लेख – युक्लिड दुर्बीण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक, [email protected]

युक्लिड हे नाव आठवण्यासाठी तुम्हाला मनाने शाळेत जावे लागेल. भूमितीचा जनक किंवा ‘फादर ऑफ जिऑमेट्री’ (आपल्याकडे जॉमेट्री म्हणत) म्हणजे इजिप्तमधल्या जगप्रसिद्ध अलेक्झॅण्ड्रिया विद्यापीठातील इसवीसनापूर्वी 300 वर्षे होऊन गेलेला विद्वान. याचा अर्थ युक्लिडचा काळ 2600 वर्षांपूर्वीचा. अचानक या गणिततज्ञाचं स्मरण होण्याचं कारण म्हणजे त्यांच्या नावाने अवकाशात गेलेली एक दुर्बीण. हबल दुर्बिणीनंतर चंद्रा दुर्बीण अवकाशात पोहोचली. प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ सर सी. व्ही. रमण यांचे नातेवाईक असलेले सुब्रमण्यम चंद्रशेखर आधी इंग्लंड आणि नंतर अमेरिकेत गेले व तिथलेच झाले. त्यांनी भौतिकशास्त्र आणि गणित, तसंच खगोलाचाही अभ्यास केला. सूर्याच्या वस्तुमानाच्या तुलनेत किती वस्तुमान असलं तर त्यांचं न्यूट्रॉन स्टारमध्ये रूपांतर होईल हे सिद्ध केलं. त्याच सूत्राने पुढे कृष्णविवराचं (ब्लॅकहोलचं) किमान वस्तुमान ठरलं. म्हणून त्यांच्या नावे ‘चंद्रा दुर्बीण’ अवकाशात झेपावली. याशिवाय सध्या दूरवरून आजपर्यंत ज्ञात नसलेला विश्वाचा पसारा धुडाळण्याचं कार्य जेम्स वेब दुर्बीण करतच आहे. तसेच काम करण्यासाठी युक्लिड दुर्बीण अवकाशात गेली.

वाइड-रेन्ज 600 मेगापिक्सलची युक्लिड दुर्बीण याच वर्षी 1 जुलैला अमेरिकेतल्या केप कार्निवल येथून अंतराळात गेली. युरोपीय स्पेस एजन्सी या संस्थेने बनवलेल्या या दुर्बिणीला डार्क युनिव्हर्स एक्स्प्लोरर’ (कृष्ण विश्वाचा शोध) किंवा ‘स्पेक्टोमेट्रिक ऑल स्काय कॉस्मिक एक्स्प्लोरर’ असंही म्हटलं जातं. याचा अर्थ ती आजवर अज्ञात असलेल्या विश्वात डोकावणार, फोटो काढणार आणि पृथ्वीवर पाठवणार. आपल्या विश्वात सुमारे 73 टक्के डार्क एनर्जी (कृष्ण ऊर्जा), 23 टक्के डार्क मॅटर (कृष्ण द्रव्य) असून आपण ज्याला ‘अतिविराट’ समजतो ते ऑप्टिकल युनिव्हर्स किंवा दृश्य विश्व अवघं चार टक्के आहे. तेच ट्रिलियन्स ऍण्ड ट्रिलियन्स दीर्घिकांनी भरलेलं आहे.

आपल्या मिल्की वे किंवा आकाशगंगा दीर्घिकेसारख्या किती गॅलॅक्सी आहेत त्याची गणतीच नाही. तरीही त्यांची संख्या मर्यादितच आहे. अवकाश विज्ञानाची हीच तर गंमत आहे. इथली गणितचं लाख, अब्जांच्या पुढे सुरू होतात. प्रकाशाचा वेगच सेकंदाला तीन लाख किलोमीटर आहे. बाकी अंतरांचं दमछाक गणित, संशोधक मोठमोठय़ा कॉम्प्युटर प्रोग्रॅमद्वारे करतात. त्यातून योग्य निष्कर्ष काढून इच्छितस्थळी अनेक यानं पाठवतात. 4 ऑक्टोबर 1957 रोजी स्पुटनिक-1 पासून सुरू झालेली ही अंतराळातली विज्ञानयात्रा केवळ अनंत आहे. ती आता थांबणे नाही. त्यात कुतूहलजन्य असं खूप काही आहे, पण रोजच्या व्यापातून वेळ काढून ‘विज्ञान विचार’ मनात रुजवायला थोडासा वेळ द्यायला हवा. कारण उद्याचं प्रमुख विज्ञान तेच आहे. त्यातलेच काही संशोधन पृथ्वी समजून घेण्यासाठी उपयोगी पडतंय. नकळत घराघरात पोहोचतंय. उपग्रहाचं वजन कमी करण्यासाठी लॅपटॉप शोधला गेला. आज लॅपटॉप म्हटलं की पुरतं. तो छोटा, चपटा कॉम्प्युटर आहे हे सांगायची गरज भासत नाही. विज्ञान असं व्यवहारात रुजतं तेव्हा त्याचा विचारही मनात रुजला तर नव्या पिढय़ांमध्ये आपल्याकडेही अनेक संशोधक निर्माण होतील. खरं तर आजही तयार होताना दिसतायत.

