
डॉ. विजय ढवळे, ओटावा-कॅनडा
जेम्स अर्ल कार्टर. त्याचा संक्षिप्त उच्चार जिमी कार्टर. होय, तोच माणूस की जो अमेरिकेचा 1976 पासून 4 वर्षे अध्यक्ष होता. शिक्षणाने ऍटोमिक इंजिनीअर, शेंगदाण्याची लागवड करणे या व्यवसायात होता. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर जॉर्जिया नावाचे छोटेसे राज्य आहे. तेथूनच डॉ. मार्टिन ल्युथर किंग या नोबेल शांतता पुरस्कार मिळवणाऱ्या आणि ‘काळा गांधी’ म्हणून जग ज्याला जाणते, त्या कृष्णवर्णीय नेत्याचा उदय झाला. तो म्हणजे अमेरिकेचा डॉ. आंबेडकरच म्हटला पाहिजे. त्याने काळय़ा लोकांना समान हक्क मिळावेत म्हणून शांततामय लढा दिला. 1963 साली त्याने वॉशिंग्टनमध्ये प्रचंड मोर्चा- 3 लाखांचा काढला होता व तेव्हा लिंकनच्या पुतळय़ासमोर “I have adream” हे अजरामर भाषणही केले होते. कार्टर जॉर्जिया राज्याचा गव्हर्नर (मुख्यमंत्री) होता. 1974 साली निक्सनने राजीनामा दिल्यावर जेराल्ड फोर्ड अध्यक्ष झाला. निवडून न आलेला तो अमेरिकेच्या इतिहासातला एकमेव अध्यक्ष! त्याला प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहण्याचा कार्टरने निश्चय केला तेव्हा त्याचे निवडून येण्याचे चान्सेस जवळ जवळ शून्यवत होते! तरीही कार्टर निवडून आला. त्याच्या कारकीर्दीत तेलाचे भाव सौदीने चौपट वाढवले. पेट्रोल पंपांवर लांबलचक रांगा लागू लागल्या. अमेरिकन्सची प्रचंड गैरसोय होत होती.
इराकच्या शहाला अमेरिकेचा पूर्ण पाठिंबा होता, पण त्याच्याविरुद्ध फ्रान्समध्ये राजकीय आश्रय घेतलेला धर्मांध आयातोला खोमेनी रोज विष ओकत होता. इराणची इस्लामी संस्कृती शहा रसातळाला नेत आहे व पाश्चिमात्य मूल्ये इराणवर लादत आहे असा त्याचा जहरी प्रचार होता. मुस्लिमांना धर्म हा ‘सबसे प्यारा’ असतो. खोमेनीचे शब्द इराणी जनतेच्या मनात घर करून बसू लागले. शहाविरुद्ध होणाऱ्या निदर्शनांची उग्रता वाढली. जनक्षोभाच्या रेटय़ामुळे शहाने शरणागती पत्करली व देश सोडून चालता झाला. प्रथम बहाबाज व नंतर इजिप्तमध्ये तो राजकीय निर्वासित म्हणून राहिला व तेथेच मरण पावला. शहाने इराण सोडल्यावर खोमेनी ‘जितं मया’च्या थाटात देशांत प्रकट झाला. त्याने ताबडतोब स्त्रियांवर, शिक्षणावर निर्बंध लादले शहाच्या सर्व उदारमतवादी धोरणांना मूठमाती दिली व कट्टर इस्लाम राबवण्याचा इरादा जाहीर केला. धर्मोन्मादाने इराणी जनता वेडी झाली व त्यामधील अतिरेक्यांनी अमेरिकन वकिलातीवर हल्ला चढवून 54 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. 444 दिवस ते अभागी लोक बंदिवासांत होते. कार्टर हा शांतताप्रिय असल्याने त्याने लष्करी कारवाईचा पर्याय धुडकावून लावला व तो अमेरिकन्सच्या मनातून उतरला. रॉनल्ड रेगनने 1980 च्या निवडणुकीत कार्टरला धूळ चारली. 50 पैकी 44 राज्यांत त्याने आघाडी मिळवून निर्णयात्मक विजय मिळवला.
पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. 2018 साल संपत आले. जिमी कार्टर हा आता 93 वर्षांचा आहे. त्याची आई मिस लिलियन म्हणून प्रसिद्ध होती. तिने हिंदुस्थानात शांतता पथकांत कामही केले होते. ही मुलगा व्हाईट हाऊसमध्ये 4 वर्षे मुक्कामाला जाण्याआधीची गोष्ट. कार्टरला हिंदुस्थानी संस्कृतीबद्दल आस्था होती. अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचा कार्टरवर प्रभाव होता. त्याचा भाऊ बिली कार्टर हा दारूडय़ा म्हणून गाजला. तो नेहमी दारूच्या नशेतच असे. शेवटी यकृताच्या कर्करोगाने त्याचा बळी घेतला. थोडक्यात, कार्टरच्या अध्यक्ष कारकीर्दीत त्याने कोणतीही स्पृहणीय कामगिरी बजावली नव्हती. तो पिचक्या पाठकण्याचा अध्यक्ष म्हणूनच कुप्रसिद्ध होता. वयाची नव्वदी ओलांडली आणि त्याने आपणास मेंदूचा कधीही बरा न होणारा कर्करोग झाला आहे हे जाहीर केले, पण त्यामुळे त्याच्याबद्दल जनतेत जो आदर होता, त्यात वाढच झाली.
