
>> वैजनाथ महाजन
वळीव म्हणजे एखादी सणसणत येणारी सर आणि सारे ओलेचिंब करून जाण्याचा प्रत्ययकारी आनंद असाच वळवाचा पाऊस असतो. तो ‘‘आला आला’’ म्हणेपर्यंत निघूनसुद्धा जातो आणि त्याचा काहीच नेम नसतो. असा जर कोणी बेभरवशाचा माणूस अगदी अनपेक्षितपणे दारी येऊन धडकला तर आपण ‘‘अगदी वळवासारखा आला’’ असे म्हणून त्याला जणू प्रत्यक्ष वळवातच उभा करत असतो. या सगळ्यात पाऊस येणे आणि पाऊस जाणे यामध्ये जो एक निसर्गाचा निरामय असा आनंद आपणाला मिळत असतो तो केवळ शब्दातीतच म्हटला पाहिजे.
आपल्या ऋतुमानातील वैशाख वणवा हा संधी आपल्या मनोमनी इतका रुळलेला आहे की, आपणाला उन्हाळा सुरू झाला आणि त्यातील चैत्र ओसरू लागला की, वैशाख वणवा सुरू झाला असे म्हणण्याची जणू कायमचीच सवय लागून गेलेली आहे. आता वैशाख म्हटल्यानंतर रणरणते उन्ह आणि त्याचा तडाखेबंद असा उन्हाळा हे तसे कायमचे समीकरण आहे. खरे तर उन्हाळ्यात उन्हाळा आणि त्यामुळे अंगाची होणारी काहिली यात नवीन काहीच नाही. त्यामुळे त्याबाबत सतत कुरकुर करण्यापेक्षा त्या उन्हातसुद्धा आपणाला काही आनंदाचे चार कवडसे शोधता येतात का हे पाहण्यास काय हरकत आहे. नाहीतरी उन्हाचे गाणेसुद्धा गाणारे कवी झाले नाहीत असे मुळीच मानण्याचे कारण नाही. कारण ‘गडे उन्हाचे झाले चांदणे’ असे गुणगुणणारी नायिकासुद्धा मराठी रसिकांनी पाहिलेली आहे.
फार वर्षांपूर्वी पंडित महादेवशास्त्री जोशी यांच्या ‘मानिनी’ या गाजलेल्या कथेवर मराठी चित्रपट निघाला होता. चित्रपटाचे नाव होते ‘वैशाख वणवा’. तेव्हापासून तर मराठी माणसाच्या मनातील वैशाख वणव्याने चांगलीच उचल खाल्लेली दिसते. त्यामुळे मराठी लोकांना साहित्यापेक्षा चित्राची भाषा लगेच उमजते हेही दिसून आलेले आहे, पण म्हणून याच वैशाखात वळवाचा पाऊस येऊन आपणाला अगदीच अनपेक्षितपणे वर्षाधारात न्हाऊन घालत असतो हे आपण कसे काय नजरेआड करणार? आता वळवाचे वैशिष्टय़च असे आहे की, तो कोणत्या क्षणी कोसळेल आणि मुलांना आपल्या हातांनी न्हाऊ घालेल याचा काहीही थांग लागत नाही, पण अनपेक्षिततेचा खराखुरा आनंद आपणांस कोण देत असेल तर तो वैशाखातील वळीवच देत असतो. त्याचे येणे आणि त्याचे जाणे याच्यामध्ये फार मोठा असा वेळ दडून असतो असेही मानण्याचे कारण नाही. कारण वळीव म्हणजे एखादी सणसणत येणारी सर आणि सारे ओलेचिंब करून जाण्याचा प्रत्ययकारी आनंद असाच वळवाचा पाऊस असतो. तो ‘‘आला आला’’ म्हणेपर्यंत निघूनसुद्धा जातो आणि त्याचा काहीच नेम नसतो. असा जर कोणी बेभरवशाचा माणूस अगदी अनपेक्षितपणे दारी येऊन धडकला तर आपण ‘‘अगदी वळवासारखा आला’’ असे म्हणून त्याला जणू प्रत्यक्ष वळवातच उभा करत असतो. या सगळ्यात पाऊस येणे आणि पाऊस जाणे यामध्ये जो एक निसर्गाचा निरामय असा आनंद आपणाला मिळत असतो तो केवळ शब्दातीतच म्हटला पाहिजे.
