागरिकत्व स्वीकारले. अफाट वाचनशक्ती, आणि पायाला भिंगरी बांधून फिरण्याची वृत्ती यामुळे डॉ. गेल या संपूर्ण देशात फिरत आणि लिहीत राहिल्या. वेगवेगळ्या चळवळीत पुढाकारात आणि सहभागात राहिल्या. चळवळींच्या बौद्धिक मार्गदर्शक बनून मांडणी करू लागल्या. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात इंदूताई पाटणकर यांच्या पुढाकाराने परित्यक्ता स्त्रियांच्या चळवळीच्या त्या प्रमुख आधारस्तंभ राहिल्या. मुक्ती संघर्ष चळवळीच्या वतीने दुष्काळ निर्मूलन चळवळ, दुष्काळ निर्मूलनासाठी बळीराजा धरणाची निर्मिती यासाठी झालेल्या संघर्षात नेहमीच पुढाकारात राहिल्या. श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली राज्यभर चाललेल्या विविध चळवळींमध्ये त्या वर्षभरापूर्वीपर्यंत सक्रीय होत्या. डॉ. गेल यांनी देशभरातील विविध विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले आहे. दि इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकली या प्रतिष्ठत अंकामध्ये आणि इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये यांचे विविध विषयावरचे लेख प्रकाशित झाले आहेत. ‘द हिंदू’ यामधील त्यांचा लेख वाचून विरप्पन यांनीसुद्धा पत्र पाठवून कौतुक केले आहे. डॉ. गेल यांची पंचवीसपेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित असून त्यामध्ये प्रामुख्याने कल्चरल रिव्होल्ट इन कोलोनियल सोसायटी- द नॉन ब्राम्हीण मुव्हमेन्ट इन वेस्टर्न इंडिया, सिकिंग बेगमपुरा, बुद्धिझम इन इंडिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, दलित अँड द डेमॉक्रॅटिक रिव्होल्युशन, अंडरस्टँडिंग कास्ट, वुई विल स्मॅश दी प्रिझन, न्यू सोशल मुव्हमेन्ट इन इंडिया यांचा समावेश आहे. डॉ. गेल यांनी देश आणि परदेशात अनेक संशोधन पेपर सादर केले असून शेकडो व्याख्याने दिली आहेत. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांची मुलगी प्राची, जावई तेजस्वी, नात निया हे सध्या अमेरिकेमध्ये वास्तव्यास असून ते तेथे वेगवेगळ्या चळवळीत सहभागी असतात. अनेक शोधनिबंध, व्याख्यानं, लेख अशा स्वरूपात त्यांनी आपले विचार पोहोचवण्याचं काम केलं आहे. प्रतिष्ठsच्या समजल्या जाणाऱया फुलब्राइट फेलोशिपसह त्यांना इतर फेलोशिप्स आणि पुरस्कार मिळाले आहेत. सत्यशोधक विचारांमधून शेतकरी महिला संघर्ष चळवळीसाठी तसेच जात, वर्ग व वर्ण, स्त्रीदास्य अशा सर्व विषमता दूर करण्यासाठी रचनेच्या विरोधात त्या काम करत होत्या. स्त्रियांच्या समानतेच्या चळवळीला अभ्यासपूर्ण परिमाण देणे हे त्यांचे ऐतिहासिक योगदान आहे. हिंदुस्थानी संस्कृती आणि व्यवस्थेचा खोलात जाऊन यांनी अभ्यास केला. महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेवर काम करणाऱया महिलांबाबत, जातीव्यवस्थेबाबत त्यांनी लोकांमध्ये जाऊन अभ्यास केला. शेवटच्या क्षणापर्यंत त्या संशोधन सुरू ठेवत जातीअंताच्या कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन करीत राहिल्या. गेल ऑम्व्हेट यांच्या निधनाने सामाजिक संशोधन क्षेत्रातील आणि विविध सामाजिक चळवळीत तळमळीने कार्यरत असलेले एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.





























































