ठसा – डॉ. यास्मीन शेख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रशांत गौतम

मराठी भाषेच्या व्याकरणतज्ञ यास्मीन शेख यांनी या आठवडय़ात वयाची 96 वर्षे पूर्ण केली आहेत. आजपर्यंत सातत्याने त्यांनी विविध नियतकालिके/वृत्तपत्रांतून भाषाविषयक विचार मांडले. मराठी माणसे बोलत असताना भाषेमध्ये परकीय शब्दांचा वापर अगदी सहज करीत असतात. मात्र आपणच आपली मराठी प्रदूषित करतो आहोत, याची त्यांना जाणीव नसते. याचे भान ठेवावे. बोलीभाषा कशीही असली तरी ललित, वैचारिक लेखनात प्रमाणभाषेचाच वापर झाला पाहिजे, असे यास्मीन शेख यांचे ठाम मत आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी तिची अभिजातता टिकवली पाहिजे, असे त्यांचे सांगणे आहे. मराठी भाषेचा दर्जा उंचावला पाहिजे, या दृष्टीने गेली कित्येक वर्षे आपल्या भाषाविषयक, मराठी भाषा व्याकरणविषयक कार्यातून मोठय़ा प्रमाणात प्रयत्न करीत आहेत. म्हणूनच त्यांनी मराठी भाषा आणि व्याकरणाचा व्यासंग धरला, वाढवला आणि टिकवलाही. मराठी प्रमाणभाषा आणि व्याकरण या क्षेत्रात तर त्यांची भूमिका एखाद्या व्रतस्थासारखी राहिली आहे. आपण मराठी शुद्ध बोलावे, शुद्ध लिहावे, असे त्यांना सातत्याने वाटते आणि आपल्या कार्यातून त्या प्रयत्नशील असतात. प्रमाणभाषा आणि व्याकरणाने मराठी भाषेचे सौंदर्य फुलते, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.

खरे तर त्यांचे मूळ नाव जेरुशा रुबेन. धर्माने ज्यू. इस्रायलमधील परदेशी आक्रमणानंतर काही ज्यू हिंदुस्थानात आले. त्यापैकीच रुबेन यास्मीन यांचा जन्म 21 जून 1925 रोजी नाशिक येथे झाला. घरात आई-वडिलांना वाचनाची आवड असल्याने वाचनाचा पहिला संस्कार यास्मीन यांच्यावर झाला. प्रा. श्री. म. माटे यांची विद्यार्थिनी असलेल्या यास्मीन शेख यांनी वसंतराव कानेटकर आणि श्री. पु. भागवत यांच्यासोबत काम केले. मराठी साहित्यातील तिघा दिग्गजांसोबत त्यांना सुरुवातीच्या काळात काम करण्याची मोठी संधी मिळाली. घरातच वाचन संस्कृती नांदत असल्याने त्यांच्या घरी किर्लोस्कर, स्त्र्ााr, मनोहर यांसारखी उत्तमोत्तम अनेक वाङ्मयीन मासिके, नियतकालिके येत असत. वडिलांची नोकरी सतत फिरतीची असल्याने अनेक गावे त्यांना बघता आली. शाळेत असताना त्यांचे कुटुंबीय पंढरपुरात होते. कथालेखनाची सुरुवातही त्यांनी तिथेच केली. पुण्यात शिक्षणासाठी त्या स. प. महाविद्यालयात दाखल झाल्या आणि साहित्यकार आणि शिक्षक असलेले माटे मास्तर त्यांना लाभले. माटे मास्तर हे शिक्षक आणि लेखक असल्याने त्याचा लाभ निश्चितच यास्मीन शेख यांना त्यांच्या प्रवासासाठी होत गेला. महत्त्वाचे म्हणजे माटे मास्तरांमुळेच त्यांना मराठी भाषेची जी गोडी लागली, ती वयाच्या 96 व्या वर्षीही कायम राहिली आहे. यास्मीन यांच्या कथा महाविद्यालयाच्या मासिकात प्रसिद्ध होत गेल्या. अल्पावधीतच त्यांनी माटे मास्तरांची आवडती विद्यार्थिनी असा लौकिकही मिळवला आणि त्याचसोबत उत्तम गुण प्राप्त करून यशही संपादन केले. शिक्षण पूर्ण होताच त्या मुंबईत एसआयईएस महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. त्या महाविद्यालयात त्यांना मराठी भाषा विभागप्रमुख म्हणून श्री. पु. भागवत लाभले. याच महाविद्यालयात कविवर्य विंदा करंदीकर हे शिकवायचे. व्याकरणाच्या अभ्यासाला भाषाशास्त्र्ााची जोड द्यावी, असे श्री. पुं.नी यास्मीन शेख यांना तेव्हाच सांगितले. अशा मार्गदर्शनातून आणि भागवत, करंदीकर यांच्यासारख्या श्रेष्ठ सारस्वतांच्या सहवासातून त्यांचा प्रवास बहुआयामी होत राहिला. त्यांच्या या प्रवासात वसंत कानेटकर यांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. डॉ. यास्मीन शेख यांनी व्रतस्थ वृत्तीने भाषाशास्त्र्ा आणि व्याकरण या विषयांसाठी आपले जीवन वाहून घेतले.

मराठी शब्दलेखनकोश, मराठी लेखन मार्गदर्शिका असे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथलेखन सांगता येईल. भानू काळे यांच्यासारख्या जाणकार अभ्यासकाने तर त्यांना आपल्या ‘अंतर्नाद’ या वाङ्मयीन मासिकाच्या अधिक गुणवत्तेsसाठी व्याकरण सल्लागार म्हणून नियुक्ती करून त्यांच्या कार्याचा सन्मान केला, तो त्यांनीही प्रदीर्घ काळ आपल्या कार्यातून जपला. मराठी भाषेच्या व्याकरणतज्ञ म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱया यास्मीन शेख यांनी मराठी भाषा संवर्धन, संगोपनासाठी लक्षणीय असे योगदान दिलेले आहे. ज्याचा सन्मान महाराष्ट्र साहित्य परिषदेने ‘जीवनगौरव’ने केला. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या अशोक केळकर स्मृती पुरस्काराने त्यांचा गौरव झाला. वयाच्या 96 व्या वर्षापर्यंतचा हा प्रवास महत्त्वपूर्ण आहेच; लेखनात प्रमाणभाषा वापरा, मराठी शुद्धलेखनाचे नियम पाळा. ही त्यांची भूमिका तेवढीच महत्त्वाची राहिली आहे.