‘तरु’णाई – अबोल चाफा

665
chafa-flower

>> डॉ. सरिता विनय भावे 

कवी ‘बी’ यांच्या नंतरच्या बहुतांश कवींनी चाफ्यावर कविता करताना त्याला ‘अबोल’ ठरवून टाकले आहे. पद्मा गोळे यांच्या ‘चाफाच्या झाडा, चाफाच्या झाडा…’ या कवितेतही हाच भाव अधोरेखित होतो असे वाटते. खरंच, स्वतः अबोल राहून इतरांना इतकं व्यक्त व्हायला भाग पाडणारा चाफा ‘एकमेवाद्वितीय’ आहे.

चाफा बोलेना, चाफा चालेना…’ या कवितेच्या (कवी बी – नारायण मुरलीधर गुप्ते) आधाराने आपल्या भावविश्वात प्रवेश करणारा चाफा अजूनही तिथेच ठाण मांडून बसला आहे. माझ्यासारख्या पामरांना जरा तरी ही कविता समजावी म्हणून शालेय पाठय़पुस्तक मंडळाने कवितेखाली दिलेल्या टिपेत चाफ्याला ‘रुसलेल्या प्रियकराचे’ प्रतीक मानले होते. कवीची ‘रुसलेली काव्यप्रतिभा’ असेही याबद्दलचे विवेचन वाचनात आले होते.

जगभरात चाफा ‘शोभेचा वृक्ष’ म्हणून नावाजला जातोच, आपल्याकडेही देवालये, लग्नसमारंभ, अंत्यविधी सगळीकडे तो हजेरी लावतो. चंपा, चंपक या नावांनीही त्याला ओळखतात. चंपाकली, चाफेकळी तर आपल्याकडील साहित्यात सुप्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रात चाफ्याच्या विविध प्रकारांत सोनचाफा आणि साधा चाफा लोकप्रिय आहेत. वनस्पतीशास्त्रात सुवर्णचंपकाला Michelia champaca हे नामाभिधान मिळाले आहे. याचे खोड उंचसर वाढून टोकाला छोटय़ा छत्रीसारखा पर्णसंभार असतो. पाने लांब आणि खालील बाजूस लवदार असतात. फुलांचे पिवळा आणि दाट नारिंगी रंग असे प्रकार असून अतिशय मादक घमघमाट आणि सुकल्यानंतरही दरवळत राहणारा मंद सुवास याची वैशिष्टये आहेत. वनस्पतीशास्त्रात साध्या चाफ्याच्या Plumeria या प्रजातीत पांढऱ्य़ा, पिवळ्या, लाल चाफ्याचा सामावेश होतो. इंग्रजीत ‘फ्रांजीपनी’ असेही याला म्हणतात. हे गोवा राज्याचे ‘राज्यफुल’ आहे. चाफ्याचे झाड मध्यम ऊंचीपर्यंत वाढते. खोड गाठीदार असून चीकयुक्त असते. फांद्यांच्या टोकाला गुच्छाने येणारी पाने चकचकीत, गर्द हिरवी, लांबसर, वाटोळी असतात. लांब देठांची सुगंधी फुलेही फांद्यांच्या टोकाला गुच्छानेच येतात. चाफ्यांच्या अर्काचा सुगंधी तेले, अत्तरे, उदबत्ती यामध्ये उपयोग केला जातो.

चाफ्याला धार्मिक अधिष्ठानही भरपूर लाभले आहे. चंपाषष्ठाrला (मार्गशीर्ष शुक्ल षष्ठाr) देवांच्या सैन्याचे सेनापतीत्व स्वीकारून ज्येष्ठ शिवपुत्र कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला होता. कर्नाटकात या तिथीला चाफ्याची फुले प्रिय असणाऱ्य़ा कार्तिकेयाचे भक्तिभावाने पूजन केले जाते. चंपाषष्ठाrला महाराष्ट्रात जेजुरीगडाच्या खंडेरायाला सहा दिवस भंडारा, रोडगा, वांग्याच्या भाजीचा नैवेद्य दाखवून चाफ्याची फुलेही उधळतात. याबाबत अशी दंतकथा आहे की सामान्य जनता-साधू-संतांना त्रास देणाऱ्य़ा मल्ल आणि मणी या दानवांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी महादेवाने खंडोबाचे उग्र रूप धारण केले होते. याबद्दल कृतज्ञता म्हणून आणि मागील जन्मातील पाप धुऊन काढून सुखी-समाधानी आयुष्यप्राप्तीसाठी भाविक हे व्रत करतात.

असे म्हणतात की, भुंगा कधीच चाफ्याला स्पर्श करत नाही. या सत्याचा अतिशय उत्कृष्ट उपयोग ‘कवीभूषण’ यांनी छत्रपती शिवाजीमहाराज यांचे गुणगान गातांना केला आहे. औरंगजेबाचे मांडलिक असणाऱ्य़ा इतर सर्व सरदारांना विविध फुलांची उपमा देऊन ते म्हणतात, ‘लेइ रस एतेनको बैठि न सकत अहै, अलि नवरंगजेब चम्पा सिवराज है’. अलि म्हणजे भुंगा जसा फुलाफुलांतून मध गोळा करतो तसा हा भुंगारूपी औरंगजेब सगळया राजांकडून कर गोळा करतो, पण चंपकपुष्पाप्रमाणे असणाऱ्य़ा शिवरायांच्या वाटेला हा भुंगा (औरंगजेब) कधीही जात नाही. खरेच, या कर्तव्यदक्ष राजाशी तुलना झाल्याने चाफ्यालाच आपले आयुष्य धन्य झाले आहे असे वाटले असेल!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या