लेख – सायबर गुन्ह्यांचा वाढता विळखा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> महेश कोळी

आजच्या काळात इंटरनेटच्या माध्यमातून सदासर्वकाळ ‘कनेक्ट’ असणे हे नकळतपणे अपरिहार्य बनले आहे. त्याचा फायदा आणि आनंदही आपण घेत असतो, पण दृष्टीआडचा एखादा सायबर गुन्हेगार बरेचदा आपल्या परवानगीने आणि काही वेळा परवानगीशिवाय आपल्या खिशावर किंवा खात्यावर डल्ला मारतो तेव्हा या आनंदावर आंबटढोण विरजण पडते. आज सायबर गुन्ह्यांची व्याप्ती खिशावरून मानसिक छळापर्यंत गेली आहे. त्यामुळेच ते समजून घेणे गरजेचे बनले आहे.

इंटरनेट-डिजिटल क्रांतीमुळे एका क्लिकवर सर्व जग सामावले गेले आहे. मित्र, नातेवाईकांशी चॅटिंग करण्याबरोबरच खरेदी, बँकिंग व्यवहार या सर्व गेष्टी एका बटणावर सामील झाल्या आहेत. मात्र जगाला कवेत घेणारे इंटरनेट हे आपले जगही बदलू शकते. सोशल मीडियावर केलेली गडबड आपल्या अंगलट येऊ शकते. या गोष्टींबाबत आजही वापरकर्ते अनभिज्ञ आहेत. आज सायबर गुन्हे वेगाने वाढत असताना नागरिक मात्र त्याकडे कानाडोळा करताना दिसून येत आहेत. पुण्यातील एका नामांकित बँकेतील सुमारे 90 कोटी रुपये सायबर क्राइमच्या रूपातून विविध देशांत काढले गेले. अशा प्रकारच्या घटना सतत कोठे ना कोठे घडत असतात. याचा आपल्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फटकाही बसू शकतो.

सायबर गुन्ह्यांमुळे अनेकांचा पैसा डोळ्यांदेखत गायब झाला आहे. काही वेळा आपणही या घटनेला जबाबदार असतो. कोणत्याही खोटय़ा कॉलला दिलेला प्रतिसाद हा आपल्याला आर्थिक अडचणीत आणू शकतो. यासंदर्भात सरकार आणि बँकांकडून वारंवार सूचना देऊनही लालसेपोटी, आमिषापोटी काही खातेदार बनावट मेलला बळी पडतात आणि नकळतपणे आर्थिक चक्रव्यूहात फसत जातात.  वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला काही मूलभूत गोष्टींची माहिती गरजेचीच आहे.

अलीकडील काळात मुले आणि महिलांविरुद्ध होणारे सायबर गुन्हे वाढले आहेत. सायबर बुलिंग, ई-मेल स्पूफिंग, चॅट आदींच्या माध्यमातून मानसिक अत्याचार केला जातो. त्यामुळे मुलांच्या मनात पहबिया निर्माण होतो. कालांतराने मुले किंवा महिला या इंटरनेट वापरण्यास धजावत नाहीत. काही वेळा ही बाब नैराश्य आणि आत्महत्येपर्यंत पोहोचू शकते.

तसे पाहिले तर सोशल मीडिया वाईट नाही, मात्र त्याचा वापर सावधानतेने करायला हवा. ज्याप्रमाणे गॅस ऑन केल्यानंतर तो बंद करणे गरजेचे आहे तसेच संगणक/लॅपटॉप आणि स्मार्टफोन वापरानंतर त्यास लॉगआऊट करणे अत्यावश्यक आहे. अनेकदा युजर फोनवर लॉगआऊट करत नाहीत, मात्र ही बाब चुकीची आहे.

सायबर गुन्ह्यांचे विविध स्वरूप 

सायबर दहशतवादः सायबर घडामोडींतून धार्मिक, राजकीय, सामाजिक दहशत निर्माण करणे हे प्रकार सायबर दहशतवादांतर्गत येतात. हा दहशतवाद कोणत्याही देशाच्या सुरक्षेला हानी पोहोचवू शकतो.

आर्थिक गुन्हेः आजघडीला बहुतांश बँकांचे काम हे इंटरनेटवर होत आहे. व्यापारदेखील इंटरनेटवर केला जात आहे. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने पैसे काढून घेणे, ऑनलाइन व्यापार किंवा बँकिंगमध्ये फसवणूक करणे या सर्व गोष्टी आर्थिक सायबर गुन्ह्यात सामील होतात.

फिशिंगः आपल्या मेल आयडीवर असे काही मेल येतात की, ते कोणत्या ना कोणत्या बँकेचे किंवा अन्य वित्तीय संस्थेचे संकेतस्थळ आहे असे भासवले जाते. हे आपल्या बँकेच्या खात्याची किंवा अन्य व्यक्तिगत माहिती विचारण्याचा प्रयत्न करतात. हे सर्व मेल बनावट असतात आणि आपल्या वैयक्तिक माहितीची चोरी करून गैरव्यवहार करतात. त्याला आपण फिशिंग म्हणतो. यासारख्या कोणत्याही मेलला उत्तर देऊ नये.

