प्रासंगिक – टपाल सेवा आजही उपयुक्तच

>> दिलीप तुकाराम डुंबरे

स्वित्झर्लंडमधील बर्न येथे 9 ऑक्टोबर 1974 रोजी ‘युनिव्हर्सल पोस्टल युनियन’ची स्थापना झाली. त्याची आठवण म्हणून संपूर्ण जगभर आजचा दिवस ‘जागतिक टपाल दिन ’ म्हणून साजरा केला जातो. हिंदुस्थानात 1 ऑक्टोबर 1854ला पोस्टाची स्थापना झाली असली तरी सध्याच्या टपाल व्यवस्थेची सुरुवात त्याहीआधी सतराव्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात झाली. मात्र त्याद्वारे केवळ कंपनीच्या टपालाचीच ने – आण होई. इ. स. 1774मध्ये टपालसेवा जनतेसाठी खुली करण्यात आली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या देशात फक्त 23,344 डाकघरं असणाऱया या खात्याची प्रगती सात पटीने झाली आहे. आजमितीला आपल्या देशात सुमारे 1 लाख 55 हजार 333 पोस्ट ऑफिसेस आहेत. त्यापैकी 1 लाख 39 हजार 144 कार्यालये ही ग्रामीण भागात आहेत. या कार्यालयांमार्फत इंडिया पोस्टचा कारभार चालतो. हिंदुस्थानातील ही टपाल कार्यालयांची संख्या जगात सर्वाधिक असून टपालसेवेचे हे जगातील सर्वात मोठे जाळे आहे. 1 ऑक्टोबर 1854ला पोस्टाची स्थापना झाल्यानंतर पैसे भरल्याचा पुरावा म्हणून धातूची टोकनऐवजी चिकट पार्श्वभाग असलेली टपाल तिकिटे अस्तित्वात आली. टपाल तिकिटांमध्ये प्रामुख्याने स्मारक तिकिटे व नित्य तिकिटे असे दोन प्रकार असतात. स्मारक तिकिटे ठरावीक संख्येमध्ये छापण्यात येतात. ही तिकिटे विक्री केल्यानंतर पुन्हा छापली जात नाहीत. टपाल खात्याच्या नियमाप्रमाणे जिवंत व्यक्तीवर तिकिटे प्रसिद्ध करण्यात येत नाहीत. परंतु वयाची शंभर वर्षे पूर्ण केल्यास अशा व्यक्तीचे तिकीट प्रसिद्ध होऊ शकते. हा मान महर्षी धोंडो केशव कर्वे यांना मिळाला. या नियमांस अपवाद म्हणून सचिन तेंडुलकर यांची 2 तिकिटे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये सर्वात जास्त तिकिटे महात्मा गांधी यांची असून त्याखालोखाल पंडित जवाहरलाल नेहरू यांची आहेत. नित्य तिकिटे रोजच्या वापरासाठी प्रसिद्ध करण्यात येतात. त्यामुळे काही लाखांच्या संख्येत त्यांची छपाई करण्यात येते.

एक काळ असा होता, जेव्हा लोक दिवस-रात्र पत्रांची वाट पाहत असत. साधारण 20-25 वर्षांपूर्वी जेव्हा एखादा टेलिग्राम (तार) यायची तेव्हा संकेत असायचा की, काहीतरी वाईट घडले आहे आणि जेव्हा एखादे पत्र यायचे तेव्हा लोक समजून जायचे की, काहीतरी आनंदाची बातमी आहे. आज पत्रांची जागा ई-मेल आणि सोशल मीडियाने घेतली आहे. पूर्वी लोक लांब असले तरीही पत्राद्वारे प्रेम व्यक्त करत असत. आज लोक सोशल मीडियाचा वापर करून आधुनिक तर होत आहेत मात्र मानसिकदृष्टय़ा एकमेकांपासून लांब जात आहेत.

असे असले तरी आजही दुर्गम, डोंगराळ भागात पत्र हेच संपर्क करण्याचे एकमेव साधन आहे. हिमाचल प्रदेशमधील हिकिम नावाच्या गावामध्ये जगातील सर्वात उंचावरील टपाल कार्यालय अर्थात पोस्ट ऑफिस आहे. 4440 मीटर उंचीवर हे पोस्ट ऑफिस आहे. जेथे श्वास घेण्यास अडचण येते, जेथे जून ते ऑक्टोबरच्या काळात या ठिकाणी जाणेही शक्य होत नाही. अशा ठिकाणी 1984पासून हे टपाल कार्यालय दुर्गम भागात पत्र पाठवण्याचे काम करीत आहे.

देशातील पोस्ट ऑफिसेस किती महत्त्वाची आहेत हे समजण्यासाठी एक छोटीशी माहिती पुरेशी आहे. आपण जेव्हा अमूक एका शहराचं अंतर तमूक एका शहरापर्यंत इतकं किलोमीटर आहे, असं म्हणतो तेव्हा ते अंतर त्या शहरामध्ये G. P. O. (General Post Office) पासून ते दुसऱया शहरातील उ. झ्. ध्. पर्यंतचे अंतर असते.

हिंदुस्थानी डाक विभाग आजच्या घडीला ई – पोस्ट, ई – बिल पोस्ट, बिझनेस पोस्ट, लॉसिस्टिक पोस्ट, एक्सप्रेस पार्सल पोस्ट, मीडिया पोस्ट, रिटेल पोस्ट, ग्रीटिंग पोस्ट, स्पीड नेट, इंटरनॅशनल मेल्स आणि इंटरनॅशनल ई.एम.एस. या पोस्टाच्या सेवा चालवते. परंतु टपाल खात्याचे सगळ्यात जुनं आणि खेडोपाडी पोहचलेलं काम म्हणजे आपल्या सगळ्यांच्या परिचयाची मनिऑर्डर सेवा, इंटरनॅशनल मनिऑर्डर सेवा, पोस्टाची बचत बँक, इलेक्ट्रॉनिक फंड टान्स्फर (E.F.T.) तत्काळ मनिऑर्डर सेवा, डाक बीमा योजना, तारसेवा आणि टपालसेवा आदी सेवांचाही समावेश होतो.

आपला देश खंडप्राय देश असल्याने जगातील सर्वात मोठे जाळे असलेल्या या सेवेच्या समस्या जाणून घेऊन त्या दूर करणे अत्यंत आवश्यक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या