
>> ज्ञानेश्वर भि. गावडे
नौदलासाठी 111 हेलिकॉप्टर खरेदीसह संरक्षण मंत्रालयाने 46 हजार कोटी रुपयांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. 21 हजार कोटी रुपयांच्या हेलिकॉप्टर खरेदीला मंजुरी देतानाच संरक्षण मंत्रालयाने सुमारे 125 हजार कोटींच्या संरक्षण प्रस्तावालाही मान्यता दिलेली आहे. त्यामध्ये नौदलासाठी 24 बहुउद्देशीय हेलिकॉप्टर आणि एमएम 155 तोफांची खरेदी करण्यात येत आहे. नौदलाकडे असलेली फ्रेंच बनावटीची चेतक हेलिकॉप्टर कालबाह्य झालेली आहेत. त्यांची उणीव या नव्या खरेदीतून होणारी आहे. मेक इन इंडियाअंतर्गत देशातील संरक्षण साहित्याच्या निर्मितीला चालना देण्यासाठी हिंदुस्थानी कंपनीबरोबर भागीदारी करण्याची अट घालण्यात आली आहे. हिंदुस्थान हा जगातील सर्वात मोठा शस्त्रखरेदीदार देश आहे. अलीकडच्या पाच वर्षांत तर हिंदुस्थानची शस्त्रखरेदी 24 टक्क्यांनी वाढलेली आहे.
संरक्षण सामग्रीच्या उत्पादनात हिंदुस्थान देश मागे आहे. रखडलेले प्रकल्प, खासगी क्षेत्रांकडून होणारी अत्यल्प गुंतवणूक, थेट परकीय गुंतवणुकीचा अभाव आदी कारणांमुळे शस्त्रsखरेदीमध्ये हिंदुस्थानला अडचण येत आहे. हे जरी खरे असले तरी चीनसारखा आक्रमक व विस्तारवादी देश आणि पाकिस्तानसारखा दीर्घद्वेष्टा देश आपल्या शेजारी आहे. आतंकी हल्ले आपल्या देशाच्या पाचवीला पुजले आहेत. प्राचीन काळापासून हिंदुस्थान परकीय आक्रमणासाठी बळी जात आहे. उत्तरेकडील आक्रमणापासून आकाशमार्गाने, समुद्रावाटे होणारे आतंकी हल्ले आणि देशांतर्गत देशद्रोह्यांच्या हालचाली, पंचस्तंभीय कारवाया यापासून मुक्तता हवी असेल तर संरक्षण सिद्धता, सुरक्षा क्षमता व युद्धसिद्धता कमी असू नये. म्हणून होईल तेवढय़ा मार्गाने देश बलसंपन्न झाला पाहिजे. शस्त्रनिर्मितीत सध्या मागे असलो तरी भविष्यकाळात तसे मागे राहून चालणार नाही. सध्या तरी शस्त्रखरेदीला पर्याय नाही.






























