सायबर हेरगिरीः यास अॅडव्हेअर किंवा स्पायवेअर असेही म्हटले जाते. आपल्या संगणकात परवानगीने किंवा परवानगी न घेता ते संगणकाला जोडले जातात. आपल्या ऑक्टिव्हिटीज आणि वैयक्तिक माहिती गोळा करून ते अन्य संस्थेला देतात. अशा प्रकारचे स्पायवेअर किंवा अॅडव्हेअर हे संगणकाचे काम संथ करतात.

ओळखीची चोरीः एखाद्या व्यक्तीकडून एखाद्या व्यक्तीची ओळख चोरणे किंवा त्याची इलेक्ट्रॉनिक सही हॅक करणे किंवा अन्य नावाने बनावट काम करणे यास आपण ओळखीची चोरी असे म्हणतो. अशा प्रकारचा अपघात टाळण्यासाठी आपल्या नेट बँकिंगच्या, मेलच्या पासवर्डमध्ये नंबर तसेच विशेष चिन्हांचा अवश्य वापर करा. कालांतराने पासवर्ड बदलत रहा. पासवर्ड कोणासोबतही शेअर करू नका.

स्पॅमः स्पॅममध्ये इच्छा नसलेले मेल येतात. हादेखील सायबर गुन्हा आहे. अनेकदा चिठ्ठी लिहिणाऱ्या व्यक्ती आपल्याला एक पत्र पाठवून त्यांचे पत्र वाचण्यास सांगतात आणि उत्तर देण्यास प्रवृत्त करतात. ही बाब चुकीची आहे. हे इंटरनेट शिष्टाचाराविरुद्ध आहे आणि सायबर गुन्हादेखील आहे.

स्पिमः स्पॅममध्ये इच्छा नसलेले मेल येतात तर स्पिम इंटरनेटमध्ये इच्छा नसलेल्या बाबींवर चर्चा होते. इंटरनेटवर पाठलाग करणे, त्रास देणे, भीती दाखवण्याचे काम करणे हे सर्व काम इंटरनेटवर केले जाते. त्याला स्टॉकिंग असेही म्हटले जाते.

सायबर छळः अनेकदा अनोळखी मेल, संदेश आपल्या मोबाईलवर येतात. संदेश पाठवणारी महिला विधवा आहे, तिच्या नवऱ्याचा मोठा पैसा अडकून पडला आहे आणि यासाठी तुमची मदत हवी आहे अथवा एखादा मुलगा गंभीर आजारी असून त्याला पैशाची निकड आहे, असेही संदेश येतात. याशिवाय आपल्या मोबाईल नंबरने कोटय़वधीची लॉटरी जिंकली असून ते पैसे मिळवण्यासाठी संपर्क करा. खरे तर या बाबी खोटय़ा असतात. आपली फसवणूक करून पैसा उकळण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. हा एक सायबर गुन्हा आहे. त्यावर कधीही अंमल करू नये.

कायदा काय म्हणतो? 

हिंदुस्थानात 2000मध्ये माहिती आणि तंत्रज्ञान कायदा (आयटी) मंजूर झाला. त्यानंतर 2008मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली. आयटी कलम 66 ‘अ’नुसार संगणक किंवा अन्य संचार माध्यमातून एखाद्याचा अपमान होईल, त्रास होईल, मानसिक आघात होईल, गुन्हेगाराला प्रोत्साहन मिळेल, वैर निर्माण करेल असा  संदेश पाठवण्यास मनाई आहे. शत्रुत्वाच्या भावनेने प्रेरित असलेले संदेश पाठवण्यास बंदी आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास तीन वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. या गुन्ह्यांतर्गत सहजपणे जामीन मिळतो. आयटी कलम 2008 (संशोधन) च्या कलम 67 ‘बी’नुसार चाईल्ड पोर्नोग्राफीच्या गुह्यासाठी पाच वर्षाची शिक्षा किंवा दहा लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.

कायदा असला आणि तो कितीही कठोर केला तरीही इंटरनेटशी जोडलेला संगणक अथवा मोबाईल वापरताना वैयक्तिक सजगता हाच प्रतिबंधात्मक उपाय आहे. हल्ली प्रत्येक बँक खातेदाराचा मोबाईल क्रमांक त्याच्या बँक खात्याशी जोडलेला असतो. या पह्न क्रमांकावर आपल्याला खोटे मेल, मेसेज किंवा फोन कॉल येऊ शकतात आणि आपल्याला एटीएम नंबर, पासवर्डची माहिती विचारू शकतात. जर आपण माहिती दिली नाही तर आपले खाते बंद होईल किंवा खालील लिंकवर क्लिक करा, असे खातेदाराला सांगितले जाते. खातेदारही अशा सूचनेला किंवा कॉलला बळी पडतो आणि सर्व काही माहिती देतो. अखेर काही मिनिटांतच आपल्याला खात्यातून पैसे काढले गेल्याचे समजते. अशा प्रकारच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. मात्र एक बाब लक्षात ठेवा, बँक अधिकारी कधीही पासवर्ड, ओटीपी, व्रेडिट कार्ड नंबर विचारत नाहीत. यासंदर्भात रिझर्व्ह बँक किंवा आपल्या बँकांकडून सतत सूचनावजा संदेश येतात. त्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.