गेल्या पिढीत शंकर पाटील नावाचा फार मोठा लेखक होऊन गेला. त्याची ‘वळीव’ नावाची फार सुंदर कथा आहे. या कथेतील एक म्हातारा जनावरे घेऊन रानात गेलेला असतो आणि असाच अचानक वळीव कोसळू लागतो. घरी जी म्हातारी असते ती म्हाताऱयाच्या काळजीने कासावीस होते. कारण सदैव बोटात तांब्याची अंगठी घालणारा म्हातारा आज मात्र ती अंगठी घरी विसरून गेलेला असतो आणि तांब्यामुळे अशा वीज घेऊन येणाऱया वळवाची भीती नसते एवढेच तिला ठाऊक असते. अशातच म्हातारा पूर्ण निथळलेल्या अवस्थेत घरी येतो आणि म्हातारीचा जीव भांडय़ात पडतो. कथा ही एवढीच, पण शंकर पाटलांसारख्या जन्मदत्त लेखकाने ती ज्या पद्धतीने साकारलेली आहे, त्यातून वाचक स्वतः वळवाचा प्रत्यक्ष अनुभव घेतात आणि त्यांच्या मनाला वळवाचीच ओढ लागून राहते. त्यामुळे अत्यंत घाईगर्दीच्या वेळीसुद्धा कोणत्याही क्षणी वळीव अंगणी आणि दारी सहज उतरतो आणि आपली झालेली फटफजिती हसत हसत पाहत असतो, बालचमूत मात्र वळीव भलतीच मजा आणत असतो. कारण अंगण ओलेचिंब होते आणि मुले त्यातच खेळू लागतात.अशातच जर गारा पडू लागल्या तर मुलांच्या आनंदाला आणखीनच उधाण येते. घरातल्या वाटीत गारांचा प्रसाद घेण्याकरिता ती धडपडू लागतात आणि त्या गारा आईला दाखवून पुन्हा वळवात खेळू लागतात.
मनुष्याच्या मनाला अत्यंत निसर्गदत्त असा आनंद निसर्गातीलच असंख्य घटकांतून मिळत असतो आणि त्या आनंदाची तुलना अन्य कोणत्याही आनंदाशी कदापि होऊ शकत नाही. त्यामुळे असा पाऊस हा खरा गाण्याचा आणि गुणगुणण्याचा असतो असे मला आपले नेहमी वाटत आलेले आहे. झाडांना मनात आले तर क्षणात रस्त्यात झोपविणारा आणि त्यांच्या बरोबर पोलिसांपेक्षाही तत्परतेने गाडय़ांना जागीच थांबविणारा असा कोण खरा पोलीस असेल तर तो वळीवच आहे. त्याच्यामुळे उन्हात अडकून बसलेले आपले मन हलके होत असते आणि फुलारूनही येत असते. मग वाटू लागते की, आता किमान आठवडाभर तरी वैशाख वणवा तोंड वर काढणार नाही. कारण वळवाने त्याला तशी समजच दिलेली असते. आपण उगाच वैशाख वणवा म्हणत धास्तावून जात असतो. त्यापेक्षा वळीव आठवणे आणि वळवात भिजून जाणे यातच खरा निसर्गाच्या तादात्म्याचा मनःपूत आनंद मिळत असतो. पुढे कधीतरी पाऊस सुरू व्हायचाच असतो, पण त्या पावसाच्या प्रतीक्षेपेक्षा वळवाची ही थेट भेट मला नेहमीच खुणावत असते आणि या भेटीकरिता मन तेवढेच उत्सुक झालेले असते. मग आपण कशाला उगाच वैशाख वणव्याची असलेली आणि त्याच वेळी नसलेली काळजी करायची? कारण वळीव आपणाला केवढा मोठा आधार वाटत असतो. मुळातच पाऊस हा आपला आधारवडच असतो आणि वळवाचा पाऊस हा तर वैशाख वणव्याला आरपार भेदून आपल्या गळाभेटी करता येत असतो. म्हणून वैशाख वणवा दूर ठेऊन मी नेहमीच वैशाख वळवाच्या प्रतीक्षेत असतो.






























