तर ‘युक्लिड’ दुर्बिणीचं रॉकेट पॅलेस ऍलिनिया स्पेस यांनी दुर्बीण एअरबस डिफेन्स ऍण्ड स्पेस तयार केली. 1 जुलैला केप कार्निवल येथून ती अंतराळात प्रक्षेपित झाली तेव्हा रॉकेटसह वजन होतं 2000 किलो, तर केवळ दुर्बिणीचं वजन 800 किलो होतं. दुर्बिणीचा व्यास 3 फूट 11 इंच असून लांबी 15 फूट आणि एकूण पसारा 10 फुटांचा आहे. ‘फोकल लेंथ’ 60 फूट, प्रकाश संचय गोळा करण्याचा भाग (कलेक्टिंग एरिया) सुमारे 15 फूट, तिची दृश्य टिपण्याची क्षमता (व्हिजिबिलिटी) उत्तम असून ती एल-2 म्हणजे लॅगरॅन्ज पॉइंट क्रमांक दोनवर कार्यरत आहे. आपलं आदित्य एल-1 सौरयान लॅगरॅन्ज बिंदू क्रमांक 1 वर आहे. क्रमांक एक हा बिंदू सूर्य-पृथ्वी यांच्या मध्ये (चंद्रापलीकडे) असून एल-2 पृथ्वीबाहेरच्या कक्षेत चंद्रापलीकडेच 15 लाख किलोमीटरवर आहे. आपल्या सौरयानाला सूर्याचं निरीक्षण करायचं तर युक्लिडला आऊटर स्पेस म्हणजे दूरस्थ विश्वाचा वेध घ्यायचाय हा फरक लक्षात घ्यायला हवा.

युक्लिड दुर्बीण ‘कोर्श’ प्रकारची असून त्यात तीन ऍस्फेरिकल आरसे आहेत. ते अंतर्वक्र (कॉनकेव्ह), बर्हिर्वक्र (कॉनव्हेक्स) आणि पुन्हा अंतर्वक्र अशा प्रकारचे आहेत. येत्या सहा वर्षांत या दुर्बिणीकडून संशोधकांच्या बऱयाच अपेक्षा आहेत. त्या पूर्ण होण्याचा आरंभ नुकताच झाला. दृश्य आणि अवरक्त (इफ्रारेड) तरंगलांबीतील अवकाशस्थ वस्तूंचे फोटो घेण्याची क्षमता असलेल्या या दुर्बिणीने अवकाशस्थ धूळ (कॉस्मिक डस्ट) पार करून एका दूरच्या दीर्घिकेचा स्पष्टपणे वेध घेतला. डाएट्रिक कार्श यांनी बनवलेल्या या दुर्बिणीचं हे वैशिष्टय़ तर आहेच, परंतु एखाद्या वस्तूवर फोकस करताना लेन्सला प्रकाशाच्या धूसरपणाचाही (स्फेरिकल ऍबेरेशनचा) विचार करावा लागतो. तसं झालं तर चित्रित करण्याची वस्तू फिकट दिसेल. त्यामुळे हा दोष दूर करूनच युक्लिड दूरस्थ वैश्विक गोष्टींचे फोटो घेत आहे.

आपलं (4 टक्केच) दृश्य विश्वच एवढं अगाध आहे की, ते कळायला वेळ लागेल म्हणण्यापेक्षा ते कायम कळतच राहणार आहे. ज्ञानाची तहान कधी भागत नसते. एकेकाळी समुद्रापर्यंतच भूमी आहे असं मानण्यापासून आपण आज अंतराळात कुठच्या कुठे जाऊन पोहोचलो आहोत. पृथ्वीवर माणसाने स्वतःला अबाधित ठेवण्याचा संकल्प केला तर अंतराळातले अब्जावधी विकल्प (पर्याय) आपल्या अभ्यासासाठी क्षितिज पसरून राहिले आहेत. संशोधक दिवस-रात्र काम करतायत. तशी संशोधक वृत्ती आपल्या तरुणाईत निर्माण व्हावी हा या लेखनाचा हेतू. निदान मनात जिज्ञासा निर्माण झाली तरी नेटवर सारं उपलब्ध आहे. आम्हाला त्यातलं काय कळणार? म्हणण्यापेक्षा ‘का नाही समजणार?’ अशी जिद्द मात्र हवी!