केवळ दुसऱ्यांना आदेश देऊन घरबांधणी करण्याची कार्टरची पद्धत नाही. स्वतः इंजिनीअर असल्याने व कोणत्याही प्रकारचा अहंगंड नसल्याने तो प्रत्येक घरबांधणी प्रकल्पात स्वतःचे योगदान देतो. तो हातोडा हातात घेऊन खिळे ठोकतो. नवीन घराला रंग देण्यासाठी हातात ब्रश घेताना त्याला संकोच वाटत नाही. आता त्याची चाल मंदावली आहे, पाठीला पोक आले आहे. तरीही दरवर्षी काही आठवडे तरी कार्टर अमेरिकेचा 39 वा अध्यक्ष आणि त्याची नव्वदीला टेकलेली पत्नी रोझलिन हे जगातल्या कोणत्या तरी मागासलेल्या, गरीब देशात मुक्काम ठेवतात आणि त्यांच्या संस्थेतर्फे तेथे चालू असलेल्या घरबांधणीच्या प्रकल्पात सक्रिय भाग घेतात, कार्टर स्वतःहून पुढाकार घेतो व त्याच्या निःस्वार्थी, त्यागी समर्पक वृत्तीने भारावलेले स्थानिक लोक सहाय्य करतात. इतर धनाढय़ लोक मदत करतात. दरवर्षी शेकडो अमेरिकन तरुण कार्टरच्या मागे स्वयंसेवक म्हणून उभे राहतात. इंडियाना राज्यात मिशवाका नावाचा भाग आहे. तेथे मुख्यतः गरीब, कृष्णवर्णीयांची वस्ती आहे. ऑगस्ट 2018 हा पूर्ण महिना कार्टर दांपत्य तेथे राहत होते. घर उभारणीचे महत्त्वाचे काम स्वहस्ते करत होते.
कार्टर हा अमेरिकेचा माजी अध्यक्ष – पेन्शन भरपूर. कायम सुरक्षा सैनिकांची तैनात सरकार पुरवते, परंतु या कशाचाही कार्टरला मोह नाही. त्याने आपली बहुतेक इस्टेट दान करून टाकली आहे. तो त्याच्या पत्नीसह एका 2 बेडरूम्स असलेल्या छोटय़ा घरात राहतो. प्लेन्स या जॉर्जियातल्या खेडेगावात. तेथील वस्ती फक्त 603! कार्टरच्या घरात नोकर नाहीत. त्याची पत्नी स्वतः रोज स्वयंपाक बनवते आणि पत्नीपरायण जिमी कार्टर तिला आनंदाने मदत करतो. दर रविवारी कार्टर बाप्टिस्ट चर्चमध्ये धार्मिक शिकवण देणारा वर्गशिक्षक म्हणून काम करतो. कार्टर सध्या ज्या घरात राहतो ते त्याने 1961 साली बांधले होते. त्यात तो सपत्निक सुखी जीवन जगत आहे.
कार्टर हा मुळातच अतिशय सुस्वभावी, निगर्वी माणूस आहे. त्याला 2010 मध्ये अमेरिकेच्या उच्च न्यायालयाने ण्ग्tग्zाहे ळहग्tाd या संघटनेच्या अर्जावर अनुकूल निर्णय दिला, तो खूप बोचतो. कारण त्यामुळे संस्थांना, कंपन्यांना, उत्पादकांना करोडो डॉलर्स निवडणूक प्रचारात वारेमाप खर्च करण्याचा निरंकुश अधिकार प्राप्त झाला व अमेरिकेतली गरीब-श्रीमंत ही दरी वाढली. सध्या 47 टक्के अमेरिकन्स कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सरकारी अनुदान, मदत, ग्रँट यांवर अवलंबून आहेत! रोझलिन कार्टरलादेखील भरपूर आरोग्य समस्या आहेत. तिला चालताना काठीचा टेकू घ्यावा लागतो. गेल्या 35 वर्षांत कार्टरने घरबांधणी, तीही फक्त कनिष्ठ वर्गीयांसाठी असे स्वतःपुरते ध्येय ठरवून टाकलेले आहे. 14 देशांत त्याने प्रकल्प पूर्ण केले. अमेरिकेच्या 21 राज्यांत घर उभारणी केली. म्हणजे दर वर्षाला एक नवीन प्रकल्प हाती घेतो व तो पूर्ण करतो! लेरॉय ट्रेव्हर हा 80 वर्षांचा कृष्णवर्णीय माणूस कार्टरचा भक्त आहे. तो प्रत्येक प्रकल्पावर सुपरव्हिजन करतो. कार्टर त्याला ‘बॉस’ म्हणतो.
