आभाळमाया – पृथ्वी (सं)तापली!

>> दिलीप जोशी

किती सहन करणार पृथ्वी? ‘गैया’ नावाच्या संकल्पनेनुसार तिलाही स्वतःचं भलंबुरं कळतं. त्यानुसार ती कधीकधी समस्त जीवसृष्टीला धक्के देते. पृथ्वीवर हिमयुग येणे, भूकंप होणे, त्सुनामी उसळणे, महावादळांनी थैमान घालणे या गोष्टी पृथ्वीच्या जन्मापासून काही नव्या नाहीत. महापूर किंवा वाळूच्या वादळांमुळे राहती वस्ती गाडली गेल्याचंही इतिहासाने अनुभवलं. मोहेंजोदारो-हडप्पा या सिंधू संस्कृतीतील महाकाय आणि नियोजनबद्ध नगरं गडप कशी झाली, त्याचा शोध आजही पूर्ण झालेला नाही. या विकसित जनजीवनाला स्पष्ट करणाऱया भाषेचा पत्ता लागत नाही. ज्या सील आणि टॅब्लॅट सापडल्या आहेत त्या वाचता येत नाहीत. त्यांचं आकलन (डि-कोडिंग) आजवर होऊ शकलेलं नाही.

त्यामुळे पृथ्वीवरचे नैसर्गिक उत्पात काही गेल्या दोन-चारशे वर्षांतले नव्हेत. प्रसंगी पृथ्वीचं तापमान शीत-उष्ण होण्याचा काळही आला असेल. पण सध्या अर्वाचीन काळापासून त्यात मानवनिर्मित सर्वंकष प्रदूषणाची सातत्यपूर्ण भर पडत चालल्याने आपण ‘डूम्स डे’ असलाच तर आपल्याच कर्माने अधिक जलद ओढवून घेत आहोत का, अशी परिस्थिती आहे.
आपली पृथ्वी हा अंतराळी ग्रहच आहे. सूर्यापासून तिसरा. जनक ताऱयापासून 15 कोटी किलोमीटर अंतरावरून पृथ्वी आपल्यासकट सर्व जीवसृष्टीला घेऊन सेकंदाला 30 किलोमीटर या वेगाने सूर्याभोवती फिरत आहे. तेव्हा खगोल म्हणजे केवळ डोक्यावरचं आकाश नव्हे तर पायाखालचा संगोपनकर्ता ग्रहसुद्धा खगोलातच येतो हे लक्षात घ्यायला हवं.

काही आठवडय़ांपूर्वी कॅनडा या उत्तर गोलार्धात यूएसच्याही वर असलेल्या देशात उष्णतेने एवढा कहर केला की, दोनशेहून अधिक लोकांचा बळी गेला. वर्षभर शीत किंवा सुखद ऊबदार वातावरण असणाऱया या देशात सध्याचा ऊबदार उन्हाळा म्हणजे पर्वणी असते. सूर्य 21 जूननंतर दक्षिणायनामुळे हळूहळू दक्षिण गोलार्धाकडे सरकेल. 25 ते 28 जुलै म्हणजे कालपर्यंत (आणि आजही) महाराष्ट्रात तो विविध ठिकाणी मध्यान्हीला, बरोबर डोक्यावर येईल. मे महिन्यानंतरचे हे दुसरे ‘शून्य’ सावलीचे दिवस. पण पावसाळय़ामुळे जुलैमध्ये तो अनुभव क्वचितच घेता येतो.

तर मूळ मुद्दा असा की, या वर्षी कॅनडा आणि उत्तर अमेरिकेतल्या प्रांतात, सिएटलसारख्या शहरात उन्हाळय़ाने लोक हैराण झाले. कधी नव्हे तो पारा 35 अंश सेल्सिअसच्या वर गेला. आपल्याला म्हणजे समशीतोष्ण कटिबंधात राहणाऱयाना त्याचं काही वाटत नाही. नागपूरकर तर पारा चाळिशीपार गेला तरी निवांत असतात. पण यावेळी उत्तर हिंदुस्थानातही काही ठिकाणी तापमान खूप वाढले. पाकिस्तानात काही ठिकाणी तर 50 अंशांपर्यंत गेल्याचे ऐकले. हे ‘ग्लोबल वॉर्मिंग’ त्रासदायक ठरलं.

हे असंच सुरू राहिलं तर आधीच अंटार्क्टिकावर असलेलं बर्फ ढासळून प्रचंड हिमनग समुद्रात वाहते होतील. ते वितळून पाण्याची पातळी वाढेल. हिमालय आणि आल्प्ससारख्या हिमपर्वतातून ग्लेशियर किंवा हिमनद्या निसटतील. त्या वितळून भूस्खलनही होईल. त्याचा परिणाम गंगा-यमुनेसारख्या नद्यांना तो बर्फ वितळून उन्हाळी पूर येतो तो ओसरेल. पाण्याची टंचाई कधी नव्हे ती त्या भागात जाणवू लागेल.

असे एक ना दोन, ग्लोबल वॉर्मिंगचे उत्पात आहेत. दगडी कोळशाचा अनिर्बंध वापर आणि अनेक गोष्टींमधून माणूस ‘प्रगती’च्या नावाखाली प्रदूषण निर्माण करतोय. त्याला कागदोपत्री जाग आलीय. पण ती प्रत्यक्ष कृतीत दिसेल तेव्हा खरं. निसर्ग, गारपीट, अवकाळी पाऊस, चक्रीवादळ आणि कॅनडावर तयार झाला तसा ‘हीट डोम’ किंवा ‘उष्णतेचा घुमट’ दाखवून आपल्याला इशारे देतोय. ‘सावध ऐका पुढल्या हाका’ म्हणताना या पुढच्या नव्हे तर आताच्याच आरोळय़ा आहेत. त्या कानाआड करून चालणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या