
>> दिलीप जोशी
प्रसिद्ध कवी केशवसुत यांची एक कविता काळाचे महत्त्व सांगते. ‘गडबड घाई जगात चाले, आळस डुलक्या देतो, पण गंभीरपणे घडय़ाळ बोले, आला क्षण… गेला क्षण!’ सतत निसटत चाललेल्या ‘वेळेची’ जाणीव घडय़ाळ करून देत असते. घडय़ाळ चालते चोवीस तासांच्या चक्रात, पण त्यात तेवीस, चोवीस वाजलेले दिसत नाहीत. आकडे दिसतात ते एक ते बाराच. दिवसाचे दोन भाग करून आपण घडय़ाळ वापरतो. सकाळी (दुपारी) बारा ते रात्री बारा हा काळ पीएम आणि रात्री बारा ते दुपारचे बारा हा काळा एएम या लॅटिन आद्याक्षरांनी गणला जातो.
मध्यरात्रीचे बारा वाजले की आधुनिक कालगणनेनुसार ‘अॅण्टे मेरिडियन’ किंवा सूर्य मध्यान्हीला येण्यापूर्वीचा बारा तासांचा काळ समजला जातो. दुपारी बारा वाजता सूर्य आकाशाच्या मध्यभागी शिरोबिंदूवर किंवा ‘मेरिडियन’वर आला की पुढचे बारा तासांचे क्षण न् क्षण हे मध्यान्होत्तर अथवा ‘पोस्ट मेरिडियन’ (पीएम) असतात. म्हणून वेळ सांगताना ती ए.एम. की पी.एम. ते सांगावे लागते. अर्थात साधारण अंदाजावरून सकाळ की संध्याकाळ ते समजतेच. अशा या चोवीस तासांच्या घडय़ाळाने आपले जीवन अक्षरशः क्षणोक्षणी व्यापलेले आहे.
तशी काळ ही सापेक्ष गोष्ट आहे. आपली पृथ्वी चोवीस तासांत एक गिरकी घेते म्हणून इथे बारा-बारा तासांची दिवस-रात्र. शुक्रावस्था घडय़ाळात एक दिवस पृथ्वीच्या 116 दिवसांनी संपेल. दोन्ही ग्रहांसाठी सूर्य तोच पण भिन्न गतीमुळे त्यांच्यावरील दिवसाच्या वेळा वेगवेगळय़ा. ही झाली खगोलीय गोष्ट. पण आपल्या रोजच्या आयुष्यातही तोच काळ कधी चटकन जातो तर कधी वेळ जाता जात नाही. एकाच ‘वेळे’च्या दोन भिन्न अनुभूती दोन व्यक्तींना येऊ शकतात.
खूप कंटाळा आलेला असेल किंवा हाती काही काम नसेल तर दिवसाचे तासन्तास करायचे काय? मग कुणी म्हणते ‘दिवस खायला उठतो’. दुःखाच्या क्षणी तर त्याची प्रचीती अधिकच येते. एकेक क्षण युगायुगांचा वाटतो. आनंदाच्या क्षणी मात्र तोच काळ फार लवकर संपतोय असे वाटते. संपूच नये असेही वाटते. हे मानवी मनाचे खेळ. घडय़ाळ मात्र त्यापासून अलिप्त असते. ते जाणारा आणि येणारा क्षण दाखवत राहाते. प्राचीन काळापासून कालमापक ‘घडय़ाळ’ बदलत गेली, पण काळ तसाच आहे.
सध्याचा कोविड काळ ही सबंध जगावर आलेली आपत्ती. हे जागतिक नष्टचर्य कधी संपणार? पूर्वीसारखी मुक्त जीवनाची पहाट कधी होणार या प्रतीक्षेत सारेच आहेत. उद्याची पहाट समृद्ध असावी म्हणून आज आपण काही बंधने स्वीकारली आहेत. ठरावीक आरोग्य शिस्त पाळणे अत्यंत आवश्यक आहे. कारण एकेक क्षण अनेकांसाठी ‘काळ’ होऊन येतोय. काही आठवडय़ांपूर्वी असाच एखादा लेख लिहीत बसलो असताना आमच्या संस्थेतल्या एका तरुणाचे कोविडमुळे निधन झाल्याचे अचानक समजले. आणि चार दिवस कमालीच्या उदासीनतेत गेले. दहा-बारा दिवसांत त्याच मुलाचे, माझ्याच वयाचे, वडील गेल्याचे कळले आणि मन अक्षरशः बधीर झाले. एकेका घराला काय काय सहन करावे लागतेय. वास्तविक दोघांवरही चांगल्या रुग्णालयात व्यवस्थित उपचार सुरू होते. पण… आठवणींचे क्षण मागे ठेवून माणसे अकल्पितपणे गेली की विषण्ण वाटते.
कालचक्र मात्र अव्याहत सुरूच राहाते. आपलीच आपण ‘समजावणी’ करत पुढे जात राहतो. त्याला दुसरा इलाजही नसतो. म्हणूनच आटोकाट काळजी घेणे एवढेच आपल्या हाती आहे, असा धडा या महासाथीने दिलाय. कालांतराने सर्व ठीक होईलच, पण मनावरचे घाव तसेच राहातील. असा ‘कराल’ काळ जगाने आतापर्यंत अनेकदा अनुभवला आहे. आपल्याकडे एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात उद्भवलेल्या ‘प्लेग’ने असाच हाहाकार उडवला होता जगात. विशेषतः युरोपात इसवी सन 1347 (चौदावे शतक) प्लेगने एवढा कहर केला की, युरोपच्या तत्कालीन लोकसंख्येच्या तुलनेत प्रचंड जीवितहानी झाली होती.
पुढे काळ बदलला. आधुनिक वैद्यकशास्त्र विकसित झाले. विविध रोगांवर मात करणारी औषधे, लस निघाली. देवीसारख्या रोगाचे उच्चाटन झाले; परंतु त्याचबरोबर वेगवेगळय़ा नव्या रोगांचा प्रादुर्भावही होऊ लागला. विषाणू किंवा व्हायरसचा मुकाबला करताना जग जेरीस आले. एकविसाव्या शतकात असे काही घडेल याची कल्पनाही कोणी केली नसेल, पण एखाद्या देशाच्या राजमहालापासून ते एखाद्या देशाच्या गरीब वस्तीपर्यंत कोविडने सारखाच दणका दिला. सवा वर्ष होत आले तरी अजून त्याचे थैमान सुरूच आहे. पण त्यालाही अंत आहेच. अधिकाधिक लसीकरणातून आणि योग्य काळजी घेण्यातून आपण सारे पृथ्वीवासी त्यावर मात करू, असा दुर्दम्य आत्मविश्वास बाळगायला हवा… काळ तर मोठा कठीण जातोय. कालमापक घडय़ाळ मात्र अलिप्तपणे टिकटिकतेय. कदाचित सांगतेय, कठीण क्षणही आला तरी तोही जाणारच आहे. तेवढाच एक मनाला दिलासा.




























































