
>>वैभव मोहन पाटील<<
या महिन्यात सर्वत्र गोवर-रुबेला मोहीम राबविली जात आहे. संपूर्ण हिंदुस्थाना गोवर या आजारामुळे बालमृत्यू दरात वाढ होत आहे. महाराष्ट्र राज्यातही अनेक बालके गोवर या आजाराने ग्रस्त आहेत. गोवर या आजारामुळे बालमृत्यू दराचं वाढलेलं प्रमाण कमी व्हावं यासाठी महाराष्ट्र सरकारने लहान बालकांसाठी व शालेय मुलांसाठी रुबेला लसीकरण मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या मोहिमेची सुरुवात मंगळवार, 27 नोव्हेंबरपासून संपूर्ण राज्यात करण्यात येत आहे. या मोहिमेत 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना मिझल्स रुबेला लसीची एक मात्रा देण्यात येणार आहे. मोहिमेच्या सुरुवातीला एक ते तीन आठवडे सर्व शाळांमध्ये सत्रे घेण्यात येणार आहेत व त्यानंतर अंगणवाडी व इतर बाह्य संपर्क क्षेत्रात लसीकरण सत्रे घेण्यात येणार आहेत. सदर लसीकरण हे पूर्णतः मोफत असून या प्रक्रियेत प्रशिक्षित डॉक्टरांचा समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भात ग्रामीण व शहरी भागांमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने मायक्रोप्लॅन तयार करण्यात आले असून त्याप्रमाणे लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या लसीची जनजागृती व्हावी यासाठी अनेक जिह्यांमध्ये अंगणवाडी व शाळांमध्ये जाऊन पालकसभा घेण्याबरोबरच मुलांच्या चित्रकला, रांगोळी स्पर्धादेखील घेण्यात येत आहेत. रुबेला हा सांसर्गिक, प्रामुख्याने सौम्य प्रकारचा व्हायरल आजार आहे. मुलांमध्ये व प्रामुख्याने तरुण मुलींत तो आढळतो. रुबेला संसर्गामुळे गरोदर स्त्र्ायांमध्ये गर्भाचा मृत्यू किंवा अर्भकास जन्मजात विकृती जसे आंधळेपणा, बहिरेपणा किंवा हृदयाचे विकार असे आजार उद्भवू शकतात. यास कंजनायटल रुबेला सिंड्रोम (सीआरएस) म्हणतात. जगभरात वर्षाला एक लाख बालकांत जन्मजात सीआरएस आजार आढळून येतो. हिंदुस्थानात दरवर्षी कंजनायटल रुबेला सिंड्रोमच्या 40 ते 50 हजार केसेस होतात. त्यामुळे केंद्र सरकारद्वारे राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकात मेसल्स रुबेला ही मोहीम राबवण्यात येत आहे. या आजारासाठी विशिष्ट उपचारपद्धती उपलब्ध नसून फक्त रुबेला लसीकरणाद्वारे याला रोखता येऊ शकते. हिंदुस्थान सरकारने सन 2020 पर्यंत गोवर या आजाराचे दुरीकरण व रुबेला या आजारावर नियंत्रण आणण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी राबविण्यात येणारी ही मोहीम सर्वांत मोठी लसीकरण मोहीम ठरणार आहे. जवळपास साडेतीन कोटी मुलांसाठी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये शालेय लाभार्थ्यांचे प्रमाण साधारणतः 60 ते 65 टक्के आहे. सदर मोहीम साधारणतः 4 ते 5 आठवडय़ांत राबविण्यात येणार असून त्यातील पहिल्या दोन ते तीन आठवडय़ांत आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण मोहीम राबविली जात आहे. यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला बाल विकास, शिक्षण विभाग यांच्यामध्ये समन्वय साधला जात आहे. 27 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या ‘रुबेला’ लसीकरण मोहिमेबद्दल पालकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. ही लस देणे योग्य आहे की नाही, मुलांना पूर्वी केलेल्या लसीकरणामध्ये ही लस दिली असेल तर आता पुन्हा लसीकरण करणे गरजेचे आहे का, अशा प्रश्नांवर शाळांच्या माध्यमातून पालकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. गोवर येताना ताप येणे, अंगावर पुरळ उठणे, संसर्ग पसरण्याची लक्षणे असतात. मूल नऊ महिन्यांचे असताना लसीकरण कार्यक्रमांतर्गत गोवरची लस देण्यात येते, तर सोळा महिन्यांचे झाल्यानंतर गोवर, गालगुंड आणि रुबेला या तिन्ही लसींचा बुस्टर डोस देण्यात येतो. पालिका रुग्णालयांमध्ये लसीकरणाची ही पद्धती पाळण्यात येते. खासगी रुग्णालयांमध्ये बालरोगतज्ञ दोन वेळा रुबेलाची लस देतात. त्यामुळे पुन्हा ही लस घ्यावी का, असाही प्रश्न काही पालकांना पडला आहे. मात्र आता ही लस घेतल्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास वा नुकसान होणार नाही, तर मुलांची रोगप्रतिकारशक्ती अधिक सक्षम होण्यासाठी मदतच होणार आहे. एकंदरीत गोवर, रुबेला हे घातक आजार नियंत्रणात आणण्यासाठी समाजातील सर्व स्तरांतील घटकांचा सक्रिय पाठिंबा आवश्यक असून आपल्या परिसरातील 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना या व्यापक लसीकरण मोहिमेचा लाभ मिळण्याकामी सर्वांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.






























































