
>> डॉ. हिरालाल खैरनार
दुचाकीने प्रवास करणाऱ्यांनी डोक्यावर शिरस्त्राण/ हेल्मेट वापरणे वाहतूक कायद्यानुसार सक्तीचे करण्यात आले. नंतर दुचाकीवर मागे बसलेल्या प्रवाशालासुद्धा शिरस्त्राण/हेल्मेट बंधनकारक करण्यात आले. याबाबत सामान्य माणसाच्या मनात मोठी नाराजी निर्माण झाली. मध्यंतरी पुणेकर मंडळी तर आंदोलनाचा भाग म्हणून मुद्दाम हेल्मेट न घालता दुचाकी घेऊन रस्त्यावर उतरली होती. नाशिकमध्ये पेट्रोल पंप चालकांना सूचना दिल्या होत्या की, विनाहेल्मेट दुचाकीस्वाराला पेट्रोल देऊ नका.
हेल्मेट दुचाकीस्वाराच्या जीवित रक्षणासाठी आहे. अपघात झाला तर डोक्याला गंभीर दुखापत होऊ नये आणि दुखापत झालीच तर निदान त्याचा प्राण वाचावा, ही आणि एवढीच मूळ संकल्पना आहे, मात्र त्यासाठी कायदा करण्यात आला. वाहतूक विभागातील अधिकारी, कर्मचारी मनमानी पद्धतीने कायद्याचा आधार घेतात. त्यामुळे जनतेला जाच होतो आणि भ्रष्टाचारही होतो. आता घराघरांतच नाही, हाताहातातच नाही, तर अनेकांना मोबाईलसाठी हात कमी पडू लागले आहेत. इतकं मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढलं आहे. वाहन मग ते दुचाकी असो की चारचाकी असो, चालवताना सर्रास मोबाईलवर मंडळी बोलत असतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढू लागले तसे वाहन चालवताना मोबाईलवर बोलणं गुन्हा ठरू लागला. दुचाकी चालकांसाठी तर हेल्मेट म्हणजे फार मोठी सोय झाली. मस्तपैकी मोबाईल कानाला लावून हेल्मेट आनंदाने डोक्यावर चढवतात आणि सहजपणे गप्पा मारत किंवा गाणी ऐकत किंवा कार्यालयीन कामाची चर्चा मोबाईलवर चालू असते. हेल्मेट कायद्याचे तंतोतंत पालन तर वाहन चालवताना मोबाईलवर बोलणं पायदळी असा प्रकार सर्रास चालू आहे.
हेल्मेट न वापरता कुणी दुचाकी चालवत असेल तर त्यामुळे सामाजिक कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही. सदरचा प्रश्न संबंधित व्यक्तीच्या जीविताशी निगडित आहे. हेल्मेट घातले नाही म्हणून पेट्रोल द्यायचे नाही किंवा तपासणीसाठी अडवणूक करून वाहतुकीचा खोळंबा करायचा आणि भ्रष्टाचारासाठी जागा निर्माण करायची हे कुठेतरी थांबायला पाहिजे. रस्त्यावर वाहने थांबवून उगाच फुले उधळून वाहतूक यंत्रणेने आपला वेळ फुकट घालू नये. हा फक्त जनजागृतीचा विषय आहे. चित्रपटगृहात अनेक जाहिरातीं दाखवतात तशी ‘हेल्मेट वापरा सुरक्षित रहा’, अशी एक ओळ दाखवावी तसेच शाळा-महाविद्यालये, सरकारी कार्यालये, मंदिरांच्या बाहेर, चौकाचौकांत फलक लावावेत, दृकश्राव्य माध्यमातून रात्री 9 ते 11 या बातम्यांमधून आणि मालिकांमधून हेल्मेट वापरणे आणि वाहन चालवताना मोबाईलवर बोलण्याबाबत जनजागृती करता येईल. एकूणच हेल्मेट आणि वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे याबाबतच्या धोरणाची पुनर्मांडणी करणे आवश्यक आहे असे वाटते.





























































