वैश्विक – …पुन्हा नव्याने आकाशदर्शन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

या आठवडय़ात कोणत्याही अवकाशी ‘प्रोब’ किंवा मोहिमेवर लिहिण्याऐवजी अवकाशदर्शनाच्या प्रदीर्घ काळानंतर आलेल्या पुनरानुभूतीविषयी थोडंसं. आकाशदर्शनाचे रात्रभराचे कार्यक्रम म्हणजे निरभ्र आकाशाखाली समूहाने एकत्र येऊन ‘विश्वरूप दर्शन’ घेण्याचा आनंदसोहळाच असतो. गेली पस्तीस वर्षे आम्ही खगोल मंडळाच्या माध्यमातून तो अखंडपणे अनुभवला. अखंडपणे हा तसा सापेक्ष शब्द. कारण वर्षातले पाच महिने पावसाची चाहूल, प्रत्यक्ष पर्जन्यवृष्टी आणि नंतर रेंगाळणाऱया ढगांची निरोपाची वेळ येईपर्यंत वाट पाहण्यात जातात. अर्थात हा काळ पृथ्वीवरचा सुखद आणि शेतीला आवश्यक असतो. पाणी आणि धान्याने तृप्त झालेली धरित्री नंतर आठ महिने थंडी आणि उन्हाळा सोसत राहते ही आपल्याकडच्या वातावरणाची गोष्ट. देशोदेशींचे हवामानाचे ऋतू थोडे निराळे, पण पावसाळा हा संपूर्ण ऋतू असलेला आपला जगातला एकमेव देश.

2020च्या फेब्रुवारीच्या 20 तारखेला असाच निरभ्र अवकाशाखालचा ‘आकाशदर्शना’चा कार्यक्रम पार पडला. हे सगळे कार्यक्रम चांद्रमासावर म्हणजे चंद्राच्या तिथीवर अवलंबून असतात. मोठय़ा समूहासाठी कार्यक्रम करायचा तर अमावास्येपूर्वीचा किंवा नंतरचा शनिवार सोयीचा असतो. शनिवारीच अमावस्या असली तर फारच उत्तम. त्यानुसार नोव्हेंबर ते मे महिन्यापर्यंतचे वेळापत्रक ठरवले जाते. 2020 मध्येही ते तसेच तयार होते, पण 11 मार्चपासूनच ‘कोविड-19’ ऊर्फ ‘कोरोना’ची चर्चा सुरू झाली आणि 24 तारखेला देशव्यापी ‘लॉक डाऊन’ झाला. आठ-पंधरा दिवसांत हे सगळं संपेल अशी भाबडी आशा हवेत विरली आणि जवळ जवळ दोन वर्षे कोविडने जगाचा कोंडमारा केला. घरांचे कोंडवाडे झाले. स्वतःच स्वतःवर बंधनं लादून घ्यावी लागली. ‘सर सलामत तो पगडी पचास’ या न्यायाने आधी आपल्या आणि समूहाच्या जीविताची काळजी घेणं अत्यावश्यक होतंच. त्याबरोबर येणारी कंटाळवाणी, पण अटळ बंधन स्वीकारण्याशिवाय जगापुढे पर्यायच नव्हता. ‘लाटेमागून लाट धावते’ या प्रकारे कोविडचा उद्रेक सुरू राहिला आणि ओमिक्रॉननंतर अखेर आटोक्यात आला. वैद्यक क्षेत्रासह अनेक क्षेत्रांतील कर्मचाऱयांनी प्रयत्नांची शर्थ केली. सरकार आणि जनता समजुतीने वागली आणि कोविड नष्टतेचं ध्येय बहुतांशी साध्य झालं.

त्यानंतर परवाच्या शनिवारी (5 मार्च) बदलापूरजवळच्या उंबरोली येथील आकाशदर्शन कार्यक्रमाला अनेक जण आले. रोजच्या जीवनातून बाहेर पडत. त्यातील ताणतणाव काही काळ विसरून विराट विश्वाशी एकरूप होण्याचे क्षण म्हणजे असे आकाशदर्शनाचे कार्यक्रम. त्या दिवशी दोन वर्षांनी पुन्हा रात्रभर आकाश दाखवताना आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित केला तो प्रेक्षक-श्रोत्यांनी. अनेकांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली. पृथ्वीवरचे सारे संदर्भ दूर ठेवून ग्रह-ताऱयांची जत्रा आणि त्यामागील विज्ञान जाणून घेताना समरस झालेल्या श्रोत्यांना झालेला आनंद त्यांच्या प्रतिक्रियांमधून व्यक्त होत होता. विश्वरूप न्याहाळताना आपलं विश्वातलं म्हटलं तर क्षुल्लक आणि खरं तर अतिमहत्त्वाचं अस्तित्व जाणवल्यावर दुर्धर आजारांचाही काहींना विसर पडला. हेच अशा कार्यक्रमांचं यश असतं. या दीर्घकाळानंतरच्या अनुभवाचं वर्णन करताना गेली पस्तीस वर्षे इथे (आणि काही काळ अमेरिकेतही) आकाशदर्शक म्हणून कार्य करणारे प्रदीप नायक यांनी म्हटलं की, ‘‘दोन वर्षांपूर्वी आकाशदर्शन अवचितपणे थांबलं. ते पुन्हा कधी सुरू होईल याची आणि लोकांचा प्रतिसाद कसा मिळेल याची उत्सुकता होती, पण एकदा हाती ‘लेझर टॉर्च’ घेऊन उभं राहिल्यावर मधला काळ क्षणात पुसून गेल्यासारखं वाटतं. पुन्हा तोच जोश, जल्लोष आणि अभ्यास यांचा अनुभव तृप्त करणारा होता.

त्या रात्रीच्या कार्यक्रमाचं संचालन करणारे मिलिंद काळे म्हणतात, ‘‘बऱयाच काळानंतर मंडळाच्या प्रांगणातून ग्रहतारे भेटले. म्हणजे अगदी जवळचे मित्र भेटल्यासारखं वाटलं. कोविडपूर्वीची गर्दी खगोलीय भाषेत सांगायचं तर बंदिस्त तारकागुच्छासारखी (ग्लोब्युलर क्लस्टर) होती; तर यावेळी फिजिकल (किंवा सोशल) डिस्टन्सिंगमुळे खुल्या तारकागुच्छासारखी किंवा ज्यातील तारे दूर दूर असतात अशा ओपन क्लस्टरसारखी वाटली. संध्याकाळी मृग नक्षत्र, नंतर सिंह तारकासमूह छान दिसले. पहाटे बरेच ग्रह आणि वृश्चिक रास अप्रतिम दिसली.

खरंच आहे ते. चार तारखेच्या रात्री नागपूरहून मुंबईकडे ट्रेनने येत असताना इगतपुरीजवळ पहाटे जाग आली. खिडकीतून सहज आकाश न्याहाळलं आणि ‘वृश्चिका’ने सुंदर दर्शन दिलं आणि खूप बरं वाटलं. तीच नजर, तेच आकाश, तेच ग्रह आणि तारे पण नवेच वाटले सारे!