ठसा – डॉ. जुल्फी शेख

>> डॉ . तीर्थराज कापगते

‘मी कोण? मी फाळणी! विदुषकांनी माझे नामकरण केले. माझ्या ललाटावर फाळणी नावाचे सवतपण उमटवून चेहऱ्याची माझ्या प्लॅस्टिक सर्जरी केली…’ अशा बोलक्या ओळींमधून फाळणीच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या आणि आपल्या समूहाच्या उपेक्षेचा व अपरेपणाचा शोध घेणाऱया डॉ. जुल्फी शेख या मुस्लिम मराठी काव्यप्रवाहातील एक संवेदनशील कवयित्री होत्या. फुप्फुसाच्या कर्परोगाने वयाच्या 66 व्या वर्षी त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने मुस्लिम मराठी संतसाहित्याच्या अध्ययन क्षेत्राची मोठी हानी झाली.

डॉ. जुल्फी या संतसाहित्याच्या चिंतनशील आणि गाढय़ा अभ्यासक होत्या. ‘संत ज्ञानेश्वरां’च्या साहित्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने त्यांना डी.लिट. ही सर्वोच्च पदवी प्रदान केली. ही पदवी मिळविणाऱया देशातील त्या एकमेव महिला होत. त्यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण होते. मुस्लिम मराठी कवितेला प्रभावी व्यक्तिमत्त्व बहाल करणाऱया डॉ. जुल्फी यांचे ‘अक्षरवेध’, ‘मी कोण?’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. कधी दोन भाषांतले शब्द तर कधी शब्दसंकर किंवा एकाच वेळी पुराण आणि पुराण यांचे संदर्भ अशा अनोख्या काव्यशैलीची वेगळी कविता त्यांनी लिहिली. बच्चन यांची ‘मधुशाला’ त्यांनी मराठीत अनुवादित केली. मुस्लिम मराठी कविता, श्री ज्ञानेश्वरांचा वाङ्मयीन वारसा, नवे प्रवाह नवे स्वरूप इत्यादी महत्त्वाचे समीक्षा व संपादित ग्रंथ त्यांच्या नावावर जमा आहेत. उर्दू, अरबी व हिंदी गझलांचा त्यांचा चांगला व्यासंग होता. ‘गालीब-ए-गज़ल’ (पत्रानुवाद ) हा त्यांनी लिहिलेला 400 पृष्ठांचा ग्रंथ त्यांच्या सखोल अभ्यासाची साक्ष देतो.

मृदू वाणीच्या, मनमिळाऊ स्वभावाच्या आणि शालीन व्यक्तिमत्त्वाच्या डॉ. जुल्फी शेख यांचा एपूणच जीवनप्रवास वैशिष्टय़पूर्ण होता. जन्म अमराठी पुटुंबात व पूर्व विदर्भातील एका छोट्याशा खेडय़ातला, तरीही त्यांचे मन मात्र मराठी भाषा आणि संकेतांशी एकजीव झाले. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबरोबर डॉक्टरेट आणि विज्ञानाचे प्राध्यापक असलेल्या शेख यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांच्या प्रेरणेनेच लग्नानंतरही त्यांनी पुढचे शिक्षण सुरूच ठेवत मराठी वाङ्मयात एम. ए. केले. ‘सुफी संत शहामुंतोजी’ हा त्यांच्या आचार्य पदवीचा विषय. ग्रेस, डॉ. द.भि. कुळकर्णी व डॉ. वि.स. जोग यांच्यासारख्या थोर शिक्षकांचा सहवास त्यांना लाभला. तीस वर्षे अध्ययन केल्यानंतर प्राचार्यपदावरून त्या सेवानिवृत्त झाल्या. रातुम नागपूर विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठाच्या मराठी प्राध्यापक परिषदेच्या त्या अध्यक्षा होत्या. मुंबईत झालेत्या पाचव्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. मौलाना अ. करीम पारेखद्वारा अनुवादित पुरान-ए- शरीफच्या मराठी अनुवादात त्यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

हजारो वर्षांपासून हिंदुस्थानात भिन्न धर्मीय संस्पृती परस्परांच्या सान्निध्यात राहतात. मात्र विभाजनानंतर हे दोन्ही समूह कधी भयव्यापूळ तर कधी आक्रमक दिसू लागले. दोन धर्मांतील समान जीवनमूल्यांचा व दोन्ही समाजाच्या सांस्कृतिक सामंजस्याचा शोध घेणाऱया डॉ.जुल्फी या गंभीर अभ्यासक होत्या. त्यांच्या अकाली जाण्याने समन्वयाचा एक महत्त्वाचा दुवा निखळला.

आपली प्रतिक्रिया द्या