अन्न, वस्त्रि याप्रमाणेच निवारा ही माणसाची प्राथमिक गरज आहे. कार्टर तीच यथाशक्ती पुरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. गेल्या 3 वर्षांत त्याने एकही डॉलर पगार घेतला नाही. इंडियाना राज्यात 2001 पासून दारिद्रय़ रेषेवर घुटमळत असलेल्यांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. त्याचे कार्टरला अतीव दुःख होते. जॉब साईटवर जाताना कार्टर त्याच्या मानेभोवती लाल रंगाचा मफलर गुंडाळून जातो आणि पँटला जो कमरपट्टा लावलेला असतो. गार्थ ब्रुक्स हा अतिशय प्रसिद्ध गायक. गेले एक तप तो कार्टरच्या प्रकल्पांत स्वयंसेवक म्हणून वर्षातून 2 महिने विनामूल्य काम करतो आणि ही कार्टरची सभ्यता, नम्रता, साधेपणा हे सध्या अध्यक्ष असलेल्या ट्रम्पचे दुसरे टोक आहे. पेंट हाऊसेस स्वतःकरिता सजवण्यात आणि पोर्न चित्रपटात काम करणाऱ्या मदनिकांना गुपचूप पैसे चारून गप्प बसवण्याच्या उद्योगात गर्क आहे. ट्रम्पचे औद्योगिक साम्राज्य हे त्याच्या मेहेरनजरेखाली वाढतेच आहे. कार्टर अध्यक्ष झाल्यावर त्याने त्याचे शेंगदाणा उत्पादनाचे शेत ‘ब्लाइंड ट्रस्ट’मध्ये टाकले होते. कार्टरला ट्रम्प आवडत नाही. तरीही देशाच्या भल्याकरिता त्याची कारकीर्द यशस्वी व्हावी, अशी तो येशूची रोज प्रार्थना करतो.
नुकताच मरण पावलेला ऑरिझोनाचा सिनेटर जॉन मॅकेन हा कार्टरचा हिरो. दोघेही अमेरिकन नेव्हल ऍकॅडमीचे माजी विद्यार्थी. जरी 10 वर्षांचे अंतर असले तरी त्यांची मैत्री ही कायम होती. ‘वास्तविक राजकीय मतप्रणाली भिन्न असूनही मॅकेनमध्ये सद्सद्विवेक बुद्धी जागृत असल्याने तो नेहमी सत्यवचनी होता असे म्हणताना हे मला सध्याच्या ट्रम्प महाशयांच्या बाबतीतही म्हणायला आवडले असते’ अशीही कार्टर कोपरखळी लगावून देतो. जेव्हा कार्टर पतीपत्नी प्रकल्पावर काम करीत असतात तेव्हा ते इतर कर्मचाऱ्यांबरोबरच आपला लंच घेतात. ते पूर्णपणे शाकाहारी आहेत. जेवणात त्यांच्या कोणत्याही खास मागण्या नसतात. जे इतर लोक खातात तेच आपण खायचे हा त्यांचा खाक्या. कार्टर मेसमध्ये खाणे घेत असलेल्या प्रत्येकाशी ठीक बोलतो. घमेंड, ताठा, गर्व हे शब्दच त्याच्या शब्दकोशात नाहीत. मी सभोवताली पाहतो आणि मला माझ्या देशाचे भवितव्य उज्ज्वल आहे. याची खात्री पटते असे तो प्रामाणिकपणे सांगतो.
‘तू मरण पावल्यावर कोणत्या गोष्टींकरिता जगाने तुझी आठवण ठेवली पाहिजे. असे वाटते’, या प्रश्नावर कार्टर म्हणतो, ‘एक शांतताप्रिय आणि मानवी मूल्ये जतन करू पाहणारा माणूस म्हणून. घर असणे हा प्रत्येक माणसाचा मूलभूत हक्क आहे असे मी मानतो. क्लिओरा टेलरही 36 वर्षीय 4 मुलांची सिंगल मदर. तिला कार्टर हा येशूचाच अवतार वाटतो! माझ्या एका मुलीस ऑटिझम आहे. तिची मला रोज काळजी वाटायची. कार्टरच्या मेहेरबानीने तिला हक्काचे घर कायमसाठी लाभले. कार्टर हा देवदूत आहे. त्याच्याकरवी देव त्याचे काम करत आहे. हे शब्द हृदयांतून उमटलेला कृतज्ञतेचा हुंकार आहेत. हिंदुस्थानात असे कार्टर का दिसत नाहीत?
(लेखक कॅनडास्थित उद्योजक आहेत)





























































