
मुंबईचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच माधव गोठोस्कर यांचा उद्या, 30 ऑक्टोबर रोजी 92 वा जन्मदिवस. स्थानिक पंच, रणजी पंच, आंतरराष्ट्रीय पंच अशी झेप घेणाऱया माधव गोठोस्कर यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्येही विविध पदे भूषवली. असंख्य पंच घडवले. विविध पुरस्कारही जिंकले. याच पार्श्वभूमीवर माधव गोठोस्कर यांनी दैनिक ‘सामना’ला दिलेली ही मुलाखत. याप्रसंगी माधव गोठोस्कर यांनी 92 वर्षांच्या कारकीर्दीवर टाकलेला हा दृष्टिक्षेप…
…अन् पंचगिरीकडे वळलो
सुरुवातीचा माझा प्रवास विल्सन हायस्पूल, छबिलदास, रुईया काॅलेज असा झाला. इंदूरमध्येही दोन वर्षे राहिलो. मुंबईत ‘टाइम्स ऑफ इंडिया’ येथे 14 वर्षे नोकरी केली. तिथे क्रिकेट सेव्रेटरीही होतो. त्या काळात मित्रत्वाच्या लढती होत असत. मी जलदगती गोलंदाज होतो. याचदरम्यान कार्यालयातील काही जणांनी सांगितले की तुझी एकाग्रता चांगली आहे. पंच म्हणून काम कर. 1961 साली मुंबईतील स्थानिक स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम केले. 1967 साली रणजीत आणि 1973 साली कसोटीत पंच म्हणून पदार्पण केले. 14 कसोटी आणि एक वन डेत पंच म्हणून कामगिरी बजावली, असे माधव गोठोस्कर यावेळी म्हणाले.
क्रिकेटने खूप काही दिले
क्रिकेटने मला खूप काही दिले. सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, क्लाईव्ह लॉईड, अॅलन बॉर्डर यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहता आला. बीसीसीआयकडून पेन्शन देण्यात येत आहे. माझ्या आजारपणात बोर्डाकडून आर्थिक मदतही करण्यात आलीय, असे माधव गोठोस्कर यावेळी आवर्जून सांगतात.
गैरवर्तनासाठी शिक्षेचा अधिकार पंचांना द्यायला हवा
मैदानातील गैरवर्तणुकीला सामनाधिकाऱयांकडून खेळाडूंना शिक्षा ठोठावण्यात येते. पण खेळाडूने केलेल्या गैरवर्तणुकीला सामनाधिकाऱयांऐवजी पंचांनी शिक्षा द्यायला हवी. हा अधिकार त्यांच्याकडेच असायला हवा. कारण पंच खेळाडूंसोबत मैदानात असतात. ते त्यांना जवळून बघत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून झालेली चूक पंचांना जवळून बघता येते, असे माधव गोठोस्कर यांना वाटते.
चढउतारात पत्नीची मोलाची साथ
92 वर्षांच्या आयुष्यात असंख्य चढउतार बघितले. माझ्या जीवनात पत्नी लीला हिची मोलाची साथ लाभली. घरी अनेक संकटे आली. माझी बायपास सर्जरी झाली. ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. मुलांचे संगोपन केले. आता दोन्ही मुले परदेशात नोकरी करीत आहेत. दोन्ही मुलांचा सपोर्ट आम्हाला लाभतो, असे माधव गोठोस्कर नमूद करतात.
पंचगिरी बदललीय
आमच्या काळातील पंच आणि आताचे पंच यांच्यामध्ये काम करण्याच्या पद्धतीमध्ये कमालीचा फरक दिसून येतोय. आमच्या काळात आम्ही वाकून अंपायरिंग करीत होतो. त्यामुळे चुका होत नव्हत्या. खेळाडूही आमच्याविरोधात जात नव्हते. हा खेळ सभ्य गृहस्थांचा मानला जात होता. पण आता पंचांच्या विरोधात खेळाडू तिसऱया पंचांकडे दाद मागतात. त्यावेळी मैदानातील पंचांची मनःस्थिती काय असेल याचा विचारही करवत नाही, असे उद्गार यावेळी माधव गोठोस्कर यांनी काढले.
कार्य अन् पुरस्कार
पंच म्हणून स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय काम केल्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठीही कार्य केले. सुधार समिती, कार्यकारिणी, पंच समिती यामध्ये काम करायला मिळाले. मुंबई क्रिकेट असोसिएशन व शिवाजी पार्क जिमखाना यांच्याकडून मानपत्रही मिळाले. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाकडून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या हस्ते ‘क्रीडा समीक्षक’ पुरस्कारही मिळाला. शास्त्रीय संगीत आवडत असल्यामुळे बहुतांशी मैफलींचा अनुभव घेता आला. आतापर्यंतच्या जीवनात मी समाधानी आहे, असे माधव गोठोस्कर भावुकपणे सांगतात.




























































