
हिंदुस्थानच्या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या सरकारनेदेखील नुकतीच व्हॅपिंगवर बंदी घातली असून तो आता अशी बंदी घालणारा जगातला 47 वा देश बनला आहे. जपान, ब्राझील, सिंगापूर, थायलंड, अर्जेंटिना अशा प्रमुख देशांचा या यादीत समावेश आहे. ‘व्हॅपिंग’ म्हणजे नक्की काय हे एखाद्या सामान्य माणसाला कळणे अवघड आहे, पण जगभरातील तरुणाईमध्ये मात्र याची प्रचंड क्रेझ निर्माण झालेली आहे. विशेषतः कुमार वयातील मुले या व्यसनाच्या विळख्यात प्रचंड वेगाने अडकली जात आहेत. तुम्हा आम्हा सामान्यांच्या शब्दात या व्हॅपिंगला आपण ई-सिगारेट म्हणून ओळखतो.
एका बाजूला या व्हॅपिंगचे गंभीर दुष्परिणाम समोर येत असताना, जगभरातील अनेक तरुण मोठय़ा प्रमाणावर या व्यसनाकडे वळत आहेत. विशेष म्हणजे धूम्रपान सोडण्याची इच्छा असलेले इतर वयोगटातील अनेक नागरिकदेखील व्हॅपिंगमुळे धूम्रपान सुटते या खोटय़ा प्रचाराला बळी पडून त्या व्यसनाचा आधार घेताना दिसत आहेत. जगभरातील डॉक्टर्स, बालरोग तज्ञ, मानसशास्त्रातील तज्ञ यांनी या व्यसनाविरुद्ध आता मोठी आघाडी उघडलेली आहे.
ई-सिगारेटचे दीर्घकालीन परिणाम अद्याप अज्ञात आहेत, परंतु अभ्यासात या व्यसनाने फुप्फुसाचे गंभीर नुकसान आणि आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. 2019 पासून, अनेक प्रतिष्ठत जर्नल्सने ई-सिगारेटमुळे होणाऱया फुप्फुसांच्या नुकसानाबाबत अहवाल दिला आहे. या व्यसनामुळे होणाऱया काही जखमा इतक्या गंभीर असतात की रुग्णाला थेट ICU मध्ये दाखल करावे लागते. विविध अभ्यासगटाने देखील ई-सिगारेटबद्दल प्रतिकूल मत व्यक्त केल्याने ई-सिगारेट आरोग्यासाठी निरुपद्रवी असतात या दाव्यावर थेट प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सिगारेटऐवजी ई-सिगारेटचा वापर केल्याने निकोटीनचे व्यसन प्रभावीपणे संपुष्टात येऊ शकते असा दावा करणे वैज्ञानिकदृष्टय़ा योग्य नाही असेदेखील अभ्यासातून पुढे आले आहे. कारण ई-सिगारेटमध्येही निकोटीन असते. जेव्हा एखादी व्यक्ती ई-सिगारेट वापरते तेव्हा निकोटीनची वाफ त्याच्या रक्तप्रवाहात पोहोचते आणि डोपामाइन सोडण्यास चालना देते असे समोर आले आहे.





























































