
>> प्रशांत गौतम
डॉ. ल. का. मोहरीर हे संस्कृत, मराठी संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते. तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरीचे भाष्यकार तथा व्यासंगी प्रवचनकार होते. भारतीय शिक्षण मंडळाचे ते ज्येष्ठ सदस्य तर होतेच. संस्कृत-भारतीचे पूर्व प्रांताध्यक्ष होते. संभाजीनगर येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयातून प्रपाठक पदावरून ते पाच वर्षांपूर्वी सेवानिवृत्त होऊन पुण्यात स्थायिक झाले होते. त्यांच्या निधनाने संस्कृत आणि संत साहित्य लेखन चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. राष्ट्रीय विचाराने प्रेरित झालेले, शिक्षणाच्या पुनरुत्थानासाठी सचोटीने कार्य करणारे एक व्यक्तिमत्त्व होते.
‘प्रा. डॉ. ल. का. मोहरीर हे श्रीमद् भगवतगीतेचे साक्षेपी अभ्यासक म्हणून परिचित होते. शिवाय संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व असल्याने संत साहित्याचाही त्यांचा दांडगा व्यासंग होता. विशेष म्हणजे त्यांची वृत्ती समाजहितैषी आहे. त्यांची शब्दशक्ती कौतुकास्पद आहे. प्रदीर्घ अध्ययन, सखोल चिंतनातून व अखंड ध्यासातून सहजस्फूर्त घडलेले हे दर्शन आहे,’’ असे थोर शिक्षणतज्ञ वि. वि. चिपळूणकर मोहरीर यांच्या पुस्तकासाठी दिलेल्या अभिप्रायात नमूद करतात. एक काळ असा होता की, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी यांच्यावर रसाळ भाष्य, निरूपण ऐकावे ते वि. वि. चिपळूणकर, प्रा. वसंत कुंभोजकर आणि डॉ. ल. का. मोहरीर यांच्या ओघवत्या वाणीतून असा तो मूर्तिमंत प्रेरणा देणारा काळ या तिघांनी आपल्या अमोघ वाणीने गाजवला.
लक्ष्मण काशिनाथ तथा डॉ. ल. का. मोहरीर हे तर संस्कृत साहित्याचे गाढे अभ्यासक होते. पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील वासंतिक वर्गातील अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केले. दिल्ली येथे झालेल्या संस्कृती-भारतीय-संस्कृतशाळा संवादात सहभागी झाले. शिक्षणशास्त्र, संत साहित्य आणि संस्कृत भाषा अशीच त्यांच्या अध्ययनाची कार्यक्षेत्रे राहिली. शिक्षणशास्त्राचा अभ्यास करताना शैक्षणिक तत्त्वज्ञान, प्राचीन भारतीय शिक्षण, भारतीय मनोदर्शन असे विषय त्यांनी अभ्यासले. संत साहित्य अभ्यासताना – संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, रामदास स्वामी यांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला. संस्कृत साहित्यात 1) साहित्य दर्पण – विश्वनाथ, 2) रघुवंश – कालिदास, 3) कुमार संभव – कालिदास, 4) कादंबरी – बाणभट्ट, 5) नैशधीय चरितम् – श्री हर्ष, 6) दहा उपनिषदे, 7) श्रीमद् भागवत गीताशास्त्र, 8) पातंजल योगशास्त्र – पतंजली मुनी, 9) रामायण, 10) महाभारत अभ्यासले. संस्कृतविषयक बालचित्रवाणी कार्यक्रमांचे पटकथालेखन असो की, संस्कृत बोलू हे सदर लेखन असो, त्या-त्या निमित्ताने त्यांचे कार्य बहुआयामी होत गेले.
संस्कृत शिक्षकांचे राष्ट्रीय अधिवेशन, पूर्णवाद सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संस्कृत भाषेतून व्याख्यान असो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यापीठ प्रबोधिनीतर्फे आयोजित व्याख्यान असो, संस्कृत शिक्षक, प्राध्यापकांना श्रीमद् भगवद्गीता मूल्य शिक्षण मार्गदर्शन वर्ग असो, तिथे-तिथे त्यांच्या व्यासंगाचा परिचय होत गेला. अपना क्लब संस्कार प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते संभाजीनगरात असतानाच्या काळात रविवारीय संस्कार शाळा घेत असत. श्री ज्ञानेश्वर प्रतिष्ठान, वेदविद्या प्रतिष्ठान आयोजित उपनिषदांचे वैज्ञानिक महत्त्व व उपयुक्तता या विषयावर त्यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले होते. शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयात आयोजित संस्कृत चर्चासत्रात त्यांचे श्रीमद् भगवद्गीतेतील ज्ञान-विज्ञानाचे स्वरूप या विषयावर त्यांनी शोधनिबंधाचे वाचन केले. या लक्षणीय कार्यासोबतच त्यांचा विविध शासकीय, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक चळवळीत महत्त्वपूर्ण सहभाग राहिलेला आहे. महाराष्ट्र राज्य संस्कृत नाटय़ स्पर्धेचे परीक्षक म्हणून कार्य केले.
‘‘जनाचे श्लोक, संत तुकाराम जीवन निष्ठा, मातृ गौरव, वेणू सुधा, संतांची अभंगवाणी, आरोग्य सुखसंपदा, संस्कार, समर्पण, सर्वज्ञांची वचने, शुद्धलेखनाचे साडेतीन नियम, संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी, समर्थांचा अनुभूती विचार, झाडांची गाणी, भारतीय शिक्षण विचार- लोकप्रज्ञाः आविष्कार आणि स्वरूप, माय माऊली’’ अशी त्यांची विपुल ग्रंथसंपदा प्रसिद्ध आहे. संस्कृतमध्येही त्यांनी ग्रंथलेखन केले आहे. ज्याचा विविध मानसन्मानांनी, पुरस्कारांनी गौरव झाला. एखाद्या विषयाचा सांगोपांग अभ्यास कसा असतो. याचे उदाहरण म्हणजे डॉ. ल. का. मोहरीर यांचे देता येईल. त्यांचे कार्य व योगदान नक्कीच महत्त्वाचे आहे.




























































