शिल्पवैभव – शिव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. मंजिरी भालेराव

शिव या देवतेच्या विकासाचा अभ्यास करताना वेगवेगळ्या टप्प्यांवर शिवाचे मानवी व लिंग स्वरूपातील प्रतिमांकन आपल्याला दिसून येते. शिवाचे सर्वात प्राचीन अंकन नाण्यांवर पाहायला मिळते. यानंतरच्या काळात या दोन्ही समांतर विचारधारांसह झालेला शैवपंथाचा विकास विविध शिल्पांमधून आजही आपल्यासमोर उभा आहे.

हिंदुस्थानातील देवतांमध्ये शिव या देवतेला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. प्राचीन शैव संप्रदायात अनेक मतांची व पंथांची भर पडून त्यातून आज आपल्याला माहीत असलेला शिव विकसित झाला आहे. सर्वसामान्य लोकांना जवळचे वाटणारे हे शिवाचे रूप त्याला साधारण इ.स.च्या दुसऱ्या शतकापासून मिळालेले दिसते. त्याआधी तो वैदिक साहित्यात विविध रूपांनी आढळतो. ऋग्वेद आणि अथर्ववेदात जरी तो रुद्र, शिव अशा नावांनी परिचित असला तरी मलदेव या नावाने तो हेटाळलाही गेला आहे. वैदिकेतर समाजात असलेली लिंगपूजा वैदिक धर्माचे आचरण करणाऱ्या लोकांना मान्य नव्हती हे यावरून स्पष्ट दिसते. पण काळाच्या ओघात या सर्व रूपांचे एकरूप झाले आणि पौराणिक शिव आपल्या समोर आला. शिवलिंग आणि मूर्ती या दोन्ही स्वरूपात तो पूजला जाऊ लागला. त्याच्या निरनिराळ्या कथा तयार झाल्या. त्या कथांवर आधारित शिल्पेही तयार झाली. त्यांनी अनेक लेणी आणि मंदिरेही सजली. पण प्रत्यक्ष मंदिरांच्या गाभाऱ्यात मात्र शिवलिंगाचीच स्थापना झाली.

शिव या देवतेच्या विकासाचा अभ्यास करताना वेगवेगळ्या टप्प्यांवर विविध प्रकारची साधने अभ्यासावी लागतात. या विषयात संशोधन करणाऱ्या विद्वानांनी लिखित तसेच भौतिक साधनांचा सखोल अभ्यास केला. शिवाचे सर्वात प्राचीन अंकन नाण्यांवर पाहायला मिळते. यामध्ये खुद्द शिव, त्याचे वाहन आणि त्याची प्रतीके या सर्वांचा समावेश होतो. हिंदुस्थानातील सर्वात प्राचीन नाणी म्हणजे इ.स.पू. 5 व्या, 6 व्या शतकातली नाणी. यावर जरी शिव मानवी किंवा लिंगस्वरूपात दिसत नसला तरी त्याचे वाहन (वृषभ) मात्र अनेक नाण्यांवर दिसते.

शिवाचे अतिशय स्पष्ट अंकन मात्र इ.स.च्या पहिल्या–दुसऱ्या शतकातील कुषाण राजांच्या नाण्यांवर दिसते. विम कडफायसीस नावाच्या राजाच्या सर्व नाण्यांवर एका बाजूला शिवाची प्रतिमा किंवा प्रतीके आढळतात. या राजाच्या नाण्यांवरून असे वाटते की, हा राजा शिवाचा परमभक्त असावा. विम कडफायसीस याची नाणी हिंदुस्थानी इतिहासात अत्यंत महत्त्वाची आहेत; कारण ती हिंदुस्थानातील सर्वात पहिली सोन्याची नाणी होती. त्यावर नाणी पाडणाऱ्या राजाच्या विविध मुद्रांमधील प्रतिमा आढळतात. या नाण्यांच्या मागच्या बाजूस शिव या देवते व्यतिरिक्त दुसरा कोणताही देव दिसत नाही. विम कडफायसीसच्या नाण्यांवरील शिवप्रतिमांमध्ये शिव हा नेहमी उभा दाखवला असतो. तो कधी नंदीसह असतो किंवा नंदीविरहीत असतो. त्याने उजव्या हातात त्रिशूल- परशु धरलेला दाखवतात. तर डाव्या हातात कमंडलू आणि मृगचर्म (किंवा काहींच्या मते वृषभचर्म) धरलेले असते.  प्राचीन नाण्यांवर त्रिशूल आणि परशु असे शिवाचे आयुध दाखवले जाते. पण मूर्तींमध्ये मात्र फक्त त्रिशूळच दिसतो. त्याचप्रमाणे नाण्यांवर असलेल्या शिवप्रतिमांमध्ये त्याच्या हातात असलेले हरीण मात्र उत्तर हिंदुस्थानातील प्रतिमांमध्ये दिसत नाही तर ते द. हिंदुस्थानातील प्रतिमांमध्ये स्पष्टपणे दिसते. ही प्रथा आजही सुरू आहे.

लिंगपूजा आणि मूर्तिपूजा या दोन समांतर परंपरांचे अस्तित्व आपल्याला सतत दिसत राहते. इ.स. पूर्व दुसऱ्या-पहिल्या शतकातील आंध्र प्रदेशातील चित्तूर जिह्यातील गुडीमल्लम येथे असलेली शिवाची मूर्ती या ठिकाणी महत्त्वाची मानली गेली आहे. परशुरामेश्वर स्वामी नावाने प्रसिद्ध असलेल्या या मंदिरातील चापाकृती गर्भगृहात पाच फूट उंच शिवलिंग आहे. त्याच्या दर्शनी भागावर उभ्या शंकराची द्विभुज प्रतिमा आहे. त्याने आपल्या उजव्या हातात एक मेंढा त्याच्या मागील पायांकडून धरला आहे. डाव्या हातात कलश आहे आणि खांद्यावर परशु आहे. शिवाच्या मस्तकावर पागोटे आहे तसेच अंगावर विविध अलंकारही आहेत. त्याच्या पायाखाली अज्ञानाचे आणि दुष्ट शक्तीचे प्रतीक असलेला अपस्मार पुरुष आहे. शिवलिंग आणि मानवी रूपातील शिव यांचे एकत्रीकरण असलेली ही मूर्ती नेमकी कोणत्या काळातील याबद्दल विद्वानांमध्ये थोडे वाद आहेत. इ.स.पूर्व दुसरे शतक ते इ.स.चे तिसरे, चौथे शतक असा कालखंड विद्वानांनी सांगितला आहे. पण मूर्तीचे हे एकूण स्वरूप पाहता ती बरीच प्राचीन आहे यात काही शंका नाही. मूर्तिपूजा आणि लिंगपूजा या दोन्हींचा पुरस्कार प्राचीन हिंदुस्थानात होत होता हे इथे स्पष्ट दिसते आहे. पण मूर्तीनिर्मितीच्या या प्रवासातील लिंगपूजक आणि मूर्तिपूजक यांच्या स्पर्धेतील लिंगपूजकांचा विजय गाभाऱ्यातील शिवलिंगाच्या स्थापनेतून स्पष्ट दिसतो.

[email protected]