
>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
पंढरीची वारी हे अवघ्या महाराष्ट्राचे सुख निधान. विठुरायाच्या भेटीसाठी लाखो वारकरी पंढरपूरला निघाले आहेत. संपूर्ण जगात क्वचितच असा भक्ती सोहळा आयोजित होत असेल. ‘पंढरीचा वारकरी । वारी चुको नेदी हरी ।। संता संगे सर्वकाळ । अखंड प्रेमाचा कल्लोळ ।।’ अशी ही पंढरीची वारी आता केवळ लोकल नसून ग्लोबल झाली आहे. पंढरीच्या वारीमध्ये विश्व बंधुत्वाला कवेत घेण्याचे सामर्थ्य आहे. ‘उठा उठी अभिमान । जाय ऐसे स्थळ कोण ।। ते या पंढरीशी घडे । खळा पाझर रोकडे ।।’ अशी ही पंढरीची वारी. या वारीत अलीकडच्या काळात आध्यात्मिक उद्बोधनासोबत सामाजिक प्रबोधन घडत आहे. ग्राम स्वच्छता दिंडी, आरोग्य दिंडी, सामाजिक समता दिंडी, सांस्कृतिक संवाद दिंडी, संत कवयित्री महादिंडी अशा स्वरूपाचे चित्ररथ यंदाच्या वारीमध्ये पाहायला मिळतात. गेली बारा वर्षे या पंढरीच्या वारीत महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण विभाग तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या विद्यमाने आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयोजनाने ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाद्वारे पर्यावरण जागृतीचा संदेश तसेच प्रदूषणमुक्तीचा संदेश वारीमध्ये महाराष्ट्रातील प्रख्यात लोककलावंतामार्फत दिला जातो. संतांच्या भारुडांमध्ये अध्यात्मिक उद्बोधनासोबतच सामाजिक प्रबोधनही सांगितले आहे. ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धम । भेदाभेद भ्रम अमंगळ ।। असे संतांनी म्हटले आहे. ‘उच नीच काही नेणे भगवंत’ असेही संत म्हणतात. हा सामाजिक समतेचा संदेश वारीमध्ये दिला जातो. तसेच पर्यावरण जागृतीचा संदेश देताना लोककलावंत संतांच्या रूपकाश्रयी अभंगांचा चपखलपणे वापर करतात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने निघालेल्या वारीचे संयोजन महाराष्ट्र कला संस्कृती मंच संस्था करीत आहे. या वारीबद्दल मत व्यक्त करताना 86 नंबर दिंडी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा या दिंडीचे मालक ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे म्हणतात, पर्यावरण जागृतीचा संदेश केवळ आजच्या काळातला नाही तर तो ज्ञानोबा-तुकोबांच्या काळातला आहे. कारण संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत म्हटले आहे, ‘नगरेचि रचावी जलाशये निर्माण व्हावी महावने लावावी नानाविध.’ ज्ञानेश्वर महाराज वाबळे हे वारकरी कीर्तनकार यांच्या कीर्तनाची शैली गाडगे महाराज कीर्तन शैलीसारखी असते. या कीर्तनात ते स्वरचित जात्यावरच्या ओव्या सादर करतात आणि त्यातून पर्यावरणाचा संदेश देतात. इतकेच नव्हे तर हा संदेश देताना एकनाथी भागवतातला एक दृष्टांत देतात. गोकुळातील गवळी हे गोवर्धनाऐवजी इंद्राची पूजा करीत असत. भगवान श्रीकृष्णाने गवळ्यांना गोवर्धनाची पूजा करा, इंद्राची पूजा करू नका असा सल्ला दिला. इंद्रदेव रागावला. त्याने तुफान पर्जन्यवृष्टी केली, मात्र गवळी आणि श्रीकृष्ण डगमगले नाहीत. गोवर्धन पर्वत हिरवागार झाला. पाऊस जास्त पडेल, गोकुळ हिरवेगार होईल, धनधान्य पिकेल असा संदेश भगवान श्रीकृष्ण गवळ्यांना देतो. ही कथा ज्ञानेश्वर महाराज वाबळे वारीमध्ये मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तनात रंगून सांगतात आणि त्यातून पर्यावरणाचे महत्त्व विशद करतात.
भारुड सम्राज्ञी संगीत नाटक अकादमी विजेत्या चंदाबाई तिवाडी आपल्या भजनातून भारुडातून पर्यावरण जागृतीचा संदेश देतात.
वारीच्या अध्यात्मिक उद्बोधनासोबत सामाजिक प्रबोधनाचा विचार करता असे लक्षात येते. स्थानीय वारी आता जागतिक पातळीवर गेलेली आहे. प्रचार-प्रसाराची माध्यमे बदललेली आहेत. त्यामुळे वारीच्या पारंपरिक स्वरूपामध्ये आमुलाग्र बदल होत आहे. पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम निश्चितच पथदर्शी आणि पर्यावरण जागृतीला चालना देणार आहे.
(लेखक ज्येष्ठ लोककला अभ्यासक आहेत)


























































